जळगाव : जिल्ह्यातील कोविडग्रस्तांची वाढती संख्या पाहता अनेक रुग्णांना बेड मिळण्यात अडचणी येत आहेत. या पार्श्वभूमीवर, मोहाडी रोडवर पूर्णत्वाकडे आलेल्या महिलांच्या रुग्णालयात जंबो कोविड केअर सेंटर उभारण्यात येत आहे. यात तब्बल ८०० रुग्णांवर उपचाराची व्यवस्था होणार असून, शुक्रवारी (ता. २) पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह मान्यवरांनी हॉस्पिटलची पाहणी करून तयारीचा आढावा घेतला.
जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत आहेत. यामुळे अनेक ठिकाणी रुग्णांना बेड उपलब्ध होत नसल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर, मोहाडी रोडवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नांनी उभारण्यात आलेल्या महिलांच्या हॉस्पिटलमध्ये कोविड केअर सेंटर उभारण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले आहे. याची तयारी पूर्णत्वाकडे आली असून, ५ एप्रिलपासून हे सेंटर कार्यान्वित करण्यात येणार आहे.
या अनुषंगाने शुक्रवारी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी महिला रुग्णालयाची पाहणी केली. यात त्यांनी सध्या सुरू असणाऱ्या कार्याचा आढावा घेऊन माहिती जाणून घेतली. या वेळी त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी अभिजित राऊत, महापौर जयश्री महाजन, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता सुभाष राऊत, बाजार समिती सभापती कैलास चौधरी, जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, महानगरप्रमुख शरद तायडे, नगरसेवक अमर जैन, गणेश सोनवणे, सरपंच धनंजय सोनवणे आदींची उपस्थिती होती. या वेळी पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी व सिव्हिल सर्जन यांना या हॉस्पिटलमध्ये पाइपलाइनच्या माध्यमातून ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या प्रणालीची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. या हॉस्पिटलमध्ये जनरल बेड, ऑक्सिजन बेड आणि व्हेंटिलेटर्स या तिन्ही प्रकारातील रुग्णसेवा उपलब्ध राहणार आहे
प्रशासनावरील ताण हलका होणार :
पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, की आपण सहकार राज्यमंत्री असताना फक्त महिलांसाठी अद्ययावत असे रुग्णालय उभारण्यासाठी मान्यता मिळवून आणली होती. मोहाडी रोडवरील प्रशस्त जागेत या हॉस्पिटलचे काम सुरू करण्यात आले असून, आता ते पूर्णत्वाकडे आले आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता या हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदा १०० बेडची व्यवस्था करण्यात येत असून, गरज भासल्यास येथे तब्बल ८०० बेडचे नियोजन करण्यात आलेले आहे. यामुळे जिल्हा शासकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयावर पडणारा लोड कमी होणार असून, प्रत्येक रुग्णाला अद्ययावत उपचार मिळणार आहेत.
असे आहे हॉस्पिटल
महिलांसाठीच्या सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलला तब्बल ७५ कोटी ३१ हजार रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली होती. यात हॉस्पिटल, अधिकारी व कर्मचाऱ्यांची निवासस्थाने, सुशोभीकरण आणि परिसरासाठी पाणीपुरवठा योजना आदींचा समावेश होता. हे हॉस्पिटल तब्बल एक लाख चौरसफुटांच्या क्षेत्रामध्ये उभारण्यात येत असून, याचे बांधकाम भूकंपरोधी प्रणालीनुसार करण्यात आले आहे. हॉस्पिटल तीनमजली असून, तळमजल्यावर स्वागतकक्ष, स्पेशल वॉर्ड, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर ओपीडी, ऑपरेशन कक्ष आणि जनरल वॉर्ड असणार आहे. हॉस्पिटल टेकडीवर असून, हवेशीर व प्रशस्त ठिकाणी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.