Jalgaon Cyber Fraud: फोटोंना ‘लाईक' करण्यासह पैसे गुंतवणुकीचे ‘टास्क' देऊन जिल्हा शासकीय वैद्यकीय रुग्णालयात कार्यरत डॉ. प्रणव सामृतवार यांना १२ लाख ४२ हजारात ऑनलाइन गंडविल्याची घटना घडली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
उमरसरा (जि.यवतमाळ) येथील मूळ रहिवासी असलेले डॉ. प्रणव परशुराम सामृतवार जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालय तथा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत आहेत. (12 lakh 42 thousand online scam to gmc doctor jalgaon news)
तसेच सध्या ते महाविद्यालयाच्या परिसरात शासकीय निवासस्थानात वास्तव्यास आहेत. ९ ते २४ नोव्हेंबरदरम्यान त्यांना ‘टेलीग्राम'वर एक ‘लिंक' आली.
त्यांनी ती ‘लिंक ओपन' केल्यानंतर त्यांना ‘टास्क' देण्यात आला. त्यानंतर ऑनलाइन सक्रिय सायबर गुन्हेगारांनी या ‘लिंक'द्वारे डॉ. सामृतवार यांच्याशी संपर्क करून त्यांना पाठवलेल्या ‘लिंक'वरील फोटोला ‘लाईक' करण्याचा ‘टास्क' दिला. त्यामध्ये पैसे गुंतवणूक करून सुरुवातीला त्यांना ९ हजार १५० रुपये देऊन त्यांचा विश्वास संपादन केला.
सायबर ठकबाजांनी दिलेले ‘टास्क' डॉक्टरांनी पूर्ण झाल्यावर पहिल्यांदा त्यांना पैसे मिळाले. त्यामुळे समोरील व्यक्तीने सांगितल्याप्रमाणे डॉक्टरांनी त्यामध्ये पैसे गुंतवणुकीला सुरुवात केली. टप्प्याने १२ लाख ४२ हजारांची गुंतवणूक केली.
परंतु गुंतवणुकीचा परतावा काही मिळत नाही. उलट अधिक पैसे द्यावे लागत आहेत, असे निदर्शनास आल्यावर आपली फसवणूक होत असल्याचे कळताच डॉ. प्रवण यांनी सायबर पोलिसांत धाव घेतली.
दरम्यान, ‘मी बँकेतून बोलत आहे, अमुक एक ओटीपी सांगा, तुमच्या एटीएमचे शेवटचे आकडे सांगा' असे कधीच कोणताही बँक अधिकारी सांगत नाही. अथवा एटीएम ‘ब्लॉक' करण्यासाठी धमकावत नाही. सोशल मीडियावरुन तुमच्या संपर्कातील मोठे अधिकारी विशेषतः पोलीस अधिकाऱ्यांचे अकाऊंट ‘हॅक' करून पैशांची मागणी होते.
असे घडल्यास तत्काळ संबंधित व्यक्तीला स्वतः संपर्क करून खात्री करावी. ऑनलाइन पैसे पाठवू नयेत. व्हॉटस् ॲपसह इतर सोशल मीडियावरुन आमिष देत पाठवण्यात आलेल्या ‘लिंक', शेअर बाजाराच्या ‘लिंक'वर क्लिक करू नये, असे सायबर तज्ज्ञांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.