Jalgaon News : जिल्ह्यात सामाजिक विशेष सहाय्य योजनेत विधवा, दिव्यांग, परित्यक्ता, निराधार, घटस्फोटित, वयोवृद्ध घटकांना दर महिन्याला देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीपोटी वर्षभरात ३४५ कोटी ५६ लाख ४४ हजार ४८० रुपयांची मदत करण्यात आली आहे.
लाभार्थ्यांना थेट अर्थसहाय्य वितरणासाठी ‘आपली पेन्शन आपल्या दारी’ मोहिमेची जोड देण्यात आल्याने मदत वाटपात पारदर्शकता व गतिमानता प्राप्त झाली आहे, अशी माहिती संजय गांधी निराधार योजनेचे तहसीलदार जितेंद्र कुंवर यांनी दिली. (345 crore distribution to needy in district jalgaon news)
राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तिवेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तिवेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तिवेतन व राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य आदी योजना समाजातील वंचित घटकांसाठी राबविण्यात येत असते.
जिल्ह्यात १ ऑगस्ट २०२२ ते ३१ जुलै २०२३ या कालावधीत एकूण तीन लाख ८७ हजार ९१५ लाभार्थ्यांना ३४५ कोटी ५६ लाख ४४ हजार ४८० रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे.
संजय गांधी निराधार अनुदान या योजनेंतर्गत ६५ वर्षांखालील निराधार पुरुष व महिला, अनाथ मुले, दिव्यांगातील सर्व प्रवर्ग, एचआयव्ही, क्षयरोग, कर्करोग, एड्स, कुष्ठरोग यांसारख्या आजारामुळे स्वतःचा चरितार्थ चालवू न शकणारे पुरुष व महिला, निराधार विधवा (आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवांसह), घटस्फोट प्रक्रियेतील व घटस्फोट झालेल्या परंतु पोटगी न मिळालेल्या, अत्याचारित व वेश्याव्यवसायातून मुक्त केलेल्या महिला तृतीयपंथी, देवदासी, ३५ वर्षांवरील अविवाहित स्त्री, तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची पत्नी, सिकलसेलग्रस्त या सर्वांना लाभ मिळतो. या योजनेमध्ये दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असणे अथवा २१ हजारांपर्यंत कौटुंबिक वार्षिक उत्पन्न असणे आवश्यक आहे. दिव्यांग लाभार्थ्यांसाठी ५० हजार रुपयांची कौटुंबिक उत्पन्नाची अट आहे. या योजनेत ९० हजार १७५ लाभार्थ्यांच्या बँक खात्यात १०१ कोटी ८५ लाख १६ हजार ३०० रुपयांचे अनुदान जुलैअखेर वितरित करण्यात आले आहे.
श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजनेंतर्गत ६५ वर्षांवरील व दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव समाविष्ट असणाऱ्या अथवा २१ हजारांपर्यंत कौटुंबिक वार्षिक उत्पन्न असणाऱ्या व्यक्तींना निवृत्तिवेतन देण्यात येत असते.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
दिव्यांग लाभार्थ्यांसाठी ५० हजार रुपयांची कौटुंबिक उत्पन्नाची अट आहे. या योजनेतील एक लाख ९० हजार ७१ लाभार्थ्यांच्या बँक खात्यात २२० कोटी ९७ लाख ६३ हजार ९८० रुपयांचे अनुदान जुलैअखेर वितरित करण्यात आले आहे.
इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तिवेतन योजनेंतर्गत दारिद्र्यरेषेखालील ६५ वर्षांवरील सर्व व्यक्ती या योजनेत पात्र ठरतात. या योजनेत ८८ हजार ७४६ लाभार्थ्यांच्या बँक खात्यात १६ कोटी १६ लाख ८४ हजार २०० रुपयांचे अनुदान जुलैअखेर वितरित करण्यात आले आहे.
इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तिवेतन योजनेत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नोंद असलेल्या ४० ते ७९ वर्षांखालील वयोगटातील विधवा या योजनेंतर्गत निवृत्तिवेतन मिळण्यास पात्र असतात. या योजनेत १७ हजार ३७० लाभार्थ्यांच्या बँक खात्यात तीन कोटी ७९ लाख रुपयांचे अनुदान जुलैअखेर वितरित करण्यात आले आहे.
इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तिवेतन योजनेत ६०३ लाभार्थ्यांना २३ लाख ६० हजार रुपयांचे अनुदान जुलैअखेर वितरित करण्यात आले आहे. राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेत ९५० लाभार्थ्यांना दोन कोटी ५४ लाख २० हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे.
जिल्ह्यातील तीन लाख ८७ हजार ९१५ लाभार्थ्यांना विशेष सहाय्य योजनांचा लाभ मिळत आहे. यापूर्वी लाभार्थ्यांना एक हजार रुपये देण्यात येत होते. जुलै महिन्यापासून आता दीड हजार रुपये अनुदान मिळत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.