Weekly Horoscope
Weekly HoroscopeSakal

साप्ताहिक राशिभविष्य (११ डिसेंबर २०२२ ते १७ डिसेंबर २०२२)

स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ; तसंच देव, मनुष्य आणि राक्षस अशा विविध पातळ्यांवरून हा विश्वप्रपंच थाटला किंवा मांडला गेला आहे.
Published on

नियमभंग करू नका

मेष : हा सप्ताह अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींना जनसंपर्कातून छान राहील. ता. ११ व १२ हे दिवस महत्त्वाच्या गाठीभेटींतून फलदायी होणारे. वास्तुविषयक व्यवहार होतील. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना वक्री मंगळाची आचारसंहिता पाळावी लागेलच. अट्टहास किंवा कोणताही नियमभंग नको. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींवर उगाचंच काल्पनिक भयभीतीचा पगडा राहू शकतो.

नोकरीत लाभाचा काळ

वृषभ : सप्ताहाच्या सुरुवातीला कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना शुभग्रहांच्या पॅकेजचा लाभ होईल. वैयक्तिक आदरसत्कार होतील. ता. १५ चा गुरुवार संतसंगतीचा. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १३ चा मंगळवार मंगळाच्या उच्च दाबाचा. नवपरिणितांनी घरात वागताना काळजी घ्यावी. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात यंत्र वा वाहनपीडा सतावेल. बाकी नोकरीत परिस्थितिजन्य लाभ.

कुसंगती टाळा

मिथुन : सप्ताहात गुरूची शक्तिस्पंदनं खेचून घेणारी रास. मृग नक्षत्राच्या व्यक्ती शुभ घटनांतून फ्लॅश न्यूजमध्ये येतील. सप्ताहारंभ चौकार - षटकारांचा. ता. १४ व ता. १५ हे दिवस अतिशय छान, गतिमान राहतील. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींचं मार्केटिंग यशस्वी होईल. मात्र, कुसंगत आणि व्यसनं टाळा. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात देवदर्शन!

संसर्गापासून जपा

कर्क : सप्ताहात हवापाण्यातील संसर्गापासून काळजी घ्या. सहवासातील व्रात्य लहान मुलांना जपा. बाकी पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींच्या आयुष्यात ता. ११ व १२ हे दिवस चमत्कार घडवतील. उद्याच्या सोमवारी भाग्य उजळेल. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्ती पुत्रोत्कर्षामुळे आनंदित होतील. आश्लेषा नक्षत्राच्या व्यक्तींनी सरकारी कायदेकानूंचं उल्लंघन टाळावं. स्त्रीवर्गाशी जपून वागा.

सरकारी कामं होतील

सिंह : हा सप्ताह बुद्धिजीवींना उत्तमच. कला, छंद वा इतर शैक्षणिक उपक्रमांद्वारे जोरदार वाटचाल. मघा नक्षत्राच्या व्यक्तींचं परदेशगमन. व्हिसा मिळेल. ता. १४ ते १६ हे दिवस मोठे मजेदार राहतील. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींची सरकारी कामं मार्गी लागतील. व्यावसायिक भागीदारीचे प्रश्न जपून हाताळा. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींनी भावजीवनात गैरसमज टाळावेत.

उत्तम नोकरीचा लाभ

कन्या : सप्ताहात वैयक्तिक उपक्रम प्रचंड गती घेतील. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना उत्तम नोकरीचा लाभ. उद्याचा सोमवार भाग्य घेऊन येणारा. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना शुभग्रहांची मंत्रालयं अतिशय साथ देतील. और क्या! चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींनी ता. १३ च्या मंगळवारी यंत्र-वाहनांपासून काळजी घ्यावी.

परदेशात भाग्योदय होईल

तूळ : सप्ताहात वक्री मंगळाच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता पाळावीच लागेल. तरुणांनो, कोणतीही मस्ती नको. बाकी सप्ताहारंभ नोकरीत शुभलक्षणी ठरेल. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीच्या संधी. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींसाठी ता. १५ व १६ हे दिवस हृद्य राहतील. परदेशात भाग्योदय होईल. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १३ चा मंगळवार हाय व्होल्टेजचा.

व्यावसायिक आवक उत्तम

वृश्चिक : सप्ताहात व्यावसायिक आवक उत्तमच राहील. ता. ११ व १२ हे दिवस मोठी भाग्यबीजं पेरतील. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींचं तारुण्य खुलेल! विशिष्ट कलाप्रदर्शन कराल. ता. १५ चा गुरुवार गुरुप्रचितीचाच. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींच्या उत्तम गाठीभेटी होतील. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींनी सप्ताहात ज्येष्ठांशी वाद टाळावेत.

नोकरीत कर्तृत्व गाजवाल

धनू : राशीतील बुध-शुक्राची खेळी मजेदार राहील. नोकरीत कर्तृत्व गाजवाल. मूळ नक्षत्राच्या व्यक्ती ता. १५ व १६ रोजी मौज-मजा अनुभवतील. मात्र ता. १३ चा मंगळवार हाय व्होल्टेजचाच. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींनी आपलं भावजीवन जपावं. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींनी सप्ताहात वेंधळेपणा टाळावा. विद्युत उपकरणांपासून सावध.

मानसिक पर्यावरण जपा

मकर : सप्ताहात आपलं मानसिक पर्यावरण जपा. गुरुभ्रमणाची कनेक्टिव्हिटी ठेवण्याचा प्रयत्न कराच. नवपरिणितांना मंगळाचं हाय व्होल्टेज वादळी ठरू शकतं. गैरसमज टाळा. बाकी सप्ताहारंभ उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना प्रसन्न ठेवणारा. प्रवासातील कामं होतील. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींनी मंगळवारी राजकारणापासून दूर राहावं. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींनी प्रेम प्रकरण जपूनच करावं.

सतत ऑनलाइन राहा!

कुंभ : सप्ताहातील ग्रहमान उपजत गुणांना वावच देणारं. ता. १४ ते १६ हे दिवस तरुणांना उत्तम संधीचे. शिक्षण, नोकरी वा विवाह या माध्यमांतूनही सतत ऑनलाइन राहा. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्ती कात टाकणार आहेत. अर्थातच तारुण्याचा बहर अनुभवणार आहेत. शततारका नक्षत्राच्या व्यक्ती कलागुणांतून प्रसिद्धी मिळवतील. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींनी सहलीच्या वेळी काळजी घ्यावी.

दमदार वाटचाल

मीन : जीवनातील एक दमदार वाटचाल सुरू होईल. साडेसातीविषयीचे गैरसमज टाळा. गुरूवर श्रद्धा ठेवणाऱ्या व्यक्तींचा साडेसातीत उत्कर्षच होतो. सध्या आपणास गुरू-शनीचं पाठबळ जबरदस्त आहे. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना ते चांगलंच जाणवेल. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींनी सप्ताहात नकारात्मक विचार टाळावेतच.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.