Amalner Marathi Sahitya Sammelan : साने गुरुजींच्या कर्मभूमीत त्यांचे स्मारक झाले पाहिजे, त्यासाठी जिल्ह्यातील तिन्ही मंत्र्यांनी चर्चा करून दोन-तीन दिवसांत प्रस्ताव द्यावा. आता लगेच अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. त्यात चांगले व उच्च दर्जाचे स्मारक होण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या संमतीने तातडीने मंजुरी देऊन हवा तेवढा निधी देऊ, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.(Ajit Pawar statement will give as much funds as needed for sane Gurujis memorial jalgaon news)
व्यासपीठावर संमेलनाच्या उद्घाटक म्हणून लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन, संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे, अखिल भारतीय मराठी महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे, स्वागताध्यक्ष व ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर, निमंत्रक आणि मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील, संरक्षक व पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील आणि मान्यवर उपस्थित होते.
कला, साहित्यात हस्तक्षेप नसतो
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, की कला, साहित्य, क्रीडा या क्षेत्रातील कामकाजात कधीही आम्ही राजकीय हस्तक्षेप करीत नाही. जे चांगले, जे उत्तम, ते करण्याचा सरकारचा प्रयत्न असतो. त्यामुळे साहित्यिकांनी त्यांना या क्षेत्रासाठी जे काही करायचे आहे, ते समाजासाठी उपयुक्त ठरेल, असे करावे. सरकार त्यांच्या नेहमीच पाठीशी असेल.
अलीकडे डिजिटल क्रांतीमुळे वाचन संस्कृती बदलली आहे. मात्र, वाचन संस्कृती टिकली पाहिजे. ‘चॅटबॉट’सारख्या तंत्रज्ञानाचा वापर यात खुबीने केला आहे, अशा शब्दांत त्यांनी आयोजकांचे कौतुकही केले. वाचन संस्कृती टिकावी म्हणून साहित्यिकांचे योगदान महत्त्वाचे आहे, असेही पवार म्हणाले.
नवी मुंबईत मराठी भाषा भवन : केसरकर
राज्यातील साहित्यिक मुंबईत आल्यावर त्यांना राहण्याची अडचण निर्माण होते. ही अडचण दूर करण्यासाठी नवी मुंबईत ‘मराठी भाषा भवन’ उभारणार आहे, असे भाषा-शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.
वाचनासाठी शाळेत
एक तास अनिवार्य
मराठी भाषेला प्रोत्साहनासाठी शाळेत दररोज एक तास वाचनावर भर दिला आहे. मराठी भाषा धोरण महिनाभरात जाहीर करेन, असे त्यांनी सांगितले. आपल्याकडे मराठी शाळा बंद पडत असताना जगभरातील पालक त्या-त्या ठिकाणच्या मराठी शाळांमध्ये आपल्या मुलांना दररोज एक तास पाठवितात.
महाराष्ट्राबाहेरही बृहन्महाराष्ट्रातील मराठी साहित्य संमेलनांना २५ लाख रुपये निधी देण्याचा शासनाचा निर्णय झाला आहे. मुलांमध्ये साहित्याची आवड निर्माण व्हावी, यासाठी मराठी युवक मंडळ स्थापन करणार आहे. त्यासाठी प्रत्येक मंडळाला पाच हजार रुपये अनुदानही देण्यात येईल. मराठी भाषेच्या विकासासाठी आपल्या काही अपेक्षा असतील तर त्या कळवा, असेही मंत्री केसरकर यांनी स्पष्ट केले.
कष्टकऱ्यांच्या साहित्यातून
प्रबोधन व्हावे : अनिल पाटील
आमचा अमळनेर हा अवर्षणग्रस्त तालुका असताना महामंडळाने साहित्य संमेलन घेण्याचा मान दिला, याबद्दल मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील यांनी आभार मानले. ही संतांची भूमी आहे, पूज्य साने गुरुजींची कर्मभूमी आहे.
जगात पोहोचलेल्या विप्रो कंपनीचे अजीम प्रेमजी, श्रीमंत प्रतापशेठजी यांना विसरून चालणार नाही. कष्टकऱ्यांना या संमेलनातून पाझर फुटावा, अशी अपेक्षाही मंत्री अनिल पाटील यांनी साहित्यिकांकडून व्यक्त केली.
जळगाव जिल्ह्याला मान
हा मोठा सन्मान : महाजन
साने गुरुजींच्या कर्मभूमीला नमन करून संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन म्हणाले, की ७२ वर्षांनी जळगाव जिल्ह्यास साहित्य संमेलन आयोजनाचा मान मिळाला आहे, ही सर्व जळगाववासीयांसाठी अभिमानाची बाब आहे. जळगाव जिल्ह्याबरोबरच अमळनेर तालुक्याला साहित्याची परंपरा आहे.
पूज्य साने गुरुजींच्या नगरीत होत असलेले साहित्य संमेलन भव्यदिव्य होण्यासाठी संमेलनास येणाऱ्या सर्वांना आवश्यक सोयी-सुविधा पुरविण्यात येत असून, त्यासाठी सर्व यंत्रणा रात्रंदिवस झटत आहेत. साहित्यप्रेमींनी संमेलनास उपस्थित राहून आनंद घेण्याचे आवाहन त्यांनी केले. साहित्य, संस्कृती आणि खाद्यसंस्कृतीला वाहिलेल्या खानदेशची महती मंत्री महाजन यांनी सांगितली.
यांची होती उपस्थिती
जळगावचे आमदार सुरेश दामू भोळे, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, अमळनेरचे माजी आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार स्मिता वाघ, केशवस्मृती सेवा संस्था समूहाचे प्रमुख डॉ. भरत अमळकर आदी उपस्थित होते.
विविध शाळा-महाविद्यालयांमधील विद्यार्थी, शिक्षक, राज्यातील साहित्यिक, साहित्यप्रेमी नागरिक उपस्थित होते. संमेलनाचे सहसचिव डिगंबर महाले व मृण्ययी भजक यांनी सूत्रसंचालन केले. उज्ज्वला मेहेंदळे यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.