Jalgaon News : शिवाजीनगर पुलाचे ‘टी’ आकाराचे काम करायराचे की नाही, याबाबत अद्यापही प्रशासनाचा घोळ कायम आहे. (confusion of administration about whether T shaped work of Shivajinagar bridge should be done or not jalgaon news)
सार्वजनिक बांधकाम विभाग, महापालिका व जिल्हाधिकारी कार्यालय यांचा मेळ अद्यापही बसत नसल्यामुळे शासनाचा निधी उपलब्ध असूनही त्याचे काम अद्याप सुरू झालेले नाही.
शिवाजीनगर पुलाच्या बांधकामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने मंजुरी दिली होती. या पुलाचे बांधकाम ‘टी’ आकारात करण्याचे निश्चित झाले होते. त्याचा नकाशाही तयार केला होता. संपूर्ण पुलासाठी आवश्यक असलेला निधीही शासनातर्फे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे उपलब्ध झाला होता. त्या कामाचा मक्ताही दिला होता.
‘टी’ नकाशानुसार काम
मक्तेदाराने प्रारंभी ‘टी’ नकाशानुसार काम सुरू केले. शिवाजीनगर पुलाचा एक भाग दूध फेडरेशन मार्गाकडे जिनिंग प्रेसजवळ उतरला आहे, तर ‘टी’ आकाराचा दुसरा भाग भाऊसाहेब टी. टी. साळुंखे चौकाच्या पुढील भागात असलेल्या बालवाडीजवळ उतरत आहे. विशेष म्हणजे या नकाशाला मंजुरी मिळाली होती. त्यानुसार मक्तेदाराने शिवाजीनगर भागातील जुन्या पांडे डेअरीजवळ माती परीक्षण केले होते. त्यानुसार त्या रस्त्यावर काम सुरू होणार, हे निश्चित झाले होते.
हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’
कोविडमुळे कामात संथपणा
पुलाचे काम सुरू झाल्यानंतर २०१९ मध्ये ‘कोविड’ची साथ आली. त्यामुळे कामात संथपणा आला. पुढे साथ गेल्यानंतरही वेगाने काम सुरू झाले नाही. त्यामुळे प्रारंभीक स्वरूपात एल आकाराच्या पुलाचे काम करून पूल सुरू करावा, असा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार मक्तेदाराने काम सुरू केले आणि २०२२ मध्ये काम पूर्ण झाले. मात्र, उद्घाटनापूर्वीच नागरिकांनी पुलावरून वाहतूक सुरू केली.
‘टी’ आकाराच्या कामाचा विसर
शिवाजीनगर पुलावरून वाहतूक सुरू झाल्यामुळे प्रशासनाला ‘टी’ आकाराच्या कामाचा विसर पडल्याचे दिसून आले. त्या वेळी प्रसारमाध्यमांनी हा प्रश्न लावल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने महापालिकेला त्या ठिकाणचे अतिक्रमण काढून देण्याचे पत्र दिले. महापालिकेनेही उलट टपाली कळविले, की आम्ही सर्व अतिक्रमण काढले आहे.
त्यामुळे तुम्ही काम सुरू करावे. त्यानंतरही काम सुरू झाले नाही. त्यानंतर पुन्हा या कामाबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे सार्वजनिक बांधकाम विभाग, महापालिका अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यांनीही काम सुरू करण्याचे आदेश दिले. तरीही अद्याप काम सुरू झालेले नाही.
प्रशासनाचा मेळ बसेना
एखाद्या कामासाठी निधी नसल्यास ते काम रखडलेले असते, परंतु एखाद्या कामासाठी निधी उपलब्ध आहे, मंजुरीही आहे, परंतु केवळ प्रशासनाचा मेळ बसत नसल्याचे उदाहरण म्हणजे शिवाजीनगर पुलाच्या ‘टी’आकाराचे काम आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हाधिकारी व महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा अद्यापही मेळ बसत नसल्यामुळे हे काम सुरू झालेले नाही.
त्यामुळे तब्बल २५ कोटी रुपयांचा निधी अद्यापही पडून आहे. याबाबत आता जिल्हाधिकाऱ्यांसह प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी विचार करण्याची गरज असून, या पुलाच्या ‘टी’आकाराचे काम तातडीने सुरू करावे, अशी नागरिकांची मागणी आहे.
"शिवाजीनगर पुलाच्या ‘टी’ आकाराच्या बांधकामासाठी नकाशाप्रमाणे शिवाजीनगर भागाकडे पुलाच्या दोन्ही बाजूंना २० मीटरचे अंतर आवश्यक आहे. त्यामुळे महापालिकेला आम्ही अतिक्रमण काढण्याचे पत्र दिले आहे. शासनाच्या निर्देशानुसार पुढील काम करण्यात येईल." -गिरीश सूर्यवंशी, अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, जळगाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.