Maharashtra Political Crisis : राज्यात पक्षांमध्ये फाटाफूट सुरू आहे. ‘हा इकडे आला, तो तिकडे गेला’, असे सुरू आहे. मात्र, अशी फाटाफूट करण्यापेक्षा जिल्ह्यातील सर्वच सिंचन प्रकल्प अपूर्ण आहेत, त्यासाठी निधी आवश्यक आहे.
आपण सर्वपक्षीय आमदारांनी एकत्र येऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू या, असे आवाहन राज्याचे माजी मंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी गुरुवारी (ता. १३) येथे केले.
जळगावात ते पत्रकारांशी बोलत होते. जिल्ह्यातील अपूर्णावस्थेत असलेल्या सिंचन प्रकल्पाची तापी महामंडळात जाऊन त्यांनी अधिकाऱ्यांच्या बैठकीत माहिती घेतली. त्यानंतर त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी चर्चा केली. (Eknath Khadse appeals to MLAs of all parties to come together to complete irrigation project jalgaon news)
प्रकल्पांबाबत बोलावे
आमदार खडसे म्हणाले, की शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळावे, याच हेतूने आपण पाटबंधारे मंत्री असताना, तापी पाटबंधारे विकास महामंडळ स्थापन केले. त्याच अंतर्गत जिल्ह्यातही काही प्रकल्प सुरू केले. मात्र, आजही ते प्रकल्प निधीअभावी रखडले आहेत. आज राजकारण जोरात सुरू आहे. मात्र, या प्रकल्पांबाबत कोणीही बोलत नाही, हे दुर्दैव आहे.
पाडळसरे प्रकल्प रखडला
रखडलेल्या प्रकल्पाबाबत ते म्हणाले, की अमळनेर तालुक्यातील पाडळसे प्रकल्पाचा आपण १९९८ मध्ये प्रारंभ केला. मात्र, तो प्रकल्प रखडला. आज त्याला चार हजार सहाशे कोटींच्या निधीची आवश्यकता आहे. मात्र, शासन केवळ शंभर कोटी मंजूर करते. त्यामुळे या प्रकल्पाचे काम मार्गी लागणे शक्यच नाही. त्याला एकरकमी ठोस निधी मंजूर करण्याची गरज आहे.
सिंचन योजना अपूर्णच
जिल्ह्यातील शेळगाव बॅरेज, बोदवड उपसा, मुक्ताई उपसा सिंचन, मेगा रिचार्ज, कुऱ्हा उपसा सिंचन, अंजनी प्रकल्प, वाघूर धरण या प्रकल्पाबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. शेळगाव बॅरेजचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. मात्र, याच्या पूर्व व पश्चिम कालव्याचे काम पूर्ण झाल्याशिवाय सिंचनासाठी पाणी देता येणार नाही.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
त्यामुळे या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. मुक्ताई उपसा सिंचन योजना तांत्रिक कारणामुळे अडकली आहे. त्यासाठी पाच कोटी रुपयांची आवश्यकता आहे. ते केल्यास त्याचे पुनरुज्जीवन होईल.
बोदवड उपसा सिंचनासाठीही पाच हजार कोटींची गरज आहे. मात्र, त्यालाही पुरेसा निधी दिला जात नाही. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी निधी मंजूर केला. मात्र, राज्य सरकारने त्याकडे लक्ष न दिल्याने तो निधीही बुडाला. आजही ते काम रखडले आहे. मेगा रिचार्ज प्रकल्पाचीही अशीच स्थिती आहे.
तीन मंत्र्यांनी निधी आणावा
जिल्ह्याला आता तीन मंत्री आहेत. त्यांनी आता प्रकल्पासाठी निधी आणण्यासाठी शासनाच्या दरबारात प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यांनी तातडीने या प्रकल्पासाठी निधी आणून हे प्रकल्प मार्गी लावावेत, असे अवाहनही त्यांनी केले.
सर्वपक्षीय प्रयत्न करू या
सध्या राजकारणात पक्षीय फटाफूटी होत आहे. यापेक्षा आता जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सर्व पक्षाच्या आमदारांनी एकत्र येण्याची गरज आहे. सर्वपक्षीय आमदारांनी एकत्र येऊन जिल्ह्यातील प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन निधी आणण्यासाठी प्रयत्न करू या, असे अवााहनही श्री. खडसे यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.