अमळनेर : सध्या मराठीचे अशुद्ध नव्हे, तर बेशुद्ध लेखन सुरू आहे. भाषेची विकृती टाळणे महत्त्वाचे आहे. आपण ज्या भाषेत बोलतो, लिहितो त्या भाषेचे व्याकरण जाणून न घेणे म्हणजे आईच्या प्रकृतीला काय मानवते आणि काय मानवत नाही, याची माहिती न ठेवण्यासारखे आहे. आईची प्रकृती नीट सांभाळली तर गर्भाचे पोषण नीट होईल.
विचाराचा गर्भ भाषेच्या पोटात आकार घेतो, असे प्रतिपादन पहिल्या अखिल भारतीय एल्गार मराठी गझल संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ गझलकार शिवाजी जवरे (बुलढाणा) यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले. (Elgar ghazal at Amalner was attended by artists from all over country jalgaon news)
अमळनेर येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात शनिवारी (ता. २७) व रविवारी (ता. २८) गझल संमेलन आयोजित करण्यात आले आहे. ज्येष्ठ रंगकर्मी व साहित्य अभ्यासक शंभू पाटील आणि प्रमुख अतिथींच्या हस्ते पूज्य साने गुरुजी.
कवी सुरेश भट व कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलन करून गझल संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. स्वागताध्यक्ष मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते प्रमुख अतिथींचे स्वागत करण्यात आले.
या वेळी समाजसेवक नाना लोढम (अमरावती), ज्येष्ठ साहित्यिक कृष्णा पाटील, दगडू लोमटे (अंबाजोगाई), उद्योजक शरद पाटील (शहादा), खानदेश साहित्य संघाचे सचिव रमेश बोरसे, जयवंतराव पाटील, महेंद्र बोरसे, दिलीप सोनवणे, चेतन राजपूत, ‘लायन्स’चे अध्यक्ष दिलीप गांधी, ‘रोटरी’चे अध्यक्ष प्रतीक जैन प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
अध्यक्ष जवरे म्हणाले, की हे गझल संमेलन खऱ्या अर्थाने कोणत्याही रेषा नसलेल्या सार्वजनिक सहभागाचे संमेलन आहे. कविता ही समकालीन भाषेला उंची देणारी कला होय.
आता समकालीन भाषेला उंची देणे जसे अपेक्षित आहे, तशीच भाषेची स्थानिक संस्कृतीतून उद्भवलेली अंगभूत वैशिष्ट्येही सांभाळली जावीत, अशा अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. उद्घाटक शंभू पाटील म्हणाले, की अविकसित देशातले मूर्ख लोक परक्या भाषेत शिकतात.
तुकारामांसारखे कवी ज्या भाषेत आहेत, त्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी पुराव्याची गरज काय? स्वागताध्यक्ष मंत्री पाटील म्हणाले, की संधी कुणाला मिळते, त्याचा उपयोग कुणी कसा करायचा, हे त्याच्या नशिबावर व प्रयत्नांवर अवलंबून असते.
अमळनेरकर नशीबवान आहेत, त्यांना देशभरातील गझलकारांच्या गझल ऐकायला मिळणार आहेत. संजय पाटील व पूनम बेडसे यांनी सूत्रसंचालन केले. सुनीता पाटील यांनी आभार मानले. त्यानंतर संजय गोरडे, अनघा जावकर, सचिन साताळकर, चंद्रकांत धस, शंकर बावणे.
बाळासाहेब गिरी, संजय खोत, आदेश कोळेकर, डॉ. श्यामा सिंगबाळ, ज्योत्स्ना राजपूत, दिनेश भोसले, दीपाली सुशांत, लतिफ खालेद शेख, विकास घुघे, बाळू श्रीराम, दिनेश कांबळे, वंदना केंद्रे, माया चव्हाण यांनी (कै.) कमलाकर देसले व (कै.) बदिउज्जमा खावर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आपल्या गझल सादर केल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.