Jalgaon News : तालुक्यात नुकत्याच पडलेल्या पावसाने आणि मध्य प्रदेशातील सातपुड्याच्या अंतर्गत भागात झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे बोकड नदीला आलेल्या पुरात अभोडा बुद्रुक ते अभोडा तांडा दरम्यानचा पूल पूर्ण वाहून गेला आहे.
यामुळे नदीपलीकडील ३ आदिवासी गावातील सुमारे २५० विद्यार्थी आता शाळेत कसे येतील, असा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाने तातडीने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. (due bridge collapses students cannot go to school jalgaon news)
गेल्या दोन दिवसांत मध्य प्रदेशातील सातपुड्याच्या पट्ट्यात ढगफुटीसदृश जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे तालुक्यातील सर्वच नदी-नाल्यांना जोरदार पूर आला होता. नुकताच (ता. २२) दुपारी तालुक्याच्या सातपुड्याच्या कुशीतील असलेल्या मध्यम प्रकल्पाच्या खाली बोकड नदीपात्रात आदिवासी भागाला जोडणारा पूल पुराच्या पाण्यात पूर्णपणे वाहून गेला.
अभोडा बुद्रुक येथून सातपुड्याच्या अंतर्गत भागाला जोडणारा हा महत्त्वाचा पूल होता. अभोडा बुद्रुक येथील भाऊसाहेब राजाराम गणू महाजन आदिवासी माध्यमिक विद्यालय येथे शिकणाऱ्या अडीचशे विद्यार्थी विद्यार्थ्यांसमोर आता शाळेत येण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या शाळेत ताड जिन्सी, विश्राम जिन्सी आणि अभोडा तांडा येथील २५० विद्यार्थी शाळेत येतात. हे बहुतेक सर्वच विद्यार्थी - विद्यार्थिनी आदिवासी आहेत.
हा पूल वाहून गेल्याने शाळेत येण्यासाठी या विद्यार्थ्यांना आता कोणताही पर्यायी मार्ग नाही. याआधी लांबचे विद्यार्थी एसटी बसने शाळेत येत होते तर जवळचे पायी किंवा खासगी वाहनाने ये-जा करीत होते. आता तर पायी येण्याची इच्छा असूनही विद्यार्थी रस्त्याअभावी शाळेत येऊ शकणार नाहीत.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. संपूर्ण पुलाचे बांधकाम होण्यासाठी दीर्घकाळ लागणार असल्याने आता प्रशासनाने या विद्यार्थ्यांची येण्या- जाण्याची पर्यायी का असेना पण व्यवस्था करावी, अशी मागणी आदिवासी भागातील नागरिक करीत आहेत.
चहार्डीत चंपावती नदीवर पूल बांधा
शिवाजीनगर प्लॉट भागात जाण्यासाठी चंपावती नदीतून जावे लागते. सध्या या नदीत हतनूर धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. नदीला पाणी आले, की या भागातील ग्रामस्थांना, महिलांना व विद्यार्थ्यांना नदीतून जाण्यासाठी कसरत करावी लागते. पावसाळ्यात देखील नदीला पूर आला की गावाचा या भागाशी असलेला संपर्क तुटतो.
बऱ्याच वर्षापासून या भागातील नागरिकांची ही समस्या आहे. शिवाजीनगर प्लॉट भागातील विद्यार्थी, अबालवृद्ध, महिला यांना नेहमीच काहींना काही कामानिमित्त गावात यावे लागते. या समस्येची दखल घेण्यासाठी गावाला कायमस्वरूपी ग्रामसेवक लाभत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तरी या समस्येची संबंधितांनी दखल घेऊन पुलाची उभारणी करावी व ग्रामस्थ व विद्यार्थ्यांचे हाल थांबवावेत, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.