Coffee With Sakal : केळीवरील प्रक्रिया उद्योग, ‘गोल्ड हब’सह पर्यटन विकासावर भर : जिल्हाधिकारी प्रसाद

Coffee With Sakal : केळीवरील प्रक्रिया उद्योग, ‘गोल्ड हब’सह पर्यटन विकासावर भर : जिल्हाधिकारी प्रसाद
Updated on

Coffee With Sakal : जिल्ह्यात केळीचे अधिक उत्पादन होते. सोन्याच्या शुद्धतेसाठीही जिल्हा देशभरात प्रसिद्ध आहे. त्यामुळे एकीकडे केळीवरील प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी प्रयत्न करतानाच सोन्याचे दागिने घडविणारी कला याठिकाणी विकसित होऊन जळगाव जिल्हा ज्वेलरीचेही ‘हब’ बनू शकेल, यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, अशी ग्वाही जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.

‘सकाळ’च्या एमआयडीसी येथील कार्यालयात ‘कॉफी विथ सकाळ’ उपक्रमात श्री. प्रसाद यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी आणखी काय काय करता येईल, याचा ‘रोड मॅप’ मांडला.

प्रामाणिक प्रयत्नांची तयारी

ते म्हणाले, की जळगावमध्ये विविध क्षेत्रात चांगले काम करण्याची संधी आहे. त्यासाठी जळगावकरांना पोटतिडकीने काम करण्याची, मनापासून कामाची सवय लावावी लागेल. (Collector Prasad statement Banana processing industry emphasis on tourism development with Gold Hub jalgaon news)

जिल्ह्यात केळीपासून विविध पदार्थ बनवून त्याची केवळ महाराष्ट्रातच नाही, तर परराज्यात, परदेशात विक्री होणे गरजेचे आहे.

अर्थात, निर्यातक्षम केळीच्या उत्पादनाशिवाय हे शक्य नाही. केळी उत्पादनात देशभरात जळगाव जिल्ह्याचे नाव असले, तरी केळीच्या चीप्स उत्पादनात केरळ अग्रेसर आहे आणि केरळला केळी उत्पादन होत नाही. ते तामिळनाडूतून केळी मागवितात. हीच क्षमता जळगावच्या केळीत असती, तर आपल्या केळीला मागणी वाढली असती.

हा विचार केळी तज्ज्ञांसह उत्पादकांनी करणे गरजेचे आहे. केळीपासून चीप्स, केळीच्या खोडापासून फायबर आणि अन्य उद्योगही उभे करता येतील, त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याची आवश्‍यकता आहे. प्रशासन म्हणून आम्ही त्यासाठी तयार आहोत, असे श्री. प्रसाद म्हणाले.

ज्वेलरीची बाजारपेठ

जळगावची ओळख देशभरात सुवर्णनगरी म्हणूनही आहे. याठिकाणचे सोने शुद्ध व अत्यंत विश्‍वासार्ह मानले जाते. सोन्याच्या बाबतीत जळगावचे नाव असले, तरी बोटावर मोजण्याइतक्या पेढ्या सोडल्यास मोठी सोन्याची बाजारपेठ याठिकाणी नाही.

त्यासाठी जळगावातच सोने- चांदी व हिऱ्यांचे दागिने घडविणारी कला विकसित करण्याची गरज आहे.

Coffee With Sakal : केळीवरील प्रक्रिया उद्योग, ‘गोल्ड हब’सह पर्यटन विकासावर भर : जिल्हाधिकारी प्रसाद
Jalgaon News : दहीहंडीसोबत तुटली आयुष्याची दोर! हात गमावलेल्या तरुणाने कुंचल्यातून पुसल्या कटू आठवणी

असे कलाकुसर करणारे कलाकार मोठ्या संख्येने तयार झाल्यास ज्वेलरीचे उत्पादन वाढून दागिन्यांची बाजारपेठही तयार होऊ शकेल, असा विचार जिल्हाधिकाऱ्यांनी मांडला.

पर्यटन व्यवसायाला संधी

जिल्ह्यात १२ पर्यटन स्थळांचा विकास करण्यात येणार आहे. या स्थळांचा विकास झाला, तर पर्यटकांची संख्या वाढून युवकांना स्वयंरोजगार उपलब्ध होइल. उद्योगांना चालना मिळेल. आर्थिक चक्रात वाढ होईल. त्यासाठी प्रकल्प अहवाल तयार करण्यात येत आहे. येथील नागरिकांनी विकासासाठी एकत्र येण्याची गरज आहे.

तक्रारींचा पाठपुरावा करा

जळगावमध्ये मी आल्यानंतर निरीक्षण केले आहे, की माझ्याकडे विविध कामांबाबत तक्रारींचे निवेदन अनेकजण घेवून येतात. मात्र त्याचा पाठपुरावा करीत नाही. त्यामुळे त्यांच्या तक्रारी कायम राहतात. काहींना कोणा अधिकाऱ्याची तक्रार करायची असते म्हणून तक्रारी करतात. त्याचे कोणते काम अडले ते तक्रारीत देत नाही. तर काही मात्र काम समोरच्याकडून करवून घेतात, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

महामार्गाचे काम प्रगतीवर

शहरातून गेलेल्या महामार्गाच्या चौपदरीकरणात अनेक त्रुटी आहेत. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढून निष्पाप लोकांना जीव गमवावा लागत आहे, याबाबत विचारले असता, ते म्हणाले, कोणत्याही योजनेचा ‘डीपीआर’ तयार करताना त्यात नागरिकांचा सहभाग गरजेचा असतो. डीपीआर तयार करतानाच काही सूचना, बदल केले तर उपयोग होतो.

एकदा काम सुरु झाले की त्यात बदल करणे प्रशासकीय यंत्रणेला शक्य होत नाही. शहरातील महामार्गाच्या चौपदरीकरणात तेच झालेय.

Coffee With Sakal : केळीवरील प्रक्रिया उद्योग, ‘गोल्ड हब’सह पर्यटन विकासावर भर : जिल्हाधिकारी प्रसाद
Jalgaon Rain News : जळगावसह जिल्ह्यात ‘वरुण’कृपा; महिन्याच्या खंडानंतर पावसाचे सुखद आगमन

त्यावर भाष्य करण्यापेक्षा महामार्गाच्या अपग्रेडेशनचे प्रस्ताव संबंधित विभागाकडे पाठविले असून, त्याचा पाठपुरावा केला जात आहे. बायपास महामार्गाच्या कामातील अडचणीही दूर करण्यात येत आहेत. ही सर्व कामे प्रगतिपथावर आहेत.

टंचाईची स्थिती तीव्र.. पाण्याचे ‘रेशनिंग’ करा’

यंदा आतापर्यंत पाऊस कमी झाला. यामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये सरासरी ४५ टक्के पाणीसाठा आहे. यापुढे पाऊस झाला नाही, तर परिस्थिती बिकट होइल. मात्र पाऊस येईल असे वाटते. आगामी आठ दिवसांत पाऊस आला, तर पिकांना जीवदान मिळेल. अन्यथा सर्वच पिके धोक्यात येतील.

सध्याच्या स्थितीत व्यवस्थित नियोजन केले, तर डिसेंबरपर्यंत पाणीसाठा पुरु शकेल. पाऊस आला आणि प्रकल्पांमधील स्थिती सुधारली, तर मार्चपर्यंतची टंचाई दूर होईल. तरीही धरणातील पाणीसाठा लक्षात घेता नगरपालिका, महापालिकांना मी पाण्याचे रेशनिंग करण्याचे आदेश दिले आहेत. गळक्या जलवाहिन्या दुरूस्त करा, पाण्याची नासाडी करू नका, नागरिकांनीही पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन त्यांनी या वेळी केले.

परिवार, प्रशासकीय सेवा अन्‌ अभिषेक बच्चन...

आयुष प्रसाद यांची तिसरी पिढी ‘सीव्हील सर्व्हिसेस’मध्ये आहे. त्याबद्दल विचारले असता त्यांनी अभिषेक बच्चन यांचे उदाहरण दिले. अमिताभ यांचा मुलगा व त्याच क्षेत्रातील करिअर म्हणून अभिषेकवर वडिलांपेक्षा अधिक चांगले काम करण्याच्या अपेक्षांचे ओझे आले. आमच्या परिवारात आजोबा, वडील, आई असे सर्वच आयएएस, आयपीएस.

त्यामुळे प्रसाद यांच्यापेक्षा आयुष यांचे काम चांगले कसे होईल, अशीच सर्वांना अपेक्षा असणे स्वाभाविक आहे. माझा प्रयत्न तोच आहे; पण सर्वांच्या अपेक्षांची पूर्तता कशी करु शकतो, ते बघावे लागेल. सध्या माझ्याकडील अधिकार वापरुन समाजासाठी चांगले काय करू शकतो, याचा विचार करुनच वाटचाल सुरु आहे, असे ते म्हणाले.

Coffee With Sakal : केळीवरील प्रक्रिया उद्योग, ‘गोल्ड हब’सह पर्यटन विकासावर भर : जिल्हाधिकारी प्रसाद
Jalgaon District Collector : जिल्ह्यात वाळू वाहतूक कायदेशीर करण्यासाठी प्रयत्नशील : जिल्हाधिकारी प्रसाद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.