Jalgaon Child Marriage : राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण पाचनुसार जळगाव जिल्ह्यात २८ टक्के बालविवाह होतात. महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत जळगाव जिल्हा अकराव्या क्रमांकावर आहे. (28 percent child marriage in district every year jalgaon news)
शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, आयसीडीएस, पंचायत विभाग, जिल्हा महिला व बालविकास विभाग या सर्व विभागांचा एकत्रित बालविवाह निर्मूलन जिल्हा कृती आराखडा तयार आला आहे. या आराखड्याची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी, यासाठी विभागनिहाय, तालुकानिहाय एक अशा एकूण ७२ चँपियन्सची निवड करून त्यांना सोमवारी (ता. ६) बालविवाह निर्मूलनासाठी प्रशिक्षण देण्यात आले.
जिल्हा महिला व बालविकास विभाग, यूनिसेफ, एसबीसी-३ यांच्यातर्फे जिल्ह्यात बालविवाह निर्मूलन कार्यक्रम दोन वर्षांपासून राबविला जात आहे. याचाच एक भाग म्हणून बालविवाह निर्मूलन चँपियन्सचे एकदिवसीय प्रशिक्षण जिल्हा परिषदेच्या छत्रपती शाहू महाराज सभागृहात झाले. मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित अध्यक्षस्थानी होते.
जिल्हा महिला व बालविकास अधिकारी डॉ. वनिता सोनगत उपस्थित होत्या. हे चँपियन्स आराखडा देखरेख, संनियंत्रण व अहवाल व्यवस्थापन याबाबत कामकाज बघतील. गुगल फॉर्मद्वारे माहिती जमा करण्यास सहकार्य करतील.
जिल्हा बालविवाह मुक्त करा
जळगाव जिल्हा १०० टक्के बालविवाह मुक्त करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने गावागावांत साधने निर्माण करावेत. शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांमार्फत मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी. सर्व विभागांनी आरखड्यानुसार ठरवून दिलेले कार्यक्रम करावेत व त्याची माहिती गुगल फॉर्मद्वारे सादर करावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी केले.
जिल्हा बालसंरक्षण अधिकारी योगेश मुक्कावार यांनी प्रास्ताविक केले. ‘एसबीसी’चे संस्थापक तथा व्यवस्थापकीय संचालक निशित कुमार, शिक्षण विभाग, पंचायत विभाग, आरोग्य विभाग, आयसीडीएस, जिल्हा महिला व बालविकास विभाग या सर्व विभागाने नियुक्त केलेलेल्या सर्व चँपियन्सची उपस्थिती होती. प्रशिक्षणास प्रशिक्षक म्हणून ‘युनिसेफ एसबीसी’-३ चे निशित कुमार व राज्य समन्वयक नंदू जाधव, जिल्हा प्रकल्प समन्वयक श्रीकांत भोरे उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.