Jalgaon News : निसर्ग अनेक बाबतीत अदभूत आहे. त्यातील एक घटना म्हणजे ‘शून्य सावली दिवस’ किंवा ‘झीरो शॅडो डे’ होय. खरे तर संपूर्ण दिवस सावली आपल्या पायाखाली नसतेच कधी.
१२ वाजून काही मिनिटांची जी वेळ असते, त्या क्षणाला प्रत्येक सरळ उभ्या असलेल्या वस्तूची सावली पायापाशी पडते. (Amogh Joshi say Today in Jalgaon Zero Shadow Day Experience shadow that disappeared at twelve o clock Jalgaon News)
याला शून्य सावली दिवस असे म्हणण्याऐवजी ‘शून्य सावलीचा क्षण’ असलेला दिवस असे म्हणणे योग्य असते. असा दिवस जळगाव जिल्हावासीय गुरूवारी (ता. २५) अनुभवू शकणार आहेत. खगोल अभ्यासक अमोघ जोशी यांनी ही माहिती दिली.
आपण नेहमी म्हणतो की रोज दुपारी बाराला सूर्य आपल्या डोक्यावर येतो. पण, रोज तसे घडत नाही. कारण सूर्य वर्षातून फक्त दोनच वेळेस आपल्या डोक्यावर येतो. सौर घड्याळानुसार (स्थानिक वेळ) १२ वाजता व हातातील घड्याळानुसार (भारतीय प्रमाण वेळ) १२ वाजून काही मिनिटांनी सूर्य डोक्यावर येतो आणि आपली सावली इकडे तिकडे न पडता पायापाशी पडते.
शून्य सावली क्षणाचे कारण
पृथ्वी आपल्या २३.५ अंशातून झुकलेल्या अक्षासह सूर्याभोवती फिरते. पण, पृथ्वीवरून आपल्याला सूर्य कधी उत्तर, तर कधी दक्षिण दिशेकडे सरकत असल्याचा भास होतो. ज्याला आपण उत्तरायण व दक्षिणायन म्हणतो. पृथ्वीवरील आपले भौगोलिक स्थान निश्चित करण्यासाठी आडव्या आणि उभ्या काल्पनिक रेषा असतात.
आडव्या रेषांना अक्षांश आणि उभ्या रेषांना रेखांश असे म्हणतात. सूर्याच्या उत्तरायण आणि दक्षिणायन या प्रवासाच्या काळात सूर्य रोज वेगवेगळ्या अक्षांशावर उगवतो. ज्याला ‘सूर्याची क्रांती’ (सन डेक्लीनेशन) असे म्हणतात.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
२१ मार्चला सूर्य पृथ्वीच्या विषुववृत्तावर म्हणजे शून्य अक्षांशावर असतो. त्यानंतर तो उत्तरेकडे सरकायला लागतो. आपण उत्तर गोलार्धात विषुववृत्त आणि कर्कवृत्ताच्या मध्यभागी २१.०० अंश उत्तर या अक्षांशावर आहोत. असे प्रत्येक शहर वेगवेगळ्या अक्षांशावर असते.
२१ मार्च ते २१ जून या उत्तरायणाच्या काळात २५ मेस सूर्याचे डेक्लीनेशन आपल्या शहराच्या अक्षांशाइतके असते.
थोडक्यात असे कि २५ मेस सूर्य २१.०० अक्षांशावर उगवतो. त्यादिवशी १२ वाजून २४ मिनिटे ४५ सेकंद या वेळी सुर्य अगदी आपल्या डोक्यावर येतो. त्याची किरणे लंबरूप पडतात आणि आपल्याला ‘शून्य सावलीचा क्षण’ अनुभवावयास मिळतो.
२१ जूननंतर परतीच्या प्रवासात १६ जुलैला सूर्याचे डेक्लीनेशन (सूर्याची क्रांती) परत आपल्या शहराच्या अक्षांशाइतके असते. त्यावेळी दुसऱ्यांदा आपल्याकडे ‘शून्य सावलीचा क्षण’ अनुभवावयास मिळतो.
२५ मेस फक्त आपल्यालाच नव्हे, तर २१.०० अक्षांशावर असलेली किंवा त्याच्या जवळपास असलेली सर्व गावे, शहरे (साक्री, अमळनेर, भुसावळ, अमरावती) या सर्वांना एकाच दिवशी, पण वेगवेगळ्या वेळी शून्य सावली क्षण अनुभवावयास मिळतो.
शून्य सावली दिवस कसा अनुभवायाचा?
कोणतीही सरळ वस्तू, जसे की पाण्याची बाटली, पाईपचा तुकडा किंवा डब्बा एका पांढऱ्या कागदावर ठेऊन १२ ते १२.२४ या वेळेत सावलीचे निरीक्षण करावे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.