जळगाव : शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण होताना तीन ठिकाणी अट्टहासाने टाकलेले रोटरी सर्कल नागरिकांच्या जिवावर उठले आहे. आकाशवाणी चौकासह अजिंठा व इच्छादेवी चौकात केलेल्या सदोष सर्कल निर्मितीबाबत तज्ज्ञांनी त्यातील त्रुटी लक्षात आणून दिल्यानंतरही त्यावर महामार्ग प्राधिकरण व वाहतूक शाखेची यंत्रणा कमालीची उदासीन आहे.
जळगाव शहरात २०२१ हे वर्ष पायाभूत सुविधेचे किमान एक काम पूर्ण करणारे ठरले आहे. शहरातून जाणाऱ्या महामार्गावर खोटेनगर ते कालिंकामाता चौक या टप्प्यातील सात किलोमीटरचे चौपदरीकरण पूर्ण झाले आहे. मात्र, चौपदरीकरण पूर्ण होताना त्यातील काही तांत्रिक त्रुटींमुळे हा रस्ता धोकादायक बनला आहे.
सदोष ‘सर्कल’चा त्रास
महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम करताना दादावाडी, गुजराल पेट्रोलपंप, अग्रवाल हॉस्पिटल चौक व प्रभात चौकात भुयारी मार्गाची (अंडरपास) निर्मिती करण्यात आली. मात्र, त्यापुढे आकाशवाणीसह इच्छादेवी व अजिंठा चौकात रोटरी सर्कल बनविण्यात आले आहेत. पैकी आकाशवाणी चौकातील ३० मीटर व्यासाचा सर्कल तर कमालीचा अडचणीचा ठरत आहे.
अपघातांचा धोका वाढला
या तीनही ठिकाणच्या सर्कलमुळे अपघातांचा धोका वाढला आहे. दीड महिन्यापूर्वी आकाशवाणी चौक सर्कलच्या ठिकाणी आयुर्वेदाचे शिक्षण घेणाऱ्या युवकाचा अपघात झाला. महिनाभराच्या उपचारानंतर हा युवक मृत्यूच्या दाढेतून बाहेर आला. फेब्रुवारीच्या अखेरच्या आठवड्यात अजिंठा चौकात ट्रॅव्हल्स बसच्या धडकेत आरोग्य कर्मचाऱ्याला जीव गमवावा लागला. तर इच्छादेवी चौकात गेल्या आठवड्यात महिलेचा मृत्यू झाला.
सदोष असण्यावर शिक्कामोर्तब
महामार्गाचे चौपदरीकरण झाल्यानंतर सर्कल झालेल्या या तीन चौकातच अपघात होत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. ज्याठिकाणी अंडरपास आहे, त्या जागेवर अपघाताचे वृत्त नाही. मात्र सर्कलवर अपघात व वाहतूक कोंडीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सर्कल सदोष असल्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे मानले जात आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (न्हाई) ही यंत्रणा मात्र त्यातून धडा घ्यायला तयार नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.