Jalgaon Agriculture: कडेवरचे गेले आता पोटातल्याची आशा! रब्बीची दैनावस्था; बळीराजा चिंताग्रस्त

Cotton
Cotton esakal
Updated on

Jalgaon Agriculture: तालुक्यात यंदा खरिपापाठोपाठ रब्बी हंगामाचीही दैनावस्था होत असून ‘कडेवरचे गेले आता पोटातल्याची आशा’ अशा अपेक्षेत शेतकरी आहेत. अशातच कापूस पिकावरील गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव शेतकऱ्यांची चिंता वाढवणारा ठरत आहे.

यंदा पावसाचा अनियमितपणा, अवेळी झाल्याने खरीप हंगाम हातचा गेला. जे उत्पादन हाती आले त्यातून बळीराजाला श्रमाचा मोबदला तर सोडा परंतु झालेला खर्चही निघाला नाही.

त्यामुळे रब्बी हंगामावर त्याचा परिणाम जाणवत आहे. एकूण क्षेत्राच्या अवघे २५ टक्के रब्बी पेरणीचे क्षेत्र आहे. गेल्या वर्षापेक्षा यावर्षी सुमारे पंधरा टक्क्यांनी रब्बीचे क्षेत्र कमी झाले असल्याचे चित्र आहे. (farmers are concerned due to rabi season jalgaon news)

खरीप हंगाम हातचा गेल्याने शेतकरी कमालीच्या आर्थिक विवंचनेत सापडला आहे. ज्यांच्याजवळ पाण्याची व्यवस्था आहे, त्यांनी मिळेल त्या व्याजदराने पैसा उचलून रब्बी पेरणीची हिंमत दाखवली. रब्बीतून खरीपाच्या नुकसानीतून सावरता येईल, असा आशावाद उराशी बाळगून शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाची तयारी केली. परंतु सध्याची स्थिती पाहता खरिपा पाठोपाठ रब्बीही हातचा जाऊन बळीराजा आर्थिक विवंचनेत सापडण्याची भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे.

पांढरे सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापूस लागवडीचे क्षेत्र ‘जैसे थे’ असले तरी पाऊस कमी झाल्याने शेवटपर्यंत पाणी देऊन कापूस पीक जगवणे अशक्य होणार आहे. कापसाला सात हजारापर्यंत भाव मिळत असल्याने भावा संदर्भातील शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग झाला आहे. दादर, ज्वारी, मका यांचा पेरा करण्यात आला असला तरी सिंचन प्रकल्पातील पाण्याचा साठा व विजेचा पुरवठा पाहता या पिकांचे समाधानकारक उत्पादन शेतकऱ्यांच्या हाती लागेल असे सध्या तरी दिसत नाही.

वीज वितरणतर्फे सहा तास वीज देण्याचे धोरण राबविण्यात येत असून टप्प्याटप्प्याने वीजपुरवठा दिला जात असल्याने सध्या तरी वीजपुरवठा पूर्ण दाबाने मिळून पिकांना पाणी देऊन जगवणे शक्य होत आहे. एकूणच सिंचन प्रकल्पातील पाणीसाठा, भूजल पातळी व विहिरींची पातळी लक्षात घेता पाणी देऊन पिके जगवणे व उत्पादन हाती घेणे जिकरीचे होणार असल्याचा सूर जाणकार शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. जगतील तोपर्यंत पिके जगवू, वीज व पाण्याचा प्रश्न गंभीर झाला तर आहे तो चारा काढून शेती मोकळी करू अशा प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करू लागले आहेत.

Cotton
Jalgaon Agriculture News : बोन्डअळी दणकली, एकरी 2 क्विंटलचा उतारा!

खर्च निघणे कठीण

उन्हाळ्यात पाण्याअभावी भयावह परिस्थिती निर्माण होण्याचे भाकीत केले जात आहे. पाण्याची टंचाई, विजेचा कमी दाबाने पुरवठा व नियोजन शून्यता याचे चटके शेतकऱ्यांसह सर्वांनाच सोसावे लागणार असल्यास सूर व्यक्त होऊ लागला आहे.

भाजीपाला उत्पादक सध्या समाधानी असले तरी भविष्यात मात्र पावसाअभावी भाजीपाला उत्पादन देखील हातातून जाण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे. अशा भयावह परिस्थितीत कापूस वेचणीसाठी मजुरांची चणचण भासू लागली असून मजुरीचे दरही शेतकऱ्यांना सोसणे अशक्य होत आहे. कापूस वेचणीसाठी सुमारे १५ रुपये किलो प्रमाणे मजुरी द्यावी लागत आहे. एकूण उत्पन्नाच्या पंचवीस टक्के उत्पन्न मजुरीतच जाणार असल्याने झालेला खर्चही निघणार नाही असे चित्र निर्माण झाले आहे.

पशूपालकही चिंताग्रस्त

भविष्यात पशुधनासाठी पाणी व चाऱ्याचा प्रश्न आहे बिकट होणार असल्याने पशुधन मालकही चिंताग्रस्त झाले आहेत. तालुक्यातील बहुतांश पशुधन मालकांनी आपल्याकडील पशुधनाचे स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. तर काही जास्तीची असलेली जनावरे विक्री करण्याच्या मनस्थितीत आहेत. शासन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे धोरण राबवत असले तरी भरपाई मिळणार तरी किती? आणि त्यातून पुढील खरीप उत्पादनासाठी खंबीरपणे उभे राहणे बळीराजाला कितपत शक्य होईल? या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे.

पुढील वर्ष निवडणुकांचे असल्याने शासनाकडून घोषणांचा पाऊस पडून बळीराजाची मनधरणी करण्याचे प्रयत्न होतील. मात्र, प्रत्यक्षातील परिस्थिती पाहता खरीपा पाठोपाठ रब्बीही हातून जाण्याचे चित्र असल्याने शेतकरी पुढील हंगामासाठी खंबीरपणे उभा राहू शकेल असे चित्र दिसत नसल्याचे जाणकारांकडून बोलले जात आहे.

Cotton
Jalgaon Agriculture News : अज्ञात माथेफिरूकडून केळी पिकाचे नुकसान; शेतकरी हैराण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.