Jalgaon News : जून महिना सुरू होवून चोवीस दिवस झाले, तरी अद्यापही पावसाने हजेरी लावलेली नाही. मात्र, पावसाचे वातावरण तयार होत आहे. जून महिन्यात नागरिकांच्या घरात साप आढळून येतात.
त्यातील ‘वाळा’ नावाचा बिनविषारी, बोटांच्या लांबी एवढा निरूपद्रवी सापही आढळतो. हा साप निसर्गाला पुरक असल्याने तो दिसताच त्याला न मारता अलगद उचलून घराबाहेर टाकावे, असे आवाहन वन्यजीव मित्रांनी केले आहे.
प्रत्येक पावसाळ्यात ८० टक्के नागरिकांच्या किचनमध्ये, बाथरूममध्ये, परसबागेत छायाचित्रात दाखवलेला साप हमखास दिसून येतो. आमच्या घरात सापाची छोटी छोटी पिल्लं निघत आहेत, लवकर या अशा तक्रारीचे फोन येतात. (Balkrishna Deore say Monsoon has arrived will wala snake definitely appear in bathroom kitchen Citizens make friends with this snake without fear Jalgaon News)
या सापाविषयी जास्त माहीती नसल्याने याला सापाचे पिल्लु संबोधून भितीपोटी मारण्यात येते. या सापाचे आई-वडील घरातच असतील आणि ते आपला बदला घेतील ही भीती मनात कायम असते.
हा साप कानात शिरतो आणि मेंदूत जातो. याच्या शेपटीला काटा असतो, अशा अंधश्रद्धा सुद्धा समाजात प्रचलीत आहेत. मुळात हे कोणत्याही सापाचे पिल्लु नसुन, ही बिनविषारी सापाची एक जात आहे.
ज्याला नागरिक असली साप, सापाचे पिलू म्हणतात. पण तो पूर्ण वाढ झालेला वयस्क साप आहे. या सापाला ‘वाळा’ असे म्हणतात. वर्षभर हे साप जमीनीखालीच असतात. पावसाळ्यात हे साप जमीनीवर येतात आणि आपल्या घरात, आसपास एकापाठोपाठ एक असे अनेक दिसून येतात.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
असा असतो हा साप
मुळात हा साप बिनविषारी व निरुपद्रवी आहे. कधीच चावत नाही. पेनच्या रिफिलपेक्षा कमी जाड व ३ ते ४ इंच लांब असतो. याच्यात दुसरी एक जात आहे, जी एक फुटापर्यंत वाढते. परंतु, जाडी मात्र जेल पेनच्या रिफिल इतकीच असते. वाळा साप लालसर तपकिरी रंगाचा असून, याचा पोटाकडचा भाग फिका असतो.
याच्या सडपातळ गोलाकार शरीरावर जवळजवळ असणारे खवले दिसतात. याचे डोळे अतिशय छोटे असतात आणि शेपूट टोकेरी असते. वाळ्याची लांबी सरासरी १२.५ सेंटीमीटर, तर अधिकतम २३ सें.मी. असते. महाराष्ट्रात वाळ्याला दानवं, कणा, अंधासाप, सोमनाथ असली या नावांनीही ओळखले जाते.
गोव्यात याला ‘टिल्यो’ असे संबोधतात. वाळा साप भारतात सर्वत्र आढळतो. अतिशय चपळ आणि रंगाने चकचकीत असल्याने गांडूळपेक्षा वेगळा दिसून येतो. माणसाला किंवा याच्यापेक्षा मोठ्या आकाराच्या प्राण्याला याच्यापासून कसलाही धोका संभवत नाही किंवा हा चावतही नाही. याचे मुख्य खाद्य मुंग्या, वाळवी, त्यांची अंडी, लहान कीटक असते.
"वाळा साप घरात आढळल्यास न घाबरता हाताने किंवा केरसुनीत उचलुन बाहेर सुरक्षित ठिकाणी सोडुन द्यावा. त्याला मारु नये. हे साप मुंग्या, वाळवी खाऊन एक प्रकारे निसर्गाचे समतोल साधण्याचा प्रयत्न करतात. या सापाशी मैत्री करावी."
-बाळकृष्ण देवरे, स्वयंसेवक, वाइल्ड लाईफ क्राईम कन्ट्रोल ब्युरो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.