Jalgaon Crime News : प्राणघातक हल्ला, खुनाचा प्रयत्न, जबरी लूट, दंगल यांसारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या रेकॉर्डवरील टोळीला पोलिस अधीक्षकांनी थेट दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार केले आहे.
हद्दपार झालेल्या टोळीतील पाच सदस्यांमध्ये दोन पित्यांचाही समावेश असून, बाप-लेक अशा जोडीने गुन्ह्यात सहभागी असलेल्यांनी स्वतःच टोळी तयार करून गुन्हेगारी करत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.(Gang of son and father banished for 2 years jalgaon crime news)
औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यांच्या यादीत आणि प्रतिबंधात्मक कारवाया करूनही नियंत्रणात येत नसलेल्या गुन्हेगारांच्या कठोर कारवाईसाठी हद्दपार प्रस्ताव जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयास पाठविण्यात आले होते.
टोळीप्रमुख हितेश संतोष शिंदे (वय २५), संतोष उर्फ जांगो रमेश शिंदे (वय ४५), आकाश ऊर्फ नागतोड्या संजय मराठे (वय २२), सुमीत ऊर्फ गोल्या संजय मराठे (वय २७), संजय देवचंद मराठे (वय ५०, सर्व रा. चौगुले प्लॉट, कांचननगर, जळगाव) अशांच्या टोळीविरुद्ध शनिपेठ पोलिस ठाण्यासह जिल्हापेठ, एमआयडीसी, आणि शहर पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, जबरी लूट, दंगल, दुखापत, घातक हत्यार बाळगणे, हाणामारी, शिवीगाळ, दमदाटी, आदेशाचे उल्लंघन अशा विविध प्रकारांत सात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. ज्यात या टोळीतील प्रत्येकाचा सक्रिय सहभाग निष्पन्न झाला आहे.
प्रतिबंधक कारवाई निरुपयोगी
जळगाव शहरात ठिकठिकाणी या टोळीकडून दहशत पसरविली जात होती. परिणामी, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरवून जीवितास व जंगम मालमत्तेस धोका निर्माण झालेला होता. या टोळीवर वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करूनसुद्धा त्यांच्या वर्तनात कुठलाही बदल आढळून आला नाही.
शनिपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक आर. टी. धारबळे यांच्या पथकातील सहाय्यक फौजदार संजय शेलार, अश्वीन हडपे, परिश जाधव, राहुल पाटील, अनिल कांबळे, राहुल घेटे, मुकुंदा गंगावणे यांनी प्रस्ताव तयार करून वरिष्ठांना सादर केला. डीवायएसपी संदीप गावित यांच्या कार्यालयास प्रस्ताव प्राप्त होताच त्यांनी पोलिस अधीक्षकांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेला रवाना केला.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक किसन नजन-पाटील यांच्या पथकातील सहाय्यक फौजदार युनूस शेख इब्राहिम, सुनील पंडित दामोदरे यांनी अंतिम प्रस्ताव पूर्ण केल्यावर पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांच्यातर्फे प्रस्तावाची चौकशीअंती पाचही संशयितांना जिल्ह्यातून दोन वर्षे हद्दपारीचे आदेश पारित केले आहेत.
मुलांच्या गँगमध्ये पित्यांचा सहभाग
हद्दपार करण्यात आलेल्या पाच संशयितांच्या टोळीत दोन पिता आहेत. त्यात आकाश, सुमीत यांचे वडील संजय देवचंद मराठे (वय ५०) तर, हितेश शिंदेच्या वडिलांचे नाव संतोष रमेश शिंदे अशा बाप-लेकांच्या टोळीचा हद्दपारीत समावेश आहे.
एरवी पित्याकडून गुन्हेगारी वारसा मुलांना मिळाल्याचे अनेक चित्रपटात आणि कथा कादंबऱ्यांमध्ये चितारलेले आढळून येत. मात्र, पोलिस दलाने हद्दपार केलेल्या जळगावच्या या टोळीत मुलांच्या गँगमध्ये पित्याने सहभागी होत गुन्हे केल्याची माहिती पोलिसांतर्फे देण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.