जळगाव : ओंकारनगरात रस्त्याच्या क्रॉसिंगवर कंबरडेच मोडेल अशा प्रकारचे कल्व्हर्ट तयार करण्यात आल्याने वाहनधारकांचे प्रचंड हाल होत आहेत. हे कल्व्हर्ट मनपाच्या नेमक्या कोणत्या अभियंत्याच्या देखरेखीत झाले? हा प्रश्न उपस्थित होत असून त्याचा सत्कारच केला पाहिजे अशी भावनाही व्यक्त होतेय.
महापालिका प्रशासनाच्या गलथानपणामुळे रखडलेली अमृत योजना आणि त्यामुळे संपूर्ण शहरातील रस्त्यांची अक्षरश: वाट लागली आहे. काही ठिकाणी रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली, मात्र ती मध्येच अपूर्ण सोडल्याने आणखीच त्रास वाढला. कधी नव्हे एवढा त्रास नागरिकांना गेल्या चार- पाच वर्षांपासून होतोय..
ठराविक प्रभागांमध्ये कामे
कामांबाबत ओरड होत असल्याने काही ठिकाणी कामे सुरु करण्यात आली आहेत. विशेषत: काही ठराविक प्रभागांमध्ये गरज नसतानाही रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. खड्ड्यांमुळे चाळण झालेले प्रमुख रस्ते राहिले बाजूला आणि महापौर, उपमहापौर व खास नगरसेवकांच्या प्रभागांमध्ये गल्लीबोळातील कामे होत आहेत.
दोषपूर्ण कामांचा ताप
काही ठिकाणी कॉंक्रिटचे रस्ते, गटार, कल्व्हर्ट अशी कामे सुरु करण्यात आली आहेत. मात्र, यापैकी बहुतांश कामे दोषपूर्ण असून त्यामुळे नागरिकांच्या डोक्याचा ताप वाढला आहे. त्यामुळेच की काय, आता खुद्द आयुक्तच अशा कामांची थेट कॉंक्रिट टेस्टिंग मशिनद्वारे तपासणी करण्यासाठी रस्त्यावर उतरल्या आहेत.
कंबरडे मोडणारे कल्व्हर्ट
असेच एक काम जिल्हापेठेतील ओंकारनगरात माजी महापौर विष्णू भंगाळे यांच्या घरासमोर तयार करण्यात आले आहे. याठिकाणी तीन रस्त्यांचे क्रॉसिंग असून दोन ठिकाणी असे उंच कल्व्हर्ट टाकण्यात आले आहे. रस्त्याच्या पातळीपासून ते तब्बल दोन फूट उंचीवर असून त्यामुळे दुचाकीस्वारांचे अक्षरश: कंबरडे मोडेल, अशी स्थिती आहे. तर चारचाकी वाहन जातानाही कल्व्हर्टला घासून जाते, त्यामुळे कारचे नुकसान होत असल्याच्या तक्रारीही समोर येत आहेत.
अभियंत्यांचे दुर्लक्ष
अशा प्रकारच्या कामांवर खरेतर त्या प्रभागातील अभियंत्याने लक्ष देण्याची गरज आहे. मक्तेदार एजन्सी तर नगरसेवकांचे आशीर्वाद असलेली असते, त्यांना तांत्रिक ज्ञान कमी आणि आर्थिक ज्ञानच अधिक असते. त्यामुळे त्यांच्याकडून ‘परफेक्ट’ कामाची अपेक्षाच नाही. पण, मनपाचे वेतन घेणारे अभियंता काय करता? हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.