जळगाव : गिरणा नदीपात्रातील अवैध वाळूउपशामुळे बांभोरी पुलाचे फाउंडेशन कमकुवत होत असून, पुलास धोका निर्माण झाला आहे. पुलाबाबत दुर्दैवी घटना घडल्यास धुळे, नाशिक, गुजरातचा ‘कनेक्ट’च तुटणार आहे. दुसरीकडे निमखेडी-बांभोरीला जोडणारा पर्यायी बंधारा- कम पुलाचे काम प्रस्तावित असले, तरी त्याची प्रक्रिया सध्यातरी प्राथमिक स्तरावरच आहे. त्यामुळे सध्याच्या पुलालगतच्या वाळूउपशावर कठोर निर्बंधांसह त्याची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.
जळगाव जिल्ह्यातील अवैध वाळूउपशाचा विषय ऐरणीवर असून, अत्यंत गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. वाळूउपशाबाबत अनेकदा माध्यमांमधून वृत्त प्रसिद्ध झाले. प्रशासनाने कारवाईचा बडगा उचलला तरीही ते बंद झालेले नाही. राजकीय वरदहस्त व प्रशासनातील काही अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने उपसा बिनदिक्कतपणे सुरूच आहे.(Bambhori bridge weak There is no alternative if bridge is in danger Jalgaon News)
पुलाला धोका, पर्याय नाही
‘सकाळ’ने सोमवारी (ता. ७) वाळूउपशाने बांभोरी पुलास धोका निर्माण होण्याच्या शक्यतेबाबत वृत्त प्रकाशित केले. त्यावर अनेक प्रतिक्रिया प्राप्त झाल्यात. त्यातून नागरिकांनी तीव्र भावना व्यक्त केल्यात. सध्याचा पूल १९८६ मध्ये उभारण्यात आला. २०१४ मध्ये त्याच्या फाउंडेशनची दुरुस्ती करण्यात आली. हा पूल धोकादायक स्थितीत असताना, काही दुर्घटना घडल्यास महामार्गाचा कनेक्ट पूर्णपणे तुटणार आहे. धुळे, नाशिक, मुंबईसह गुजरातचा जळगाव- विदर्भाशी कनेक्टच तुटेल, अशा स्थितीत त्याला पर्यायही नाही.
पर्यायी पुलाचा विषय लांब
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नाने निमखेडी-बांभोरीदरम्यान गिरणा नदीच्या डाऊन स्ट्रीमला बंधारा-कम पूल प्रस्तावित आहे. त्यासाठी राज्य शासनाने ४० कोटींचा निधी मंजूर केला आहे. मात्र, हा विषय अगदीच प्राथमिक स्तरावर आहे.
मोठ्या पुलास लागणार २५० कोटींहून अधिक
सध्याच्या पुलाला धोका निर्माण झाला, तर त्याच ठिकाणी पर्यायी पुलाची उभारणी करायची झाल्यास किंवा हाच पूल नव्याने बांधायचा झाला तर अडीचशे कोटींच्या वर निधी लागणार आहे. त्यामुळे मोठ्या पुलाच्या नव्याने उभारणीचा पर्याय सध्यातरी शक्य वाटत नाही.
‘बायपास’चे कामही ‘स्लो’
एकीकडे बांभोरी पूल कमकुवत होतोय. पर्यायी निमखेडी-बांभोरी बंधारा- कम पूल प्रस्तावित असूनही कधी होणार, त्याची शाश्वती नाही. त्यामुळे जळगावचा गुजरातशी कनेक्ट कायम ठेवण्यासाठी महामार्ग चौपदरीकरणाच्या टप्प्यातील पाळधी बायपास लवकर होणे गरजेचे आहे. ही स्थिती समोर असूनही या बायपासचे काम थंड बस्त्यात आहे. आता पावसाळा संपलाय. पात्रातील पाणीही कमी झालेय. त्यामुळे बायपास व त्यावरील पुलाच्या कामास गती देण्याची गरज आहे.
पाचशे मीटरपर्यंत उपसा नको
सध्यातरी दोन्ही पुलांच्या उभारणीचा पर्याय नजीकच्या काळात शक्य नाही. त्यामुळे आहे त्या मोठ्या पुलाला वाचविणे हाच योग्य पर्याय आहे. त्यासाठी पुलालगत दोन्ही बाजूंकडील वाळूउपशावर निर्बंध व त्याची कठोर अंमलबजावणी गरजेची आहे. सध्या पुलालगत दोनशे मीटरपर्यंत वाळूउपशावर बंदी असून, ती पाचशे मीटरपर्यंत करण्याची गरज आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.