लेखक - सचिन चौघुले
हिंदू-मुस्लिम वाद हा स्वातंत्र्यपूर्व काळापासून विविध माध्यमातून सामोरा येणारा विषय... या वादाची बीजे रोवली गेली, ती इंग्रजांच्या ‘तोडा, फोडा आणि राज्य करा’ या नीतीतून. मात्र, त्याचा स्फोट झाला तो १९४७ मध्ये स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशाची फाळणी झाल्यावर. त्या वेळी उसळलेल्या जातीय दंगलींमुळे निर्माण झालेल्या तेढीची अशुद्ध बीजे आजही आपल्या मनात खोलवर रुजली आहेत. या अशुद्ध बीजापोटी हिंदू- मुस्लिम यांच्यातील वाद नित्यनेमाने घडत असतात. माणूस माणसाला माणूस म्हणून पाहू लागला, तर ही अशुद्ध बीजे नष्ट होऊन एकात्मतेची शुद्ध बीजे माणसाच्या मनात रूजू शकतात, असा संदेश देणारे केदार देसाईलिखित व सतीश मुंग्रे दिग्दर्शित नाटक ‘अशुद्ध बीजापोटी’ इंदूरच्या सार्थक सांस्कृतिक कला संस्थेने सादर केले.
आंतरधर्मीय विवाह करणारा रवी (संकेत पाटील), त्याची पत्नी सफिना (दीक्षा वडनेकर) आणि मुलगी जिया (मौक्तिका करंबळेकर) या त्रिकोणी कुटुंबासोबत सनातनी विचार असणारी रवीची आई शांता (सुषमा जोशी) राहत असलेल्या घरात सनातनी विचार व त्यामुळे सुनेच्या मनात आलेल्या कडवटपणाच्या सावटाखाली नेहमीच तणाव असतो. यात त्यांच्या घरात अचानक आलेला आपल्या वडिलांनी दिलेल्या स्वच्छ विचारांची बैठक असलेला सफिनाचा बालमित्र अल्ताफ (धवल वैद्य) यांच्या संवादातून उलगडत जाणारे नाट्य. रवी आणि जिया यांच्या माध्यमातून घरात जपली जाणारी शुद्ध बीजे तसेच शांताबाई व सफिना यांच्या मनात रोवलेली अशुद्ध बीजे यातील संघर्ष मांडत अल्ताफ विचारांनी त्यात झालेले परिवर्तन व अखेरीस एकात्मतेचा व माणुसकीचा संदेश देत शेवट होणारे हे नाट्य.
लेखकाने दिलेल्या प्रसंगागणिक उत्सुकता वाढविण्यात दिग्दर्शक सतीश मुंग्रे अपयशी ठरतात. एका ठराविक संथ लयीत नाटक सादर झाले. संकेत पाटील, दीक्षा वडनेरकर, मौक्तिका करंबळेकर, सुषमा जोशी, धवल वैद्य या कलाकारांनी आपापल्या परीने या नाट्यास गती देण्याचा प्रयत्न केला. त्यांना साध दिली, ती प्रा. जोशी (मधुसूदन जठार), सावित्रीबाई (राशी वडनेरकर), सत्यवान (यश एरंडोलकर), पंडितदादा (मंगलसिंह तोमर), बशीर खान (सुदर्शन पटवा) यांनी. तर तांत्रिक बाजूत गौरव भावसार (प्रकाशयोजना), संकेत पाटील (ध्वनी संकलन), साक्षी आठले (ध्वनी संचलन), सिद्धार्थ दुबे (रंगभूषा), शुभा खंगण (वेशभूषा), मानसी उपाध्ये शर्मा (नेपथ्य), समीर कोरडे, तपन शर्मा (नेपथ्य सहाय्य) नाट्यास पूरक होते.
हेही वाचा: आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....
वर्तमानकाळात माणुसकीच्या नात्यांना एकात्मतेचा संदेश देणारे नाट्य सादर केल्याबद्दल ‘सार्थक’च्या टीमचे अभिनंदन!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.