जळगाव : माथाडी कामगार संघटनेने कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमालीचा २५ टक्के दरवाढीचा प्रस्ताव दिला आहे. मात्र, हा प्रस्ताव शेतकऱ्यांना मंजूर नाही. ही दरवाढ शेतकऱ्यांना विचारात न घेता केलेली आहे. त्यामुळे ती रद्द करण्याची मागणी असोदा येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे, की माथाडी संघटनेने २५ टक्के दरवाढीचा प्रस्ताव मांडून शेतकऱ्यांवर आघातच केलेला आहे. बारदान शिलाई काम करणाऱ्यांच्या दरवाढीचादेखील यात संदर्भ घेतला असून, हमालीचे नवीन दर लागू झाल्यास शेतकऱ्यांच्या पट्टीतून कपात वाढणार आहे, तसेच हमाली, तोलाईदेखील पट्टीतून कायदेशीररीत्या कपात करण्यात येणार आहे. वराईंची रक्कम वाहतूकदार देत असला, तरी तो भाड्यातूनच अप्रत्यक्षरीत्या शेतकऱ्यांकडून घेत असतो. अडत खरेदीदारांकडून घेणे बंधनकारक आहे, परंतु व्यापारी माल कमी भावात घेत असल्याने अप्रत्यक्षरीत्या अडतीचा भुर्दंडही शेतकऱ्यांवर पडतो.
तर शेतकरी विरोध करतील
दरवाढीचा प्रस्ताव मंजूर झाल्यास अडतदेखील त्याच प्रमाणात द्यावी लागणार आहे व या दरवाढीवर लेव्हीचा भुर्दंडही कायम राहणार आहे. त्यामुळे सद्यःस्थितीत ही दरवाढ करू नये अन्यथा शेतकरी त्याला तीव्र विरोध करतील, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. दरम्यान, या बैठकीला शासन आदेशानुसार बाजार प्रतिनिधी, शेतकरी प्रतिनिधींची उपस्थिती अनिवार्य असतानाही हे प्रतिनिधी अनुपस्थित असल्याचे व ही अनुपस्थिती धोकादायक असल्याचेही या वेळी सांगण्यात आले.
सभापतींना निवेदन
नवनिर्मित शेतकरी मंडळाचे किशोर चौधरी, श्री दुर्गामाता स्वयंसहाय्यता शेतकरी गटाचे मिलिंद चौधरी, संजय चिरमाडे, संदीप नारखेडे, संजय ढाके, योगराज भोळे, गिरीश भोळे आदी उपस्थित होते. जिल्हा उपनिबंधक व जळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतींनाही हे निवेदन देण्यात आले.
संपादन- भूषण श्रीखंडे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.