Jalgaon News : तुम्हीच सांगा जनावरे सांभाळायची तरी कशी? शेतकऱ्यांचा उद्विग्न सवाल

cow
cowesakal
Updated on

Jalgaon News : शेती व्यवसायाला दूध व्यवसाय हा जोडधंदा मानला जातो. परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे हा शेतकऱ्यांचा जोड व्यवसाय धोक्यात आला आहे. चाऱ्याचे दर गगनाला भिडले असून, दुधाचे दर मात्र ‘जैसे थे’ आहेत.

त्यामुळे उत्पन्न तर दूरच, उलट २० ते ३० रूपये शेतकऱ्यांला खिशातून खर्च करावे लागत आहे. आज शेतकऱ्याला फक्त शेणखतच मिळते. उत्पन्न मात्र शून्य, अशी परिस्थिती दूध उत्पादक शेतकऱ्यांची झाली आहे. (Fodder prices increase rate farmer was worried jalgaon news)

त्यामुळे जनावरे सांभाळायची तरी कशी, असा उद्विग्न सवाल वावडे येथील दूध उत्पादक सुरेश विश्वास पाटील यांनी उपस्थित केला.या वर्षी पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने सध्याची स्थिती पाहता पावसाचे प्रमाण कमी असल्याने मका पिकाची म्हणावी तशी चांगली नाही.

त्यातच उभ्या पिकातील कणसात लष्करी अळी शिरल्याने शेतकऱ्यांचे हातचे हे पीक गेले असल्याने जनावरांसाठीच्या वैरणीच्या हिरव्या चाऱ्याचे दर गगनाला भिडले आहेत. दर देऊनही चारा मिळत नसल्याने जिवापाड जपलेल्या दुभत्या जनावरांची सर्वाधिक घट झाली असून, दुष्काळ स्थितीमुळे शेतकरी दुभती जनावरे संभाळण्यास धजावत नाहीत.

यामुळे जनावरे खाटकाच्या दावणीला कवडीमोल दराने देत आहेत. यामुळे दुष्काळस्थितीच्या जोखडात धवलक्रांती शेवटच्या घटका मोजत आहे. पावसाची आशा मावळली असून, उन्हाची तीव्रता सध्या वाढत चालली आहे. ग्रामीण भागामध्ये जनावरांच्या चाऱ्याचे दरही वाढत आहेत. मात्र गायी व म्हशीच्या दूध खरेदी दरामध्ये कोणतीही वाढ होत नाही.

त्यामुळे दुग्ध उत्पादक तसेच शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्‍त होत आहे. असे असताना दूध संस्थाचालकांच्या मनमानी कारभारामुळे शेतकऱ्यांना दुधासाठी वाढीव दर तर मिळालाच नाही. उलट पूर्वी मिळत असलेला दरही नीट मिळत नाही. त्यामुळे सध्याच्या स्थितीमध्ये दूध धंदा करणे अडचणीचे ठरत आहे.

cow
Jalgaon News : 10 तांड्यांमध्ये होणार 1 कोटींची विकासकामे

शेतकऱ्यांच्या दुधाला पूर्वी ३८ ते ३९ प्रति लिटर दर मिळत होता. परंतु सद्यस्थितीत दुधाचे दर ३० ते ३२ रुपये इतका दर मिळत असून, साठ किलो ढेपाचे पोते १९५० रुपयांपर्यंत मिळत आहे. जनावरांसाठीच्या वैरणीच्या चाऱ्याचा खर्च पाहता सद्यस्थिती दर शेतकऱ्यांना परवडणारे नसल्याने बळीराजा संकटात सापडला आहे.

''दुष्काळ परिस्थितीमुळे दुभती जनावरे संभाळणे शेतकऱ्यांना अवघड जात असल्याने व दुभत्या जनावरांना लागणाऱ्या खुराकाचे भाव वाढले असल्याने ते संभाळणे जोखमीचे ठरत आहे. पर्यायाने शेतकरी दुभती जणावरे बाजारात विक्रीसाठी नेत आहेत. यामुळे मागच्या वर्षीच्या तुलनेत दूध उत्पादनात निम्म्याने घट झाली आहे.''- डॉ. चेतन पाटील, दूध संकलन केंद्र, वावडे

''दुधाला चांगला भाव मिळायला हवा. तरच हा व्यवसाय टिकेल. यावर दूध उत्पादकांना कर्ज, अनुदान मिळण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला पाहिजे. पशुधनाची किंमत वाढत आहे. पशुखाद्यवरही शासनाचे नियंत्रण असायला हवे. पाण्यापेक्षा दुधाला भाव कमी आहे.''- शिवाजी राजाराम पाटील, दूध केंद्रचालक, वावडे

''दुधाच्या पावडरचा भाव घसरला, तर लगेच दुधाचे भाव कमी होतात. दहा लिटर दूध देणारी गाय असेल तरच परवडते, नाहीतर परवडत नाही. अन् व्यवसाय परवड नाही म्हणून काहींनी व्यवसायच सोडून दिला आहे.''- गुलाब पंडित पाटील, दूध उत्पादक शेतकरी, वावडे

cow
Jalgaon News : प्रदूषणात महामार्गावरील दुरुस्तीच्या कामाची भर; धुळीचा त्रास अन् वाहतुकीचा खोळंबा

जनावरे सांभाळणे जिकरीचे

दिवसभरात एका गाईला साधारणतः हा तीन वेळेस पोटभर चारा लागतो. यापैकी एक वैरण कोरडे व दोन वैरण हिरवे व सकाळ, सायंकाळी एका वेळेस कमीत कमी दोन किलो सरकी पेंड म्हणजे चाऱ्याचे.

आज स्वतःकडे चारा उपलब्ध आहे म्हणून १५० ते २०० रूपये व सरकी पेंड दोन वेळेस ७० ते ७५ रूपये, माणसाचा रोज २५० ते ३०० रूपये एकूण ५१० रूपये खर्च येतो. जर एखादी गाय ८ लिटर दूध देत असेल तर ८×३० =२४० +२४० =४८० रूपये असे पैसे मिळतात. उलट २० ते ३० रूपये शेतकऱ्यांला खिशातून खर्च करावे लागत आहे. त्यामुळे कुटुंबाची गुजराण करताना कसरत करावी लागत आहे, अशी प्रतिक्रिया दूध उत्पादक सुरेश पाटील यांनी दिली.

cow
Jalgaon News : रोटवद येथील जवान शहीद; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.