तांदलवाडी : हिवाळ्यात उत्तर गोलार्धात मोठ्या प्रमाणावर पडणाऱ्या बर्फामुळे तेथील पक्षी खाद्य व निवाऱ्याच्या शोधात दरवर्षी हजारो किलोमीटर अंतराचा प्रवास करुन उष्ण भागाकडे म्हणजेच दक्षिण गोलार्धात प्रयाण करतात.
खानदेशातील हतनूर जलाशयाच्या परिसरात असे हजारो पक्षी आले होते. त्यांना आता आपल्या मायदेशी परतण्याचे वेध लागले असून हे विदेशी पक्षी सध्या परतीच्या वाटेवर निघालेले दिसून येत आहे.
ज्या काळात उत्तर गोलार्थात प्रचंड बर्फ पडतो, त्या काळात भारतासारख्या देशात फारशी तीव्र थंडी नसते. त्यामुळे भारतात दरवर्षी मोठ्या संख्येने स्थलांतरीत पक्षी येत असतात. खानदेशातील एकमेव हतनूर जलाशय पक्षी जैवविविधतेचे अधिवास क्षेत्र आहे. या ठिकाणी दरवर्षी हिवाळ्यात युरोप, सैबेरिया, मंगोलिया, चीन, रशिया, पाकिस्तान तसेच उत्तर भारतातून अन्न व निवाऱ्याच्या शोधात हजारो देशी-विदेशी विविधरंगी स्थलांतरीत पक्षी जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात दाखल होत असतात.
यात प्रामुख्याने राजहंस, चक्रवाक, मलीन बदक, तरंग बदक, चतुरंग बदक, तलवार बदक, भुवई बदक, चक्रांग बदक, नयनसरी बदक, वारकरी, वैष्णव, मोठा लालसरी, छोटा लालसरी, गढवाल, थापाट्या, शेंडी बदक, नदीसुराय, चातक यासह काही आंतरराष्ट्रीय स्तरावर धोकाग्रस्त झालेल्या प्रजातीसुद्धा येथे पहावयास मिळतात.
दरवर्षी या ठिकाणी चातक निसर्ग संवर्धन संस्था पक्षी निरीक्षण व पक्षी गणना करुन दाखल झालेल्या पक्ष्यांच्या नोंदी ठेवते. परिसरातील मेहुण, चांगदेव, चिंचोल, खामखेडा, कोथळी, मानेगाव, टहाकळी, तांदलवाडी, मांगलवाडी व हतनूर धरण जलाशयाच्या २५ टक्के परिसरातील नदीपात्रात बोटींमध्ये भ्रमंती करून दुर्बिणी व कॅमेऱ्यासारख्या अत्याधुनिक उपकरणांच्या सहाय्याने स्थलांतरीत देशी-विदेशी पक्ष्यांचा अभ्यास देखील केला जातो.
सद्यःस्थितीत उन्हाळ्याची चाहूल लागल्याने या स्थलांतरीत पक्ष्यांचा मुक्काम संपला असून बहुतांश विविध पक्ष्यांचे थवेच्या थवे पुन्हा आपल्या मायदेशी परतीचा प्रवास सुरु केल्याचे पक्षी अभ्यासक अनिल महाजन यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.
''हतनूर जलाशयावर दरवर्षी हजारो परदेशी पक्षी स्थलांतर करुन येत असतात. हतनूर जलाशय जैवविविधतेने नटलेले असून या जलाशयाला ‘रामसर’चा दर्जा मिळण्यासाठी शासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.'' - अनिल महाजन, पक्षी अभ्यासक तथा अध्यक्ष ः चातक निसर्ग संवर्धन संस्था
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.