पारोळा (जि. जळगाव) : समग्र शिक्षा अभियान (Samagra Shiksha Abhiyan) अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तक (Textbook) वाटप योजनेतंर्गत पारोळा तालुक्यातील १६७ पात्र शाळांमधील (Schools) पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी सेमी व मराठी माध्यमातील १ लाख ४० हजार ३४३ पुस्तके प्राप्त झाली आहेत. शाळेच्या पहिल्याच दिवशी सर्व विद्यार्थ्यांना ही पाठ्यपुस्तके दिली जाणार आहेत. त्यादृष्टीने वाटपाचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी कविता सुर्वे यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली. (1 and half lakh textbooks received for distribution scheme under Samagra Shiksha Abhiyan in parola Jalgaon News)
तालुक्यातील शाळांमध्ये केंद्रनिहाय पाठ्यपुस्तकांच्या वाटपाचे नियोजन येथील गटसाधन केंद्राकडून करण्यात आले आहे. शुक्रवारी (ता. ३) मंगरूळ, चोरवड व सार्वे या तीन केंद्रांतर्गत येणाऱ्या ४९ शाळांना वाहनांद्वारे थेट शाळांवर विद्यार्थी संख्या व मागणीनुसार त्या त्या शाळांवर पाठ्यपुस्तके पोच करण्यात आली आहेत. ज्यामुळे मुख्याध्यापक व शिक्षकांना वाहनाने पुस्तके घेऊन जाण्याचा त्रास वाचला आहे. थेट शाळांवरच पुस्तके पोच आल्याने मुख्याध्यापकांसह शिक्षकांनी समाधान व्यक्त केले आहे. उर्वरित केंद्रांवर साधारणतः दोन दिवसांत थेट शाळास्तरावरच सर्व पाठ्यपुस्तके पोच करण्यात येतील, असेही गटशिक्षणाधिकारी कविता सुर्वे यांनी सांगितले. पाठ्यपुस्तके वितरणासाठी गटशिक्षणाधिकारी कविता सुर्वे यांच्यासह सर्व विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख गोविंद मिस्त्री, गटसाधन केंद्रातील नितेश निकम तसेच समावेशीत तज्ज्ञ व विषय शिक्षकांचे सहकार्य लाभले आहे.
पहिली ते आठवी इयत्तानिहाय उपलब्ध पाठयपुस्तके
इयत्ता पाठ्यपुस्तक संख्या
१ ली ......... २,६९८
२ री .......... २,६९८
३ री .......... २,८९७
४ थी ......... २,९८४
५ वी ......... २,९९८
६ वी ......... २,५३०
७ वी ......... २,७५१
८ वी ......... २,३३३
"शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी प्रत्येक विद्यार्थ्याला शाळेतून मोफत पाठ्यपुस्तके मिळावीत यासाठी गटसाधन केंद्रामार्फत वाहनांची व्यवस्था करून ७ जूनपर्यंत थेट शाळा स्तरावर पुस्तके वितरित करण्याचे नियोजन केले आहे. मुख्याध्यापकांनी आपापल्या शाळेवर थांबून नियोजनानुसार पाठ्यपुस्तके ताब्यात घ्यावीत. एकही विद्यार्थी पाठ्यपुस्तकांपासून वंचित राहणार नाही याची काळजी घेतली जाईल."
- कविता सुर्वे, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, पारोळा
"यावर्षी गटसाधन केंद्रावरून वाहनांद्वारे केंद्रनिहाय त्या त्या शाळांना थेट शाळेतच पुस्तके उपलब्ध होणार असल्याने भाड्याने वाहने करा, पुस्तके शाळेवर घेऊन या याचा त्रास तर वाचला आहे. शिवाय आर्थिक खर्चही वाचला आहे. गटसाधन केंद्रामार्फत थेट शाळेतच ही पुस्तके येत असल्याने त्यांचे विद्यार्थ्यांना वाटर करताना देखील आम्हाला सोयीचे होणार आहे."
- प्रशांत पाटील, मुख्याध्यापक ः जिल्हा परिषद शाळा, भोंडणदिगर (ता. पारोळा)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.