आर.जे.पाटील : सकाळ वृत्तसेवा
Amalner Marathi Sahitya Sammelan : शासनाच्याच योजनांवर अवलंबून न राहता लोकसहभागातून ग्रामविकास तर ग्रामविकासातून राष्ट्रविकास साधता येतो, असे प्रतिपादन आदिवासी भाग असलेल्या बारीपाडा गावाचे सामाजिक कार्यकर्ते चैत्राम पवार यांनी ग्रामीण विकासाचे अर्थकारण व नियोजन या विषयावर आयोजित मुलाखतीत विविध प्रश्नांची मनमोकळी उत्तरे देताना केले.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी (ता.३) कविवर्य ना.धों.महानोर सभागृहात आयोजित परिसंवादात पवार बोलत होते. शशिकांत घासकडबी (नंदुरबार) यांनी मुलाखत घेतली. (Chaitram Pawar statement in amalner marathi sahitya sammelan achieve national development through village development jalgaon news)
प्रश्न : गाव विकासाचा निर्धार कधी केला?
उत्तर : नंदुरबार व धुळे जिल्ह्यांतील आदिवासी भागात वनसंपत्ती मोठ्या प्रमाणात आहे. याच संपत्तीचा वापर करून स्थानिक लोकांच्या गरजा कशा सोडविता येतील यावर विचार केला.
जंगल, जल, जमीन, जन, जनावर या पाच बिंदूंच्या आधारावर ग्रामीण भागात काम करायला सोपं जातं. १९९८ ला जलसंधारणावर काम करायला सुरवात केली. वनवासी कल्याण आश्रम संस्थेच्या माध्यमातून या उपक्रमाला सुरवात झाली.
प्रश्न : आदिवासी भागात प्रामुख्याने कोणते प्रश्न भेडसावतात?
उत्तर : गावात काम सुरू करण्याच्या आधी बेसुमार वृक्षतोड, नशेच्या आहारी गेलेले युवक, आरोग्याकडे झालेले दुर्लक्ष, शिक्षणाबाबतीतील अनास्था या प्रश्नांनी प्रामुख्याने लक्ष वेधून घेतले.
जंगल वाचविले पाहिजे यासाठी गावकऱ्यांना सोबत घेऊन काही नियम केले व ते अमलात आणले. यामुळे आज परिसरातील ४५ पेक्षा जास्त गावांनी सहभाग नोंदविला असून वृक्षारोपणाचेच नव्हे तर वृक्षसंवर्धनाचेही काम सुरु आहे.
प्रश्न : बारीपाडा परिसराला आंतरराष्ट्रीय पुरस्काराबद्दल काय वाटते?
उत्तर : खरंतर पुरस्कारासाठी आम्ही काम सुरू केलेले नाही. मात्र आमच्या कामाची दखल घेत बँकॉक येथे २००३ ला आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
वनसंवर्धन व जलसंवर्धनावर कामासाठी यामुळे प्रेरणा मिळाली. आज परिसरात लहान मोठी ४५० पेक्षा जास्त बंधारे बांधल्याने शेतीला फायदा झाला आहे.
प्रश्न : स्वयंसहायता गटांचा आर्थिक विकासासाठी काय फायदा झाला?
उत्तर : वर सांगितलेल्या ५ बिंदूंची योग्य सांगड घातली तर ग्रामविकासासाठी शासनाच्या योजनांची गरज भासतेच असे नाही. ग्रामविकासासाठी लोकसहभाग खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. परिसरातील ४५ गावांतील १००० पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी एकत्र येऊन कामाला सुरवात केल्याने सुगंधित तांदळाच्या प्रक्रियेसाठी केंद्र सरकारकडून २ कोटींपेक्षा जास्त निधी मिळाला आहे.
जंगल ही सर्व योजनांची जननी असून बारीपाडासारख्या भागातील शेती, वनसंवर्धन व जलसंवर्धन भागावर आज अनेक तरुणांनी शोध निबंध लिहायला सुरवात केली आहे. लोकशाही मूल्यांमुळेच ग्रामविकास शक्य असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. शाम पवार यांनी सूत्रसंचालन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.