Eknath Khadse : राज्यातील एकनाथ शिंदे यांच्या सरकारविरुद्ध जनतेत प्रचंड आक्रोश आहे. आश्वासने देऊन विविध समाजाची दिशाभूल या सरकारकडून होत असून, राज्यात आणीबाणीसारखी परिस्थिती तयार झाली आहे.
आगामी काळात चांगला पर्याय म्हणून जनता राष्ट्रवादी काँग्रेसकडे अपेक्षेने पाहत आहे. त्यामुळे जोमाने कामाला लागा, पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचा होईल, असा दावा आमदार एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी (ता. ३) पक्षाच्या जिल्हा बैठकीत केला.
राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्हा बैठक जळगाव येथील आकाशवाणी चौकातील पक्षाच्या कार्यालयात झाली. जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील अध्यक्षस्थानी होते. या वेळी खडसे बोलत होते. (eknath khadse statement Outcry against Shinde government in state jalgaon news)
पक्षाचे निरीक्षक प्रसन्न पाटील, माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील, अरुण पाटील, महिला प्रदेशाध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे, शहराध्यक्षा मंगला पाटील, वाल्मीक पाटील, जिल्हा बँकेचे संचालक नाना पाटील, डॉ. सुरेश सूर्यवंशी, रिटा बाविस्कर, जिल्हा समन्वयक विकास पवार आदी उपस्थित होते.
खडसे म्हणाले, की आजची राजकीय स्थिती वादळी झाली आहे. राज्यात सरकारविरुद्ध वातावरण आहे. जनता सरकारच्या विरुद्ध आहे. मनोज जरांगे-पाटलांचे उपोषण सुरू झाले, तेव्हा सरकारने ४० दिवसांचा अवधी मागून घेतला. मात्र, या दिवसांत सरकारने बैठक घेतली नाही. आश्वासन पाळले गेले नाही. त्यामुळे मराठा समाजाचा उद्रेक रस्त्यावर झाला. सरकारच्या हलगर्जीमुळे हे घडले.
गिरीश महाजनांवर टीका
राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्यावर एकनाथ खडसे यांनी टीका केली. ते म्हणाले, की राज्यात शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट आहे. दहा वर्षांपूर्वी भारतीय जनता पक्षाचे मंत्री महाजन जो भाव मागत होते, तो आता शेतकऱ्यांना मिळतो आहे का? कापसावर निर्यात शुल्क लावून सरकारने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे.
आमदार चंद्रकांत पाटलांवरही निशाणा
आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, की दोन वर्षांपूर्वी आमच्या तालुक्यातील आमदार चंद्रकांत पाटील यांनी ‘स्टिंग ऑपरेशन’ केले होते. शेतकरी कसा बदमाश आहे, हे दाखविण्याचा प्रकार त्यांनी केला. या आमदारांमुळे जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना पीकविम्याची नुकसान भरपाई मिळत नाही.
कोळींसह तृतीयपंथीय आंदोलकांकडे मंत्र्यांचे दुर्लक्ष
जळगाव येथे कोळी समाज आणि तृतीयपंथीयांचे आरक्षणाच्या मागणीसाठी बेमुदत उपोषण सुरू आहे. जळगाव जिल्ह्यात तीन मंत्री असताना त्यांच्या तोंडाला केवळ पाने पुसण्याचा प्रकार तिन्ही मंत्र्यांनी केला आहे, असा आरोप खडसे यांनी केला.
रावेर लोकसभा संपर्कप्रमुखांच्या नियुक्त्या
रावेर लोकसभा मतदारसंघावर ‘राष्ट्रवादी’ने दावा केला असून, आता लोकसभा संपर्कप्रमुखांच्या नियुक्त्याही खडसे यांनी शुक्रवारी (ता. ३) जाहीर केल्या. रावेर तालुक्यात माजी नगराध्यक्ष अतुल पाटील आणि मनोहर पाटील हे लोकसभेची जबाबदारी सांभाळतील, असेही खडसे यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.