रक्तदानचे महत्त्व घराघरांत पोहोचावे, यासाठी जिल्ह्यात आठ तालुक्याचे आठ विभाग बनविले आहेत. प्रत्येक तालुक्यात महिन्याला ३ याप्रमाणे रक्तदान शिबिरे भरविण्यात येतात.
बांदा : सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्या (Sindhu Raktmitra Pratishthan) माध्यमातून जिल्ह्यात एका वर्षात तब्बल दीड हजार रक्तपिशव्याचे संकलन करून शेकडो रुग्णांना जीवदान देण्यात आले आहे. जिल्ह्यातील गावागावात व्यापक स्वरूपात रक्तदान चळवळ राबविण्यात येत असून शेकडो तरुण या सामाजिक कार्यात स्वखुशीने सहभागी होत आहेत.
जीवदान दिलेल्या रुग्णात जिल्ह्याबरोबरच गोवा, कोल्हापूर, बेळगाव येथील रुग्णांचा देखील समावेश आहे. ज्यांनी रक्तातील रक्तगटांचा शोध लावला ते डॉ. कार्ल लँडस्टीनर यांचा आज जन्मदिवस. हा दिवस जागतिक रक्तदान दिन (World Blood Donation Day) म्हणून साजरा केला जातो. जिल्ह्यातही ही चळवळ जोर धरू लागली आहे.
रक्तदानचे महत्त्व घराघरांत पोहोचावे, यासाठी जिल्ह्यात आठ तालुक्याचे आठ विभाग बनविले आहेत. प्रत्येक तालुक्यात महिन्याला ३ याप्रमाणे रक्तदान शिबिरे भरविण्यात येतात. या माध्यमातून रक्तमित्र प्रतिष्ठान गावागावात कार्य करत असून आज प्रत्येक रक्तगटाची अद्ययावत माहिती प्रतिष्ठानकडे संकलित आहे. केवळ शिबिरच नव्हे तर रोज अत्यावश्यक रुग्णासाठी "ऑन कॉल" रक्तदात्यांची टीम प्रत्येक तालुक्यात आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याची कोअर समिती यावर लक्ष ठेऊन असते. त्यामुळे तातडीने रक्त उपलब्ध होते. जिल्ह्यात सध्या तीन रक्तपेढ्या कार्यरत आहेत. पैकी दोन शासकीय ज्या सावंतवाडी व ओरोस जिल्हा रुग्णालयात आहेत तर एक खासगी रक्तपेढी पडवे येथील एसएसपीएम रुग्णालयात आहे. दोन वर्षांपूर्वी जागतिक कोरोनाचे संकट, लॉकडाऊन आणि कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणामुळे रक्तदानाचे प्रमाण खूप कमी झाले होते.
सद्य:स्थितीत सामाजिक संस्थांतर्फे विविध ठिकाणी शिबिरांचे आयोजन करून रक्तसाठा केला जात आहे. आज रक्तदान चळवळीतून जिल्ह्यासह गोवा, रत्नागिरी, कोल्हापूर, मुंबई, बेळगाव येथे रक्ताची तातडीची गरज भागविण्यात येत आहे. वर्षभरात केवळ सिंधुदुर्गातून १ हजाराहून अधिक रक्त पिशव्या दिल्या आहेत. सिंधु रक्त मित्र प्रतिष्ठानच्यावतीने अनेक मित्र संस्थांच्या सहकार्याने वर्षभरात ५० हून अधिक रक्तदान शिबिराचे आयोजन केले असून तब्बल दीड हजारहून अधिक रक्त पिशव्या संकलित केल्या आहेत.
नियमित ८ ब्लड ग्रुप व्यतिरिक्त बॉम्ब्ये ब्लड ग्रुप या नवीन ब्लड ग्रुपचा शोध लागला आहे. संपूर्ण भारतात या ग्रुपचे केवळ १९० रक्तदाते आहेत. सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानने या ब्लड ग्रुपचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात तब्ब्ल १६ दाते शोधले आहेत. त्यामुळे या ब्लड ग्रुपमध्ये देशात सिंधुदुर्ग जिल्हा हा स्वयंपूर्ण आहे. जिल्ह्यात या ब्लड ग्रुपच्या दात्यांचा शोध सुरू आहेत.
१० वर्षांपासून सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्या माध्यमातून काम करताना मला रक्तासाठी फोन येतात. त्यांना रक्तपेढ्यांमार्फत तसेच वेळप्रसंगी रक्तदात्यांना तयार करून रक्ताची पूर्तता केली जाते. आतापर्यंत जवळपास ५०० हून जास्त दात्यांना वेळप्रसंगी तयार करून रक्तदानास प्रवृत्त केले. रक्तदाते हे केवळ रक्तदाते नसून ते देवदूत आहेत. रक्ताची नाती सांभाळताना रक्ताशी नाते जोडावे लागते. तरी तरुणांनी न घाबरता रक्तदान करा.
- प्रकाश तेंडोलकर, अध्यक्ष, सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.