Jalgaon News : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी महिनाभरात प्रशासकीय कामात केलेले बदल, अवैध वाळू उपसा, दारूअड्ड्यांवर कारवाईसह अधिकारांची वाटणी करत प्रशासकीय कामकाजाला गती प्राप्त करून दिली आहे.
जनसामान्यांच्या तक्रारी, प्रशासकीय विषय, कायदा व सुव्यवस्था, आरोग्य, कृषी विषयक समस्या आदींचे अभ्यासपूर्ण नियोजन करून कामकाजाला सुरवात केल्याने एकाच महिन्यात त्याचा फरक जाणवत आहे. (Accelerating work by decentralization administrative powers jalgaon news)
महिनाभरात अवैध वाळू उत्खनन, बेकायदेशीर वाहतूक, गावठी हातभट्टयावर कारवाई, पशुधनावर आलेल्या लम्पी रोगासंदर्भात नियोजन, कृषी वापरासाठी किमान आठतास वीज मिळावी यासाठी सौर ऊर्जा प्रकल्पांना गती देत अधिकाधिक जमिनींवर प्रकल्प उभारण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. अशा विवीध कामांबाबत आणि प्रशासकीय सुधारणांची माहिती आज जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पोलिसांना तीन बोटी उपलब्ध
जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू उत्खननाविरोधात कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी प्रसाद यांनी दिली. नदीपात्रात तराफे बांधून वाळूचा उपसा होत असल्याने आता पोलिसांना आपत्ती व्यवस्थापनाच्या विभागातून तीन बोटी उपलब्ध करून देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
अधिकारांचे विकेंद्रीकरण करणार
जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिनस्त १६० समित्या आहेत. कामाचा व्याप लक्षात घेता अधिकारांचे विकेंद्रीकरण केले जाणार आहे. आर्थिक व प्रशासकीय क्षमता ओळखून ही कार्यवाही केली जाणार आहे. तसेच ग्रामपंचायत विभागात अनेक तक्रारी प्राप्त होतात. आता मात्र सुनावणीच्या पद्धतीत बदल करण्यात आला असून तक्रार आल्यास सुरवातीला तांत्रिक विभागामार्फत त्या तक्रारीची तपासणी होईल, त्यानंतरच पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे प्रसाद यांनी सांगितले.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
जिल्ह्यात ३०५ मतदारांची दुबार नावे
जळगाव जिल्ह्यात मतदार यादी संक्षिप्त पुनरीक्षणाचे काम सुरू आहे. आत्तापर्यंत ९ लाख ३३ हजार मतदारांचे प्रमाणीकरण करण्यात आले आहे. त्यात ३०५ मतदारांची नावे दुबार असल्याची माहिती समोर आली आहे. ३४१५ मतदारांचे छायाचित्र पुसट आहेत. ४६४९ मतदार मयत असून ५६२६ मतदार स्थलांतरित झाले असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
लंपीमुळे ७९ पशुधनाचा मृत्यू
जिल्ह्यात लंपी या आजारामुळे ७९ जनावरे दगावली आहेत. सद्यस्थितीला ९ तालुक्यातील ११८६ जनावरे बाधित असून त्यापैकी ६८६ बरी झाली आहेत, तर ४३४ जनावरांवर उपचार सुरू असल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्त श्यामकांत पाटील यांनी दिली. ४ लाख ९० हजार जनावरांचे लसीकरण झाले असल्याचेही त्यांनी सांगितले.
२१८४ शेतकरी कर्जमाफीपासून वंचित
जिल्ह्यातील २१८४ शेतकरी शासनाच्या कर्जमाफीपासून वंचित असून जिल्हा उपनिबंधकांना शेतकऱ्यांची माहिती गोळा करून ई-केवायसी करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे जिल्हाधिकारी प्रसाद यांनी सांगितले.
खतांचा तुटवडा नाही
जिल्ह्यात पूर्वीचा १८ हजार टन खत साठा होता. काल (ता.२३)३ हजार टन, आज (ता.२४) ३ हजार टन खत साठा उपलब्ध झाला असून एकूण सध्या जिल्ह्यात २५ हजार टन खतसाठा उपलब्ध आहे.
सौरऊर्जा प्रकल्प
मुख्यमंत्री सौरऊर्जा प्रकल्पातंर्गत ५१९ मेगावॉट वीज निर्मितीसाठी २ हजार ६०० एकर जागेवर प्रकल्प उभारले जाणार आहे. त्यातून शेतीसाठी सलग आठ तास वीजपुरवठा सहज उपलब्ध होईल. या प्रकल्पातंर्गत ५० टक्के उद्दिष्ट जिल्हा प्रशासनाने पूर्ण केले असून उर्वरित लवकरच पूर्ण होईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.