Jalgaon News : महाराष्ट्रातील जळगाव, बुलडाणा जिल्ह्यासह मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर पट्ट्यासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या तापी नदीवरील नियोजित महाकाय जलपुनर्भरण योजनेचा (मेगा रिचार्ज/फ्लड कॅनॉल योजना) विस्तृत योजना अहवाल (डीपीआर) पूर्ण झाला असून, नुकताच तो महाराष्ट्रासह मध्य प्रदेशच्या जलसंपदा विभागाकडे सुपूर्द करण्यात आला.
तापी पाटबंधारे महामंडळाचे निवृत्त अधीक्षक अभियंता व्ही. डी. पाटील यांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे. या वृत्तामुळे नोव्हेंबर महिन्यात मध्यप्रदेशमधील होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वीच या योजनेचे भूमिपूजन होण्याच्या शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. (DPR of Mega Recharge Scheme submitted Farmers help in Increase Now waiting for administrative approval Bhoomi Pujan Jalgaon News)
जळगाव जिल्ह्यातील रावेर, यावल, चोपडा, मुक्ताईनगर तसेच बुलडाणा जिल्ह्यातील व मध्य प्रदेशातील शाहपूर, बऱ्हाणपूर, नेपानगर या भागातील सुमारे साडेतीन लाख हेक्टर जमिनीला ओलिताखाली आणणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून गेल्या १५ वर्षांपासून या योजनेची चर्चा सुरू आहे. या योजनेचा विस्तृत योजना अहवाल (डीपीआर- डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट) पूर्ण झाला असून, नुकताच भोपाळ येथे मध्यप्रदेश शासनाच्या जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना तो सादर करण्यात आला.
निवृत्त अधीक्षक अभियंता व्ही. डी. पाटील, अधीक्षक अभियंता यशवंत दाभाडे, के. पी. पाटील या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मध्यप्रदेश शासनाचे अतिरिक्त मुख्य सचिव एस. एन. मिश्रा व अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत या योजनेचे सादरीकरण केले.
या योजनेची आवश्यकता, महत्त्व आणि तांत्रिक बाबी यावरही या बैठकीत विस्तृत चर्चा करण्यात आली. दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह या विषयावर लवकरच संयुक्त बैठक होणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. या आधी या योजनेचा हा अहवाल महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागालाही सादर करण्यात आला आहे.
ही योजना पूर्ण झाल्यावर या दोन्ही राज्यातील ३ लाख ५७ हजार ७८८ हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. जलपुनर्भरणाची ही आगळीवेगळी योजना या विभागातील वेगाने घसरणाऱ्या पाणी पातळीवरील हमखास उपाय म्हणून सांगितली जात आहे.
किमान १० हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असलेल्या या योजनेचे भूमिपूजन लोकसभा निवडणुकीपूर्वी व्हावे, अशी अपेक्षा आहे.
भूमिपूजनासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रित करण्याची घोषणा महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रावेर आणि बऱ्हाणपूर येथे प्रचार सभांमध्ये केली होती. आता या योजनेचे भूमिपूजन होईल काय आणि त्यासाठी श्री. मोदी येतात काय? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
येत्या नोव्हेंबर महिन्यात मध्य प्रदेश विधानसभेची निवडणूक होणार असल्याने तिथे आचारसंहिता लागण्या आधीच या योजनेबाबत मोठी घोषणा करण्याचा प्रयत्न तेथील भारतीय जनता पक्षाच्या नेत्या व माजी मंत्री अर्चना चिटणीस करीत आहेत.
प्रकल्पाला हवी गती
महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष (कै.) मधुकरराव चौधरी यांची मूळ कल्पना असलेल्या या प्रकल्पाला मंजुरी मिळण्यासाठी नंतर तत्कालीन खासदार (कै.) हरिभाऊ जावळे यांनी पाठपुरावा केला होता.
आता दोघांचे सुपुत्र आमदार शिरीष चौधरी व युवा नेते अमोल जावळे दोघेही राजकारणात सक्रिय आहेत. या योजनेसाठी दोघांनीही पाठपुरावा करावा, अशी अपेक्षा आहे. जळगाव जिल्ह्यात खासदार रक्षा खडसे आणि बऱ्हाणपूर येथे खासदार ज्ञानेश्वर पाटील हे दोघेही भारतीय जनता पक्षाचे आहेत. केंद्रात आणि आता राज्यातही भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनीही या योजनेत लक्ष घातल्यास प्रशासकीय मान्यता व निधी उपलब्ध होऊन योजनेचे भूमिपूजन तातडीने होऊ शकेल.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.