Jalgaon News : अलीकडच्या स्वार्थी व स्वयंकेंद्री युगात रक्ताचे नाते असलेले देखील नकोसे होत असल्याचे आपण पाहतो, ऐकतो अथवा अनुभवतो देखील. संकट काळात व आजारपणात जवळची व्यक्ती धीर व आधार देण्यासाठी जवळ असावी, त्यामुळे अर्धे दुःख कमी होते.
परंतु अशावेळी नातलगांनी व जवळच्या नात्यातील लोकांनी दुर्लक्ष केले तर माणूस मानसिकदृष्ट्या कोलमोडतो, असाच काहीसा प्रकार आंबेवडगाव (ता. पाचोरा) येथील ७० वर्षीय वृद्ध महिलेसंदर्भात अनुभवायला मिळाला.(Family relatives destroyed saved by humanity An old woman from Ambewadgaon battling death in hospital Jalgaon News)
पोटच्या पोरांसह नातलगाने अव्हेरलेल्या ७० वर्षीय वृद्धेस माणुसकी ग्रुपने तारले. सध्या या वृद्धेवर जळगावच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून, ती वृद्ध मृत्यूशी अक्षरशः दोन हात करत आहे.
आंबेवडगाव येथील ७० वर्षीय वृद्ध महिला एकटी नसून तिला नातलगांचा प्रचंड गोतावळा आहे. परंतु रक्ताच्या नात्यातील मंडळींनी तिची असलेली मालमत्ता गोडी गुलाबीने घेऊन तिची अवस्था बेवारस प्रमाणे केली आहे. ही वृद्धा मातीच्या पडक्या, लहानशा घरात पडून राहते.
शेजारी तिला चहा, भाजी, भाकरी व काही खाद्यपदार्थ देतात. या वृद्धेची प्रकृती बिघडल्यानंतर ती घरातच बेशुद्ध अवस्थेत पडलेली होती. जवळच राहणाऱ्या दिलीप जैन, सुरेखा जैन यांनी या वृद्धेच्या नातवाशी संपर्क साधून तिच्या अवस्थेची माहिती दिली. परंतु आम्हीच आमच्या विवंचनेत आहोत.
आमच्या जवळ पैसे नाहीत आम्ही उपचार करू शकत नाहीत. अशी उत्तरे मिळाल्यानंतर दिलीप मराठे, बापू मराठे, दिलीप जैन, सुरेखा जैन व शेजारच्या महिलांनी खाटीखाली निपजत पडलेल्या या वृद्धेस उचलले. कोणीही नातलग येणार नाही हे पाहून जळगाव येथील माणुसकी ग्रुपचे जिल्हाध्यक्ष गजानन क्षीरसागर यांना या वृद्धेसंदर्भात माहिती देण्यात आली.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
क्षीरसागर यांनी तत्काळ आंबे वडगाव गाठले व त्यांनी तिच्या नातलगांशी भ्रमणध्वनीवरून विचारपूस करत वृद्धेच्या प्रकृती संदर्भात माहिती दिली. परंतु त्यांना योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही.
तेव्हा क्षीरसागर यांनी शेजारी राहणाऱ्या महिलांच्या मदतीने या वृद्धेची आंघोळ घालून तिच्या अंगावर व्यवस्थित कपडे टाकून पिंपळगाव हरेश्वर (ता. पाचोरा) पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांना या संदर्भात माहिती देऊन १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेचे स्वप्नील देवरे व डॉ. नीलिमा पाठक यांच्या मदतीने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात आणले.
प्राथमिक उपचार करून या वृद्धेस जळगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे.
माणुसकी ग्रुपचे अनेकांकडून कौतुक
सध्या ही वृद्धा जळगावच्या शासकीय रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. नातलकांनी अव्हेरले पण माणुसकीने तारले प्रचंड नातलगांचा गोतावळा असताना वृद्ध महिलेच्या हलाखीच्या परिस्थितीतही नातलगांनी कोणतेही लक्ष न दिल्याने समाज मनातून संतप्त भावना व्यक्त झाल्या व वृद्ध आजीच्या मदतीसाठी धावून आलेल्या माणुसकी ग्रुपचे अनेकांकडून कौतुक झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.