Jalgaon News : काही दिवसांपूर्वी तब्बल १८० रुपये किलोचा दर झालेल्या सोयाबीन तेलाचे दर सध्या १०५ रुपयांवर आले आहेत. सोयाबीनसह इतरही तेलांच्या किंमतीत कमालीची घसरण झाली आहे. (Edible oil prices decrease jalgaon news)
ऐन लग्नसराईत तेलाचे दर कमी झाल्याने सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. अशात भाजीपाल्याचे दर देखील स्थिर असल्याने गृहिणींना आर्थिक नियोजन करणे सोयीचे ठरत आहे. वाढत्या महागाईच्या काळात तेलाचे दर असेच स्थिर ठेवावेत, अशी मागणी सर्वसामान्य ग्राहकांमधून होत आहे.
केंद्रीय अन्न मंत्रालयाने खाद्यतेल उद्योगांच्या संघटनेतील पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन खाद्यतेलाच्या किमतीत झालेली घसरण त्वरित ग्राहकांपर्यंत पोचवली जावी, अशा सूचना केल्या होत्या. त्यानुसार, खाद्यतेलाचे भाव कमी झाले आहेत. मागील चार महिन्यात खाद्यतेल द्विशतक पार करताना दिसून आले होते.
परिणामी मध्यमवर्गीयांनी खाद्यतेलाचा वापर कमी केला होता. सध्या सोयाबीन तेलाचे भाव प्रती किलो १०५ रुपये झाले असून या दराबाबत ग्राहकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. आंतरराष्ट्रीय किमतीत झपाट्याने घट झाली असून भुईमुंग, मोहरी, सोयाबीन या पिकांचे विक्रमी उत्पादन झाल्याने खाद्यतेलाचे भाव कमी झाल्याचे सांगितले जात आहे.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
दरम्यान, खाद्यतेलासोबत दैनंदिन वापरात येणारा भाजीपाला देखील प्रती किलो पन्नास रुपये दराने असल्याने सध्या ग्राहकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. अद्रकचे दर मात्र काहीसे वाढले आहेत. १६० रुपये किलो दराने अद्रक विकले जात आहे.
डाळींचे दर शंभरीच्या वर
खाद्यतेल स्वस्त झाले असले तरी दैनंदिन वापरात येणाऱ्या तूरडाळ, मठदाळ, मुगडाळ व उडीद डाळ अशा डाळींचे भाव साधारणपणे ११० ते १३० रुपयांपर्यंत गेले आहेत. त्यामुळे गृहिणी सध्या भाजीपाल्याकडे वळलेल्या दिसून येत आहे. डाळींच्या वाढत्या दरामुळे वर्षभर त्यांची साठवणूक तरी कशी करावी? असा प्रश्न सर्वसामान्य ग्राहकांना पडला आहे.
खाद्यतेलासह किराणाचे मालाचे दर (प्रती किलो)
सोयाबीन तेल १०५
शेंगदाणा तेल १८०
पामतेल १००
साखर ४०
तुरदाळ १२५
मुगडाळ १२०
मठदाळ १२०
उडीद दाळ ११०
हॉटेल व्यवसायिकांना दिलासा
खाद्यतेलाचे भाव कमी झाल्यामुळे हॉटेल व्यवसायिकांना मोठा दिलासा मिळाला असल्याचे येथील हॉटेलचालक संजय मराठे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. हॉटेलमध्ये खाद्यतेलाशिवाय कोणत्याही वस्तू तयार होत नाहीत. आता खाद्यतेल स्वस्त झाल्याने बाजारात १२ रुपयांत मिळणारा समोसा आता १० रुपयांत विकला जात आहे. याशिवाय शेव, चिवडा, पापडीसह तळलेल्या विविध खाद्यपदार्थांचे दर काहीसे कमी होण्याची शक्यता दिसत आहे.
"उत्पादन व आवक कमी असल्यामुळे मागील तीन- चार महिन्यात सोयाबीन तेल १८० रुपये किलो दराने विकले जात होते. शहरात साधारणपणे ५० ते ५५ किराणा दुकान असून तालुक्यातील खेड्यापाड्यांवरील बहुतांश ग्राहक शहरात किराणा घेण्यासाठी येत असतात. आता खाद्यतेलाचे भाव कमी झाल्यामुळे तेलाची विक्री वाढणार आहे." - अरुण वाणी, अध्यक्ष किराणा व्यापारी असोसिएशन, पारोळा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.