Loksabha Election : लोकसभेचे दोन्ही मतदारसंघ राखण्याचे भाजपपुढे आव्हान

Challenge for BJP to retain both Lok Sabha constituencies
Challenge for BJP to retain both Lok Sabha constituenciesesakal
Updated on

Loksabha Election : ''जळगाव जिल्हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो. पक्षाने जळगाव व रावेर दोन्ही लोकसभा मतदारसंघांवर गेल्या तीस वर्षांत भक्कम पकड निर्माण केली आहे. दोन्ही मतदारसंघात पक्षाचे उमेदवार मोठ्या फरकाने निवडून आले आहेत. मात्र, लोकसभा निवडणुकीची आजपर्यंतची राजकीय परिस्थिती वेगळी होती.

प्रत्येकवेळी शिवसेना भाजपसोबत होती. शिवाय जिल्ह्यात एकनाथ खडसे यांची ताकद सोबतीला होती. मात्र आता शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभाजनानंतर शिवसेना ठाकरे गट आणि श्री. खडसे हे भाजपच्या सोबतीला नाही. त्यामुळे राजकीय स्थिती बरीच बदलली आहे.

अशा स्थितीत लोकसभेच्या दोन्ही जागा राखण्याचे आव्हान भाजपपुढे आहे. यापार्श्‍वभूमीवर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आपल्या कार्यकर्त्यांना यशासाठी कोणता मंत्र देणार? याकडे आता लक्ष आहे.'' - कैलास शिंदे (Challenge for BJP to retain both Lok Sabha constituencies jalgaon news)

देशात लोकसभेच्या निवडणुकीची चाहूल लागली आहे. सर्व पक्ष तयारीला लागले आहे. केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपला सत्तेची हॅटट्रीक साधायची आहे. त्यामुळे पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली. राज्यात लोकसभा क्षेत्रनिहाय आढावा घेण्यात येत आहे.

श्री. बावनकुळे स्वत: प्रत्येक जिल्ह्याचा दौरा करून लोकसभा मतदारसंघात नियुक्त करण्यात आलेल्या ‘सुपर वॉरियर’ तसेच पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत आहेत. जनतेशी संवाद साधून केंद्रात पुन्हा भाजप सत्तेत येण्याविषयीचा कल जाणून घेत आहेत. लोकसभा निवडणुकीचा हा प्रचार नाही, मात्र त्यादृष्टीने तयारी सुरू आहे.

त्याची आखणी सुरू आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. ३ डिसेंबरला देशातील पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल लागणार आहे. या निकालानंतर देशातील लोकसभा निवडणुकीचे राजकीय वातावरण तापायला सुरुवात होईल. त्याचअनुषंगाने भाजप तयारी करत असल्याचे दिसून येत आहे.

राज्याचा ‘रिमोट' भाजपकडे

महाराष्ट्र राज्यातील लोकसभेचा विचार केल्यास, भाजपने सर्व ४८ जागा मिळवण्याची अपेक्षा व्यक्त केली असून त्यादृष्टीने आखणी सुरू केली आहे. राज्यात सध्या भाजप, शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) अशा तीन पक्षांची सत्ता आहे. मात्र सत्तेचा ‘रिमोट कंट्रोल' भाजपच्या हाती आहे. याच तीन पक्षाच्या माध्यमातून पक्षाला लोकसभेत यश मिळवायचे आहे.

Challenge for BJP to retain both Lok Sabha constituencies
Loksabha Election : प्रदेशाध्यक्ष, विरोधी पक्षनेतेपदावरून भाजपमध्ये तीव्र नाराजी; माजी मुख्यमंत्र्यांनाच बड्या नेत्यांचा विरोध

तीन पक्षाचे जागा वाटप झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र कोणत्या जागा, कोणत्या पक्षाला दिल्या हे अद्याप जाहीर झाले नाही. शिंदे व अजित पवार गट कोणत्या चिन्हावर लढणार हे स्पष्ट झाले नाही. मात्र काहीही असले, तरी सर्व जागा भाजपतर्फे लढवल्या जाणार या निश्‍चयाने भाजपने सर्व ४८ मतदारसंघात आखणी सुरू केली आहे.

वेगळी रणनीती आवश्‍यक

जळगाव आणि रावेर लोकसभा निवडणुकीत बदललेल्या राजकीय परिस्थितीत भाजपला आपले यश कायम राखण्यासाठी वेगळी रणनीती आखावी लागणार असे दिसते. राज्यात शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गट सोबत आहेत. परंतु अगोदर असलेली शिवसेना-भाजप युतीसारखी परिस्थिती महायुतीत असल्याचे दिसत नाही. ‘शासन आपल्या दारी' कार्यक्रमात एका व्यासपीठावर येण्याव्यतिरिक्त तीनही पक्षाचे नेते संयुक्त कार्यक्रमात अद्याप दिसून आले नाहीत.

उमेदवारांबाबत साशंकता

भाजपमध्ये लोकसभेसाठीच्या उमेदवारीबाबत साशंकता आहे. जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदारांना उमेदवारी मिळण्याबाबत खात्री दिली जात नाही. तसेच नवीन नावे चर्चेत नसली, तर जळगाव लोकसभा मतदारसंघात काही नावे चर्चेत आहेत. त्यांच्यातर्फे बैठकी घेण्यात येत आहेत.

रावेर लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार रक्षा खडसे यांनी आपण पक्षकार्य करत आहोत, प्रत्येक मतदारांशी संपर्क ठेवत आहोत, परंतु केवळ ‘खडसे’ नाव असल्याने आपली उमेदवारी डावलली जाण्याची शक्यता असल्याची खंत व्यक्त केली. या मतदारसंघात काही नवीन नावे चर्चेत असून त्यांनी तयारी सुरू केली आहे. पक्षाचे जिल्ह्यातील नेते व राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यावर दोन्ही जागा निवडून आणण्याची जबाबदारी असणार आहे.

परंतु जिल्ह्यात पहिल्यासारखी राजकीय परिस्थिती नाही, याची जाणीव त्यांना आहे. त्यामुळे भाजपला लोकसभा निवडणुकीत दोन्ही जागा आपल्याकडे कायम राखण्यासाठी वेगळी रणनीती आखावी लागणार आहे. दोन्ही लोकसभा मतदार संघात श्री. बावनकुळे दौरा करत आहेत. विधानसभा मतदारसंघनिहाय ते धावता आढावा घेत आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीसाठी पदाधिकारी व कार्यकर्ते यांना कोणता कानमंत्र देणार याकडेच लक्ष असणार आहे.

Challenge for BJP to retain both Lok Sabha constituencies
Loksabha Election : मविआत शरद पवारांनी केला 8 लोकसभा मतदारसंघावर दावा; जाणून घ्या राष्ट्रवादीची यादी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.