Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य (१३ ऑक्टोबर २०२४ ते १९ ऑक्टोबर २०२४)
ज्ञानप्रकाशाच्या दीपावलीकडं वाटचाल हवी
हा जगद्व्यापार हा गोचराचा एक धंदा असल्यासारखंच आहे. क्रिया-प्रतिक्रिया यातून उद्भवणारं माणसचं जीवन म्हणजे एक प्रचंड गुंतागुंत आहे. माणसाचे जीवन आधी अनुभवाला येतं आणि नंतर ते व्यक्तित्त्वाला येतं आणि ते व्यक्तित्त्व बोलकं होऊन ज्या वेळी ते प्रचाराला येतं, त्या वेळी त्याचं ते गोचर होणं हा एक धंदा होतो किंवा तो तसा बनत जातो!
दृश्य प्रपंचात न अडकणारा माणूस मौन स्वीकारत असतो; परंतु मौनात जाणारा माणूस स्वतःच स्वतःशी ज्या वेळी बोलत राहतो, त्या वेळी मौन हे एक त्याची घुसमट होते. मौन धरतं कोण, याचा विचार करणारा माणूस हा विचार करता-करता ज्या वेळी तो माणूस मौनाचेही मौन साधतो त्या वेळी ते खरे मौन होते.
हे मौनाचेही मौन साधणारे मनाचे मौन आत्मचैतन्याशी जवळीक साधत खरी कोजागरी पौर्णिमा साजरी करत असते. मन ज्या वेळी आत्मरंगी रंगते त्या वेळीच ती खरी विश्रांतीची विश्रांती ठरत असते. माणसाला या भयंकर कलियुगात मनाच्या मौनाच्या खऱ्या विश्रांतीची गरज असते किंवा या विश्रांतीची नितांत गरज निर्माण झाली आहे. ज्ञानेश्वरी आणि दासबोध हे ग्रंथ अशा विश्रांतीची विश्रांती कशी घ्यावी हेच सांगून राहिले आहेत.
।। जेथे मुराले मीपण। तेचि अनुभवाची खूण।। - दासबोध
मीपणा गेल्यावर माणसाच्या मनाचा अंतर्बाह्य होणारा गोचराचा धंदा किंवा या गोचराशी संबंधित असलेला आंतरिक संवाद संपतो त्याच वेळी माणूस प्रज्ञेच्या माजघरात विश्रांतीची विश्रांती घेतो आणि अंतरीच्या परमेश्वराला निवांतपणे नमन करत, अनुभवाच्या खुणेने ध्यानमग्न होत जीवनातील खरी कोजागरी पौर्णिमा साजरी करतो, असे ज्ञानदेवही म्हणतात!
मित्र हो, आपल्या संस्कृतीत नवरात्र आणि दीपावली हे सण हेच सांगतात, की माणसाने ज्ञानप्रकाशाच्या दीपावलीकडेच वाटचाल केली पाहिजे आणि या भयंकर ‘कलिग्रासतो भूत’ अशा कलियुगातील नरकवासातून बाहेर पडले पाहिजे आणि पुढं अर्थातच त्रिपुरारी पौर्णिमा साजरी केली पाहिजे.
बॅंकांचं कर्ज मंजूर होईल
मेष : सप्ताहातील ग्रहांचं फिल्ड जीवनाच्या मैदानावर फक्त टिकून राहण्याचेच! फक्त अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींना विशिष्ट परिस्थितीजन्य लाभ होतील. जुन्या गुंतवणुकींतून लाभ शक्य. काहींना बँकेची कर्जे मंजूर होतील. कोजागरी पौर्णिमा तरुणांना शैक्षणिक चिंता घालवणारी. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहारंभ व्यावसायिक सरकारी कामांतून यश देणारा. पुत्रचिंता जाईल. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमेचे प्रभावक्षेत्र संमिश्र स्वरूपाची फळे देईल. घरात सुवार्तांचा भर. मात्र सार्वजनिक जीवनात सांभाळा.
नोकरीत वरिष्ठांचं सहकार्य मिळेल
वृषभ : शुक्राचं भ्रमण सप्ताहारंभी तरुणांना अतिशय फलदायी होईल. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्ती वैवाहिक जीवनात आनंद साजरा करतील. काहींना शेअर मार्केटमधून लाभ होतील. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना देवदर्शन घडेल. ता. १४ व १५ हे दिवस चमत्कार घडवतील. गर्भवतींची चिंता जाईल. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमेचं प्रभावक्षेत्र मोठे अकल्पित लाभ देईल. नोकरीतील विरोध मावळेल. नोकरीत वरिष्ठांची कृपा संपादन कराल. मात्र भातृचिंता भेडसावेल.
शॉर्टकटचा अवलंब नकोच
मिथुन : सप्ताहातील ग्रहांचं फिल्ड फलंदाजीचंच नाहीच. आहे ते फक्त सांभाळा. कोणताही शॉर्टकट मारू नका. अर्थातच जुगार नकोच. बाकी सप्ताह स्वतंत्र व्यावसायिकांना मोठे परिस्थितीजन्य लाभ देईल. पुनर्वसु नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमेचे प्रभावक्षेत्र मोठे नावीन्यपूर्ण फळे देईल. पुत्रोत्कर्षातून धन्यता मिळेल. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहारंभ ओळखी-मध्यस्थीतून मोठा फलदायी होईल. मंत्रालयातील कनेक्टिव्हिटी साधाल. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवार धनवर्षावाचा. मोठी व्यावसायिक वसुली.
मान- मरातब मिळेल
कर्क : सप्ताहात राशींच्या एक्स्चेंजमध्ये जोरदार मुसंडी मारणारी रास राहील. आश्लेषा नक्षत्र ‘मॅन ऑफ दि मॅच’ होईल. सप्ताहाचा आरंभ आणि शेवट विक्रमी राहील. पौर्णिमेचं प्रभावक्षेत्र दैवी प्रचितीचंच. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट मोठे मानमरातब देईल. मात्र सप्ताहात पर्यटनक्षेत्री सांभाळावे. पंचमहाभुतांशी अतिरेक नको. पुनर्वसु नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमा भावरम्य राहील. उत्सव-समारंभातून छान उपस्थिती राहील.
मोठे व्यावसायिक लाभ होतील
सिंह : रवी-गुरुचा शुभयोग. सप्ताहावर अर्थातच पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात मोठी मजेदार फळे देईल. सप्ताहाचा आरंभ आणि शेवट मोठी विलक्षण शुभफळे देईल. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना मोठे व्यावसायिक लाभ होतील. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना आजची रविवार संध्याकाळ मोठी प्रसन्न राहील. उंची खरेदी होईल. काहींना अकस्मात गाठीभेटींतून लाभ. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १८ चा शुक्रवार एकूणच मोठे भाग्यसंकेत देणारा. प्रेमिकांच्या हृद्य गाठीभेटी ! व्यावसायिक स्वरूपाचे वास्तुयोग येतील.
परदेशासाठी व्हिसा मिळेल
कन्या : सप्ताहात शुभग्रहांची लॉबी पूर्णपणे कार्यरत राहील. सतत सुवार्तांतून फ्लॅशन्यूज द्याल. उत्तरा नक्षत्राच्या कलाकारांचे मोठे भाग्योदय होतील. सप्ताहाची सुरुवात एकूणच आपल्या राशीस मोठ्या संधी देणारा. काहींना परदेशी व्हिसा मिळेल. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींचे पौर्णिमेचे प्रभावक्षेत्र मोठे चमत्कार घडवेल. वैवाहिक जीवनात मोठा आनंद साजरा कराल. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींनी सप्ताहात नोकरीतील राजकारण जपावे किंवा सांभाळावे.
आर्थिक कोंडी संपेल
तूळ : सप्ताहातील पौर्णिमेचे प्रभावक्षेत्र अतिशय संमिश्र स्वरूपाची फळे देईल. घरातील भावजीवन जपा. भावा-बहिणींशी वाद नकोत. सप्ताहात व्यावसायिक शॉर्टकट किंवा जुगार टाळा. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींनी सार्वजनिक जीवनात आचारसंहिता पाळावी. बाकी सप्ताहारंभी स्वतंत्र व्यावसायिकांना नव्या ओळखी-मध्यस्थींतून लाभ होतील. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींचा सप्ताहारंभ आर्थिक कोंडी घालवणारा. पती वा पत्नीचा भाग्योदय. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवार वैयक्तिक मोठ्या सुवार्तांचा. आरोग्यचिंता जाईल.
नोकरीतील घुसमट जाईल
वृश्चिक : सप्ताहाचा आरंभ धन्य करणाऱ्या सुवार्तांचा. तरुणांना पौर्णिमेचा हा सप्ताह चंद्रकलांतून छानच वातावरण निर्माण करेल. विवाहेच्छूंना सप्ताह पर्वणीसारखा. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींची नोकरीतील घुसमट जाईल. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी ता. १४ ते १६ हे दिवस अतिशय गतिमान राहतील. विशिष्ट कायदेशीर प्रश्नातून सुटका होईल. पौर्णिमेचे प्रभावक्षेत्र घरातील सुवार्तांतून धन्य करेल. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमा व्यावसायिक लॉटरीची. सरकारी माध्यमातून लाभ.
विक्रमी यशाचा कालखंड
धनु : पौर्णिमेचा सप्ताह नोकरदारांना छान फलदायी होईल. काहींना उत्तम नोकरीच्या संधी येतील. सप्ताहारंभ व्यावसायिकांना आर्थिक कोंडीतून मुक्त करेल. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट घरातील तरुणांच्या उत्कर्षाचा. पौर्णिमेजवळ सहकुटुंब उत्तम प्रवासयोग. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १४ व १५ ऑक्टोबर हे दिवस विक्रमी यशाचे. काहींचे परदेशी भाग्योदय. सप्ताहात उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींनी पौर्णिमेजवळ घरात भांडणे टाळावीतच. नवपरिणितांनी जपावे.
अपूर्व संधी येतील
मकर : सप्ताहातील चंद्रकलांचा भावनिक पातळीवरून मोठा आस्वाद घ्याल. सप्ताहाचा आरंभ आणि शेवट त्यातूनच उसळी घेणारा ठरणार आहे. त्यामुळेच श्रद्धावंतांना मोठी प्रचिती देणाराच सप्ताह. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात अपूर्व संधी येतील. विद्यार्थी, कलावंत आणि व्यावसायिक यांना त्यांच्या अथक प्रयत्नांना यश देणारी पौर्णिमा. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींचा नोकरीत भाग्योदय. ता. १५ ते १७ हे दिवस जनसंपर्कातून लाभ देतील. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवार नवस पूर्ण करणारा.
विवाहयोग व नोकरीची शक्यता
कुंभ : पौर्णिमेजवळ ग्रहांची फिल्ड ॲरेंजमेंट आपणाला अतिशय पूरकच राहील. सप्ताहातील शुभग्रहांची स्पंदने भावविश्वातील भावबंधने घट्ट करतील. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना बलवत्तर असे विवाहयोग. होतकरू तरुणांना मुलाखतींतून नोकरीचा उत्तम योग. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमेजवळ बँकेचे कर्ज मिळेल. नवपरिणितांचे प्रश्न सुटतील. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमा मोठ्या दैवी प्रचितिची.
व्यावसायिक उपक्रमांना यश येईल
मीन : सप्ताहातील पौर्णिमा मोठ्या भावोन्मेषाची ठरेल. ता. १५ ते १७ हे दिवस वैयक्तिक सुवार्तांची परंपरा ठेवतील. तरुणांना पौर्णिमेचे प्रभावक्षेत्र नैराश्य घालवेल. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा समारोप मोठे समाधान देणारा राहील. नोकरीतील भाग्योदय चकित करेल. उत्तरा-भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींचे व्यावसायिक उपक्रम यशस्वी होतील. मात्र पौर्णिमेजवळ भाजणे-कापणे जपा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.