जळगाव : रावेर तालुक्यातील मूळ रहिवासी तथा भारतीय सेना दलात (Indian Army) कार्यरत जवानाने कौटुंबिक वादातून (family dispute) पत्नी व दोन मुलांना घरातून हाकलून लावले आहे. कुटुंबीय नातेवाइकांचे ऐकत नाही, पोलिस, न्यायालय कोणालाही जुमानत नाही... जावे तर कुठे जावे, काय करावे या विवंचनेत दोन्ही मुलांसह पीडित विवाहितेने सकाळपासून रावेर पोलिसांत बस्तान मांडले आहे. (army soldier takes wife and children out of house Jalgaon News)
शकुंतला रवींद्र पवार यांच्या तक्रारीप्रमाणे, रवींद्र पवार (वय ४१, रा. जुना सावदा रोड, श्रीरामनगर, रावेर) भारतीय सेनादलात कार्यरत आहेत. त्यांचा विवाह ११ मे २००६ ला पाचोरा येथील शकुंतला यांच्याशी झालेला आहे. लग्नानंतर जिथे जिथे पोस्टिंग झाली तिथे तिथे शकुंतला पवार सोबत होत्या व रवींद्रचा त्रास सहन करून संसारही करत होत्या. पवार दांपत्याला तुषाश्री (वय १५) व युधांशू (१४) अशी दोन अपत्ये असून, पतीचा असहनीय अत्याचार पाहता सुरवातीला नातेवाईक, समाजातील प्रतिष्ठितांपर्यंत प्रकरण गेले. मात्र, त्याचा उपयोग झाला नाही. रवींद्रने नंतर चारित्र्याचा संशय घेत मारझोड सुरू केली. रवींद्रने घराला कुलूप लावून घेतले असून, मुलांची वह्या-पुस्तकेही दिली नाहीत.
पोलिसदादांकडून थातुरमातुर कारवाई
घडल्या प्रकारात यापूर्वीही शकुंतला पवार पोलिसांत तक्रारीसाठी गेल्या होत्या. मात्र, पोलिस पती-पत्नीचा वाद आहे, असे म्हणून तक्रारी अर्जावर थातुरमातुर कारवाई करून मायलेकांना माघारी पाठवितात. मारहाण झाल्यावर पोलिसांनी कारवाई करण्याऐवजी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करून घेतली.
पोलिस असो की न्यायालय...
रवींद्र कल्लू पवार याच्याविरुद्ध कौटुंबिक न्यायालयात तक्रार केली. खावटीचे प्रकरण टाकून झाले. न्यायालयात तारखा सुरू आहेत, मात्र तो न्यायालयासमोर हजरच होत नाही. परिणामी या प्रकरणाचा निकालच लागत नसल्याने शंकुतला पवार हवालदिल झाल्या आहेत.
पोलिस ठाण्यात मांडले बस्तान
शकुंतला पवार यांना दोन्ही मुलांसह पती रवींद्रने घरातून हाकलून लावले असून, न्यायासाठी त्या रावेर पोलिस ठाण्यात धडकल्या. येथील पोलिसांनी संबंधिताला संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनाही तो जुमानत नव्हता. सायंकाळपर्यंत दोन्ही मुलांसह शकुंतला पवार पोलिस ठाण्यातच आश्रयाला होत्या.
माझ्यावर खोट्या केस करते
रवींद्र पवार याला सायंकाळी संबंधित पोलिसांनी बोलावून आणले, त्याची समजूत घालण्याचाही प्रयत्न केला, मात्र तो ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. माझ्याविरुद्ध खोट्या तक्रारी करते... मी वागवत नाही, असे म्हणत पोलिस ठाण्यातून निघून गेला.
आत्महत्येशिवाय पर्याय नाही
गेल्या आठ-दहा वर्षांपासून पती छळतोय, मारहाण करतोय, आता घरातूनही काढून दिले. सासू-सासऱ्यांनी घरात घेतले तर त्यांनाही मारून टाकण्याच्या धमक्या देतो. माहेरची मंडळीही आता कंटाळली असून, मुलांसह आत्महत्येचा एकच पर्याय उरल्याचे शकुंतला यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.