तरुणाईकडून हिंसाचाराच्या घटना घडत असल्यामागची कारणमीमांसा आणि धोक्याची लक्षणं आपण गेल्या भागात बघितली. आता इतर गोष्टी बघूया.
पालक कशी मदत करू शकतात?
मुळात आपलं वर्तन चांगलं ठेवणं, आपण मुलांसाठी रोल मॉडेल बनणं महत्त्वाचं आहे. लहानपणापासून मुलांना घरात प्रेम, विश्वास आणि शिस्त यांचा योग्य समन्वय अनुभवायला मिळावा.
मुलांशी नातं इतकं विश्वासाचं हवं, की त्यांना पालकांशी मोकळेपणानं प्रॉब्लेम्स बोलता यावेत. ती भावनिक असतील तर वेळेवर तज्ज्ञांची मदत घ्यावी.
मुलांसमोर कुठल्याही प्रकारचे वादविवाद, भांडणं टाळावीत.
मुलं बाहेर काय करतात, त्यांचे मित्र-मैत्रिणी, सवयी यांची त्यांच्या नकळत चौकशी करावी.
मुलांना दिले जाणारे पैसे अवाजवी नाहीत आणि त्याचा योग्य विनियोग होतोय याकडे लक्ष द्यावं. याचा अर्थ पोलिसिंग करावं असा नाही किंवा पैसे देऊच नयेत असाही नाही.
शक्यतो घरामध्ये हिंसा व सेक्स असणारे मीडिया मुलांसमोर पाहू नयेत. इंटरनेटच्या काही साइट्स ब्लॉक कराव्यात.
लहानपणापासून मुलांना तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापरच शिकवावा.
मुलांची निगेटिव्ह एनर्जी भरपूर व्यायाम आणि कला यांच्या द्वारे चॅनेलाइज होईल याकडे लक्ष ठेवावं.
मुलांशी मैत्री करावी. आपल्या सहवासात त्यांना सुरक्षित वाटेल असा प्रयत्न करावा. मुलांचं म्हणणं शांतपणे ऐकून घ्यावं.
तज्ज्ञांची मदत
गरज भासल्यास औषधोपचारांबरोबरच वेगवेगळ्या थेरपीज उपयुक्त ठरू शकतात. सीबीटी व इतर थेरपीज द्वारा विचार व कृती करण्याच्या पद्धतीत बदल करता येऊ शकतात. अर्थात हे केसवरही अवलंबून असतं. रिलॅक्सेशन थेरपीज, रागावर नियंत्रणाच्या पद्धती, नकारात्मक विचारसरणी बदलून सकारात्मक विचारसरणी प्रस्थापित व्हायला मदत होऊ शकते. ‘राग’ ही बऱ्याचदा सेकंड इमोशन असते. असुरक्षितता, अस्वस्थता, भीती, अपराधीपणाची भावना वगैरे प्रायमरी इमोशन्स त्याच्या मुळाशी असू शकतात. अशा समस्या आधी सोडवणं महत्त्वाचं असतं.
मुलांसाठी सांगणं
1) राग ही नैसर्गिक भावना आहे. ती दाबून ठेवू नये; पण हिंसात्मक किंवा आक्रमक रीतीनं ती व्यक्त केली पाहिजे असं नाही. सुसंस्कृतपणे म्हणणं व्यक्त करता येणं महत्त्वाचं. राग आक्रमक पद्धतीनं व्यक्त झाल्यास स्वत:चं शारीरिक, मानसिक आणि भावनिक नुकसानच होतं.
2) इतरांना शारीरिक, मानसिक त्रास दिल्यानं तुम्ही मोठे किंवा श्रेष्ठ ठरत नाही. उलट स्वत:विषयी वाईट मत करून घेता.
3) सगळे तुमच्याच म्हणण्याप्रमाणे वागतील, परिस्थिती तुम्हाला हवी तशीच असेल असं नसतं. तुमची प्रतिक्रिया तुमच्याच हातात असते. तुम्ही स्वत:च्या रागाचं व्यवस्थापन निश्चित करू शकता.
4) अती राग तुमच्या करिअरचं, आयुष्याचं कधीही भरून न निघणारं नुकसान करू शकतो.
5) तुम्ही व्यसनाच्या आहारी गेला असाल, तर त्वरित तज्ज्ञांची मदत घ्या.
या गोष्टी लक्षात घ्या
तुम्हाला सतत अस्वस्थ किंवा हतबल वाटतं का? विनाकारण सारखा राग येतो का? रागामुळे तुमची मैत्री, नाती तुटतायत का? कायदे मोडले जातायत का? इतरांना शारीरिक दुखापत करावीशी वाटते का? मदत मागायला लाजू नका, त्यात कमीपणा माणू नका. योग्य उपायांनी, अतिरागाच्या, हिंसात्मक वृत्ती आणि कृतीच्या दुष्टचक्रातून तुम्ही सुटू शकाल.
शाळा व सामाजिक संस्थांचा सहभाग
आज फोफावत चाललेल्या या विषवल्लीचे परिणाम पुढील काळात संपूर्ण समाजाला भोगावे लागू शकतात. त्यासाठीच शाळा व्यवस्थापन आणि सामाजिक संस्था यांनी निकोप मानसिक विकास, रागाचं व एकूणच नकारात्मक भावनांचं व्यवस्थापन यासाठी उपक्रम हाती घ्यायला हवेत. त्यासाठी मुलांसाठी, पालकांसाठी तज्ज्ञांची व्याख्यानं, कार्यशाळा, स्व-मदत गट असे उपाय योजण्याची गरज आहे.
विविध माध्यमांद्वारे सहज उपलब्ध असलेली, लैंगिकदृष्ट्या उत्तेजित करणारी सवंग करमणूक आणि त्या भावनेचं शमन होण्यासाठी चुकीचे मार्ग, सुख मिळवण्याच्या चुकीच्या कल्पना. स्पर्धात्मक वातावरणाचा ताण. खरं सुख भौतिक सुखातच आहे. दिलं तर सरळ नाहीतर ओरबाडून. त्यासाठी मी आक्रमक व्हायलाच हवं. इतरांनी माझ्या मनासारखं वागायलाच हवं. आज दुर्दैवानं अनेक मुलांची ही मानसिकता झाली आहे. आनंद व मन:शांतीसाठी रागासारख्या नकारात्मक भावनांवर नियंत्रण कसं मिळवायचं हे म्हणूनच समजून घ्यायला हवं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.