weekly horoscope
weekly horoscope Sakal

Weekly Horoscope 2024 : साप्ताहिक राशिभविष्य (29 सप्टेंबर 2024 ते 5 ऑक्टोबर 2024)

weekly Rashi bhavishya : सप्ताह आरोग्यविषयक बाबींतून कटकटीचा. अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींना वेदनायुक्त आजारांतून त्रासाचा. शुक्रभ्रमण सप्ताहारंभी आणि शेवटी भरणी नक्षत्राच्या व्यक्तींची आर्थिक कोंडी घालवतील.
Published on

वास्तुविषयक खरेदी-विक्रींतून लाभ

मेष : सप्ताह आरोग्यविषयक बाबींतून कटकटीचा. अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींना वेदनायुक्त आजारांतून त्रासाचा. शुक्रभ्रमण सप्ताहारंभी आणि शेवटी भरणी नक्षत्राच्या व्यक्तींची आर्थिक कोंडी घालवतील. बँकांची कामे होतील. नवरात्र आनंदात सुरू होईल. पती वा पत्नीच्या उत्कर्षातून जल्लोष. काहींना वास्तुविषयक खरेदी-विक्रींतून मोठे लाभ. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींचा सप्ताहाचा शेवट विशिष्ट स्वप्न पूर्ण करेल.

सरकारी कामांमध्ये यश

वृषभ : सप्ताह कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना जुगारसदृश व्यवहारांतून नुकसान करणारा. मित्रांकडून फसगतीचा कालखंड. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना बुधवारच्या सर्वपित्री अमावस्येजवळ प्रिय व्यक्तींच्या गुप्तचिंता राहतील. गर्भवतींना अन्न-पाण्यातील संसर्गातून त्रास शक्य. घटस्थापना वैयक्तिक सुवार्तांची. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना व्यावसायिक-सरकारी कामांतून यश. तरुणांना ओळखींतून नोकरीचा लाभ होईल.

आचारसंहितेचे पालन कराच

मिथुन : न दिसणाऱ्या सूर्यग्रहणाच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता पाळावी लागेल. नोकरीत वरिष्ठांशी नमते घ्या. सरकारी नियम पाळा. रोख पैसे जपा. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींनी सार्वजनिक जीवनात जपून राहावे. राजकीय गुंडांशी हुज्जती नकोत. बाकी ता. २ ते ५ हे दिवस तरुणांना छानच राहतील. कलाकारांचे आर्थिक उत्कर्ष होतील. पुनर्वसु नक्षत्राच्या व्यक्तींना नवरात्रारंभ विवाहविषयक गाठीभेटी यशस्वी करणारा आहे. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना आजचा रविवार विचित्र नुकसानीचा ठरण्याची शक्यता.

नोकरीतल्या अडचणी संपतील

कर्क : यंदाचा नवरात्रारंभ मोठा प्रसन्न राहील. काहींचे नूतन वास्तुप्रवेश होतील. पुष्य नक्षत्राच्या व्यक्ती विशिष्ट विक्रमातून फ्लॅशन्यूज देतील. घटस्थापना जीवनात स्थैर्य देणारी. तरुणांच्या नोकरीतील अडचणी जातील. आश्लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना जुन्या गुंतवणुकींतून लाभ होईल. काहींचे कायदेशीर प्रश्न सुटतील. घरातील होतकरू तरुणांचे जीवन मार्गस्थ होईल. मात्र सप्ताहात व्यसनी व्यक्तींनी सावधान राहावे. कुसंगत नकोच.

उत्सव-प्रदर्शनं यशस्वी होतील

सिंह : ग्रहांचे फिल्ड यंदाचे नवरात्र गाजवेल. सतत वैयक्तिक उत्सव होतील. नोकरीत मोठे मानांकन प्राप्त कराल. घटस्थापनेचा गुरुवार झगमगाटी राहील. व्यावसायिक प्रदर्शने यशस्वी होतील. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ३ ते ५ हे दिवस चढत्या क्रमाने शुभ. तरुणांना कॅम्पसमधून नोकरी. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना पुत्रोत्कर्षातून धन्यता. मघा नक्षत्राच्या व्यक्तींनी सर्वपित्री अमावास्येजवळ प्रवासात सांभाळावे.

नोकरीत वरिष्ठांची मर्जी राहील

कन्या : अमावस्येचे विचित्र प्रभावक्षेत्र राहील. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींचा मनःक्षोभ शक्य. वागण्या-बोलण्यातून संयम ठेवा. नवपरिणितांनी जपावं. नवरात्रात शुभग्रहांचे पॅकेज राहीलच. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना घटस्थापनेचा दिवस रंजक. प्रिय व्यक्तींचा सहवास. नोकरीत वरिष्ठांची कृपा. पती वा पत्नीचा भाग्योदय. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना नक्षत्र लोकांतूनच लाभ. उंची खरेदी कराल. उत्सव-समारंभातून मिरवाल.

बदलीमधून लाभ होतील

तूळ : नवरात्रात शुभकलांची दीप्ती राहील. व्यावसायिक शत्रुत्व शमेल. सप्ताहाचा शेवट मोठा झगमगाटी राहील. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींचे नोकरीतील प्रदूषण जाईल. काहींना बदलीतून लाभ. नवपरिणितांचे भावजीवन समृद्ध होईल. ता. ४ व ५ हे दिवस कलाकारांचा झकास सूर लावून देतील. प्रेमिकांची प्रेमस्पंदने फलद्रूप होतील. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना एखादा नैतिक विजय प्राप्त होईल. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना अमावस्या प्रवासात बेरंग करू शकते.

बॅंका व सरकारी कामं होतील

वृश्चिक : अमावस्येची पार्श्वभूमी विचित्र गाठीभेटी घडवू शकते. शेजाऱ्यांशी वाद नकोत. अनुराधा नक्षत्राच्या स्त्रीवर्गाने मौनच पाळावे. नवरात्राची सुरुवात आपल्या राशीस उत्तमच. व्यावसायिक उत्सव-प्रदर्शनांतून उत्तम प्रतिसाद मिळेल. ज्येष्ठा नक्षत्रास घटस्थापनेचा दिवस संकटनिवारण करणारा. काहींना सरकारी माध्यमातून लाभ होतील. बँकेची कामे होतील. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना अमावस्या एकूणच प्रदूषणाची.

शैक्षणिक अपयशाची भरपाई होईल

धनु : अमावस्या पर्यावरण बिघडवणारीच. यंत्रं, वाहनं आणि कामगार इत्यादींतून बेरंग करणारी. अमावस्येचे भान मूळ नक्षत्राच्या व्यक्तींनी ठेवावे. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींनी स्त्रीवर्गाची मने जपावी. नवरात्रीचा आरंभ नोकरी-व्यावसायिक पार्श्वभूमी चांगलीच ठेवेल. मुलाखती यशस्वी होतील. शैक्षणिक अपयश धुवून काढाल. काहींना सरकारी माध्यमांतून लाभ. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींचा अनपेक्षित सन्मान.

व्यावसायिकांसाठी पर्वणीचा कालखंड

मकर : यंदाचे नवरात्र ऋद्धीसिद्धींचा लाभ देणारे. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींचे जीवन चांगलेच फुलारेल. अर्थातच जीवनकला वृद्धिंगत होईल. व्यावसायिकांना नवरात्र म्हणजे एक पर्वणीच राहील. उत्तम नवे पर्याय पुढे येतील. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना अमावस्येजवळ दुखण्या-खुपण्याचे प्रसंग येऊ शकतात. काहींना अग्निभय. बाकी सप्ताह मोठा गोड राहील. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना व्यावसायिक वसुलीतून लाभ होतील.

आरोग्यविषयक पथ्यं पाळावीत

कुंभ : सप्ताहात शुक्र-शनी शुभ योगाची पार्श्वभूमी राहील. स्वतंत्र व्यावसायिकांना नवरात्रात शुभग्रहांची उत्तम साथ. घरातील सुवार्तांचा एक माहोल राहील. सप्ताहाचा आरंभ आणि शेवट कर्तृत्वाला झळाळी देणारा. पूर्वा-भाद्रपदा नक्षत्रास व्यक्तींना राजमान्यता मिळेल. अर्थातच सरकारी अनुदानातून लाभ. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना घटस्थापनेचा दिवस सुवार्तांतून मोठा प्रसन्न राहील. मात्र अमावस्येच्या प्रभावक्षेत्रात आरोग्यविषयक पथ्ये पाळा. गर्भवतींनी सांभाळावे.

वाहनापासून सांभाळा, मस्ती टाळा

मीन : अमावस्येचे प्रभावक्षेत्र पर्यावरण बिघडवू शकते. उत्तरा-भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना त्याच्या झळा बसू शकतात. तरुणांनी मस्ती टाळावी. वाहने सांभाळावी. बाकी नवरात्रारंभ गुरुच्या अधिष्ठानातूनच फळे देईल. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना व्यावसायिक उपक्रमांतून लाभ होतील. नवपरिणितांना निश्चितच उभारी मिळेल. तरुणांचे विवाहातील अडसर दूर होतील. उत्तम विवाहस्थळे येतील, जादा चिकित्सा करू नका.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.