जळगाव: महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्या बदलीस ‘मॅट’ने (महाराष्ट्र ॲडमिनिस्ट्रेटीव्ह ट्रिब्युनल) तात्पुरती स्थगिती दिली आहे. याप्रकरणी ९ डिसेंबरला पुन्हा सुनावणी होणार आहे. डॉ. गायकवाड शुक्रवारी (ता. २) सकाळी अकराला पुन्हा पदभार घेणार आहेत, तर नवनियुक्त आयुक्त देवीदास पवार एक दिवसाच्या रजेवर गेले आहेत.
महापालिकेच्या आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांची बदली करण्यात आली होती. त्यांना कोणतीही पदस्थापना देण्यात आली नव्हती. मात्र, त्यांच्या जळगाव येथील आयुक्तपदी परभणीचे आयुक्त देवीदास पवार यांची नियुक्ती करण्यात आली.
त्यांनीही आदेश मिळताच बुधवारी (ता. ३०) पदभारही घेतला. या कालावधीत आयुक्त डॉ. विद्या गायकवाड प्रशासकीय प्रशिक्षणासाठी पुणे येथे गेल्या होत्या. पदभार देताना त्या हजर नव्हत्या. त्यामुळे एकतर्फी पदभार घेतल्याचा त्यांचा दावा आहे. (Commissioner Dr. Vidya Gaikwad transfer suspend Jalgaon News)
या बदलीविरोधात श्रीमती गायकवाड यांनी ‘मॅट’मध्ये याचिका दाखल केली होती. त्यांच्यातर्फे अविनाश एस. देशमुख यांनी बाजू मांडली. महापालिका आयुक्तपदाचा पदभार घेऊन आपल्याला केवळ सात महिने झाले आहेत. कोणतेही कारण नसताना आपली बदली करण्यात आली, तसेच आपल्याला कोणतीही नियुक्ती न देता परस्पर पदमुक्त करण्यात आले. शासन नियमाप्रमाणे ही प्रक्रिया झालेली नाही.
याबाबत आपल्यालाही विचारात घेणे गरजेचे होते. त्यामुळे या बदलीला स्थगिती द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. या याचिकेवर सुनावणी होऊन ‘मॅट’चे व्हाईस चेअरमन पी. आर. बोरसे यांनी या बदलीच्या २९ नोव्हेंबर २०२२ च्या शासनाच्या आदेशाला तात्पुरती स्थगिती दिली. याप्रकरणी ९ डिसेंबरला पुढील सुनावणी होणार आहे. ‘मॅट’च्या या आदेशामुळे आयुक्तांच्या बदलीस तात्पुरती स्थगिती देण्यात आली.
‘मॅट’ने बदलीला दिलेल्या तात्पुरत्या स्थगितीबाबतचे आदेश सायंकाळी उशीरा प्राप्त झाले आहेत. त्यामुळे आयुक्त डॉ. गायकवाड शुक्रवारी (ता. २) सकाळी अकराला पुन्हा आपल्या पदाचा पदभार घेणार असल्याचे सांगण्यात आले.
नवीन नियुक्तीचे काय?
महापालिकेत आयुक्तपदाचा पदभार घेतलेले देवीदास पवार एक दिवसाच्या रजेवर गेल्याचे सांगण्यात आले. दुपारी साडेतीनला आपला एक दिवसाचा रजेचा अर्ज त्यांनी दिला आहे. नांदेड येथे त्यांच्या भावाच्या वर्षश्राद्धासाठी ते गेले असल्याचे सांगण्यात आले. मात्र, त्यांनी अद्याप पदभार सोडलेला नाही. त्यामुळे आता त्यांच्या नवीन नियुक्तीचे काय? हा प्रश्नही आहेच.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.