मुंबई : राज्यातील नागरिकांमध्ये तंबाखू सेवनाचे प्रमाण सर्वच स्तरावर वाढले आहे. तंबाखूजन्य पदार्थांना राज्यात बंदी जरी असली, तरी हे पदार्थ मुंबईसह अनेक जिल्ह्यांमध्ये सर्रास विकले जातात.
राज्यात राबवल्या जाणाऱ्या राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत एकूण ४०४ तंबाखूमुक्त केंद्रे असून येथे ४ लाख तंबाखू खाणाऱ्यांची संख्या नोंदली गेली; मात्र तंबाखूमुक्तीच्या मार्गाने जाणाऱ्या नागरिकांचे प्रमाण फार क्वचितच आढळत असल्याचे जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्ताने समोर आले आहे.
भारतात आणि महाराष्ट्रात प्रामुख्याने ग्रामीण भागात वेगवेगळ्या प्रकारे तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन केले जाते. तंबाखूचे सेवन केल्याने तोंडाचा कर्करोग होतो आणि संपूर्ण जगात भारत देशात सर्वाधिक मुख कर्करोगाचे रोगी आढळून आलेले आहेत.
यात पुरुष, महिला आणि मुलांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. दरम्यान, तंबाखू तोंडाव्यतिरिक्त इतर अवयवांवरही परिणामकारक घटक आहे. भारतात २८.६ टक्के प्रौढ; तर राज्यात प्रौढ व्यक्तीचे तंबाखू सेवन करण्याचे प्रमाण जवळपास २६.६ टक्के आहे.
राज्यात जवळपास ५.१ टक्के युवक (१३ ते १५ वयोगट) हे तंबाखूचे सेवन करत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने ३१ मे २००८ पासून कोणत्याही माध्यमात तंबाखूजन्य पदार्थांच्या जाहिरातींवर पूर्णपणे बंदी घातली आहे; मात्र आजही तंबाखूची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे.
मुंबईकर तंबाखूच्या आहारी
मुंबईत झालेल्या असंसर्गजन्य आजारांविषयक स्टेप सर्वेक्षणानुसार एकूण तंबाखूच्या वापराचे प्रमाण १५ टक्के आहे. त्यापेकी १२ टक्के नागरिक दररोज तंबाखूचे सेवन करतात. हे प्रमाण पुरुषांमध्ये अधिक आहे. मौखिक तंबाखूच्या (मशेरी, गुटखा, पानमसाला, खैनी) वापराचे प्रमाण सुमारे ११ टक्के इतके आहे, जे खूप जास्त आहे.
९,३०४ नागरिक तंबाखूमुक्तीच्या मार्गावर
राज्यात राबवल्या जाणाऱ्या राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत एकूण ४०४ तंबाखूमुक्त केंद्रे आहेत. यावर्षी या केंद्रांवर ४ लाख ३४० तंबाखू खाणाऱ्यांची संख्या नोंदली गेली. यापैकी २.५ टक्क्यांपेक्षा ही कमी म्हणजेच ९,३०४ नागरिकांनी तंबाखूमुक्तीचा मार्ग अवलंबला आहे.
तंबाखूचे इतर परिणाम
तंबाखूच्या सेवनाने बरेच असंसर्गजन्य आजार निर्माण होतात. उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग आणि तोंडाचा कर्करोग होतो. भारतातील तंबाखू नियंत्रणाच्या अहवालानुसार, भारतात प्रतिवर्षी तंबाखूजन्य पदार्थाच्या व्यसनामुळे ८ ते ९ लक्ष लोकांचा मृत्यू होतो. त्यापैकी ७ दशलक्षाहून अधिक मृत्यू थेट तंबाखूच्या वापरामुळे होतात.
सिगारटेचा सर्वाधिक धोका
सिगारेटमध्ये असलेल्या निकोटिनमुळे कर्करोगासह हृदयाच्या रक्तवाहिन्या आकुंचन पावू शकतात. ज्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा येण्याचा धोका वाढतो. ज्यामुळे पेरिफेरल आर्टरी डिसीज होऊ शकतो. यातून हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत एखाद्या व्यक्तीचा अचानक मृत्यूही होऊ शकतो.
धूम्रपानामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होत असल्याने हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढत आहे. धूम्रपान सोडल्याने फुप्फुसाचा कर्करोग, हृदयविकाराचा झटका, पुनरुत्पादक आरोग्यविषयक समस्यांची शक्यता कमी आहे.
- डॉ. दीपक शेजोळ, हृदयरोगतज्ज्ञ, झायनोव्हा शाल्बी मल्टीस्पेशालिटी रुग्णालय
तंबाखू नियंत्रणासाठी राज्यात अनेक उपक्रम राबवले जात आहेत. यामुळे मृत्यू आणि व्यसनाधीन होण्याचे प्रमाण कमी होईल. १० वर्षे वयोगटातील लहान मुले आता तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करताना आढळत आहेत.
- डॉ. एकनाथ माले, सहसंचालक, असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.