Jalgaon News : पाचोरा -भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा निकाल सर्वच राजकीय पक्षांना आत्मचिंतन करायला लावणारा ठरला आहे.
तीन पॅनल व्यतिरिक्त निवडणूक रिंगणात उतरलेल्या चार स्वतंत्र उमेदवारांमुळे साऱ्यांचीच गणिते चुकली व बाजार समितीत त्रिशंकू स्थिती निर्माण झाली. (Apart from 3 panels 4 independent candidates entered election all calculations went wrong pachora bazar samiti result analysis jalgaon news)
बाजार समितीच्या १८ जागांसाठी ९८.२२ टक्के विक्रमी मतदान झाले. एकाच पॅनलचे बहुमत येईल अशी भाकिते केली जात होती. मात्र, ती फोल ठरली. कोणालाही अपेक्षा नसेल असा निकाल लागला. त्यामागे विविधांगी कारणांचा समावेश असला तरी मतदारांची मतदानापर्यंत कायम राहिलेली संभ्रमावस्था व तीन पॅनल व्यतिरिक्त निवडणूक रिंगणात उतरलेले चार स्वतंत्र उमेदवार ही कारणे त्रिशंकू स्थितीसाठी महत्त्वाची ठरली आहेत.
उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या मुदतीपर्यंत निवडणूक बिनविरोध होण्यासंदर्भात आजी-माजी आमदारांसह सर्वच राजकीय पक्षाच्या दिग्गजांनी एकमेकांशी संपर्क साधून बोलणे करून बिनविरोधचे प्रयत्न चालवले होते. मात्र, उमेदवारी अर्ज माघारीच्या दोन दिवस अगोदर ‘जोर का झटका धीरे से लगे’ असे चित्र निर्माण झाले.
आमदार किशोर पाटील यांनी भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार आमच्यासोबत असल्याचे मेळाव्यात जाहीर केल्यानंतर राजकीय वणवा पेटला. मतदारसंघात उलटसुलट चर्चांना उधाण आले. त्याची दखल घेऊन माजी आमदार दिलीप वाघ यांनी अजून चर्चा सुरू आहे, अंतिम निर्णय नाही असे जाहीर केले. अवघ्या दोन दिवसात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना ही नैसर्गिक आघाडी जाहिर झाली.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
दुसरीकडे आम्हीच खरे भाजप आहोत, असे सांगत युती धर्म पाळून आमदार किशोर पाटील यांच्यासोबत असल्याचे काही भाजप पदाधिकाऱ्यांनी जाहीर केले. दुसरीकडे भाजपचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी भाजप प्रणीत स्वतंत्र पॅनलची घोषणा केली. त्यामुळे तीन पॅनल अस्तित्वात येऊन तीनही पॅनल प्रमुखांना आपले उमेदवार निश्चित करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली. त्यात काही चांगले उमेदवार डावलले गेले तर काहींना अपेक्षा नसताना संधी मिळाली.
तिन्ही पॅनलच्या प्रमुखांनी कमी कालावधीत प्रचारात कमालीचा वेग घेतला. आमदार किशोर पाटील यांनी शेतकरी विकास पॅनल, राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप वाघ, उद्धव ठाकरे गटाच्या वैशाली सूर्यवंशी व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांच्या नेतृत्वाखाली आघाडीचे वज्रमूठ पॅनल व भाजप पुरस्कृत अमोल शिंदे व सतीश शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी सहकार पॅनल अस्तित्वात आले.
सुरवातीला ‘पॅनल टू पॅनल’ प्रचार झाला. नंतर मात्र वैयक्तिक प्रचार सुरू झाला. प्रचारादरम्यान अपेक्षेपेक्षा जास्तीचे अर्थपूर्ण व्यवहार झाले. शिवसेनेसोबत काही भाजपचे पदाधिकारी तर भाजपचे अमोल शिंदे यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे बाजार समितीचे माजी सभापती ॲड. विश्वास भोसले भाजप पॅनलमध्ये सहभागी झाले. त्यामुळे विचित्र परिस्थिती निर्माण झाली. ही निवडणूक जणू काही विधानसभेची निवडणूक आहे, असा रंग देण्यात आला.
आमदार किशोर पाटील यांचे शेतकरी विकास पॅनल व शिंदे परिवाराचे भाजप पुरस्कृत शेतकरी सहकार पॅनल यांनी प्रचारादरम्यान व मेळाव्यात आरोप प्रत्यारोपांचा कळस गाठला. अत्यंत खालच्या पातळीवर आरोप केले गेले. बाजार समितीच्या जागा विक्रीच्या मुद्द्याभोवतीच प्रचार फिरला. महाविकास आघाडी पॅनल प्रमुखांनी मात्र प्रचाराची पातळी सोडली नाही.
सोसायटी सर्वसाधारण मतदारसंघात तिन्ही पॅनलच्या उमेदवारांव्यतिरिक्त दोन स्वतंत्र उमेदवार, सोसायटी इतर मागास मतदारसंघात एक स्वतंत्र उमेदवार व व्यापारी मतदारसंघात दोन स्वतंत्र उमेदवार रिंगणात उतरले. या स्वतंत्र उमेदवारांनीही प्रचारात आघाडी घेतल्याने तसेच पॅनलच्या उमेदवारांनी स्वतंत्र प्रचार यंत्रणा राबवल्याने मतदार कमालीचे संभ्रमात पडले. त्याचा परिणाम ‘क्रॉस वोटिंग’चे प्रमाण वाढण्यात झाला.
आम्हाला मतदान करा असे सांगत विरोधी पॅनलमधील लोकांना मतदानासाठी येऊ नका यासाठी विविध आमिषे दाखवण्यात आली. त्यामुळे कोणालाही अंदाज बांधता आला नाही व साऱ्यांचीच गणिते चुकली. मतमोजणीनंतर आमदार किशोर पाटील यांच्या पॅनलला ९, आघाडीच्या वज्रमूठ पॅनलला ७ व शिंदे यांच्या पॅनलला २ जागा मिळाल्या व त्रिशंकू स्थिती निर्माण झाली.
बहुमतासाठी १० जागा गरजेच्या असून आघाडी व शिंदे गट एकत्र आले तरी त्यांचे मताधिक्य ९ होते. त्यांना बहुमतासाठी एक संचालक आवश्यक आहे. तर दुसरीकडे आमदार किशोर पाटील यांच्या पॅनलला नैसर्गिक युतीप्रमाणे भाजपच्या शिंदेंनी साथ दिल्यास त्यांचे मताधिक्य ११ होते. परंतु आमदारांचे कट्टर विरोधक असलेले अमोल शिंदे व सतीश शिंदे हे त्यांच्यासोबत जाणे शक्य वाटत नाही. वरिष्ठ पातळीवरून दबाव आल्यास ते सभापती व उपसभापती निवडीत तटस्थ राहू शकतात.
त्यामुळे आमदार किशोर पाटील यांच्या पॅनलचा ९ संचालकांच्या बहुमताने सभापती व उपसभापती होण्याचा मार्ग मोकळा होतो. दुसरीकडे माजी आमदार स्वर्गीय आर. ओ. (तात्या) पाटील यांच्या कन्या वैशाली सूर्यवंशी यांनी राजकारणात केलेला प्रवेश हाच मूळात आमदार किशोर पाटील यांच्या विरोधासाठी असल्याने त्या देखील आपला एकही संचालक आमदारांच्या बाजूने जाऊ देणार नाहीत.
अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. राहिला जागा विक्रीचा प्रश्न ज्या जागा विक्रीच्या विषया भोवती संपूर्ण प्रचार फिरत राहिला. संचालक मंडळाने नव्हे तर बँकेचे कर्ज फेडण्यासाठी बँकेने नियुक्त केलेल्या यंत्रणेमार्फत जागा विक्रीच्या व्यवहार केला आहे. त्यामुळे सत्तेवर कोणीही आले तरी बाजार समितीची जागा विक्री विना ठेवणे शक्य नाही असा राजकीय दिग्गजांचा सूर आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.