Jalgaon News : जळगाव जिल्ह्यात भाजपला ‘अच्छे दिन’ आले आहेत. एकेकाळचे भाजपचे कट्टर विरोधक कॉंग्रेसचे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी ‘कमळ’ हाती घेतले आहे. तर भाजपवर कडवट टीका करणारे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते संजय गरुड हेही भाजपच्या मार्गावर आहेत.
एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर भाजपत नेतृत्वाचा अभाव असे सांगितले जात होते. मात्र ग्रामविकास मंत्री व भाजप संकटमोचक म्हटले जाणारे गिरीश महाजन यांनी विरोधकांना पक्षात सामील करून घेत नेतृत्वाचा चाणाक्षपणा दाखविला आहे. (Girish Mahajan shown leadership by bringing opposition into bjp party jalgaon news)
आगामी लोकसभा निवडणुकीत रावेर मतदारसंघात उमेदवाराबाबत चर्चा सुरू असताना, जर भाजपने महाजन यांच्या रावेर येथील उमेदवारीबाबत निर्णय घेतल्यास यशासाठी त्यांनी जमीन सुपीक करून ठेवली असल्याचे दिसून येत आहे. जळगाव जिल्ह्यात भाजपचे दोन खासदार, चार आमदार आहेत. जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पक्षाचीच सत्ता होती.
मात्र गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर भाजपला काही अंशी झटका बसेल असे अनेकांना वाटत होते. गिरीश महाजन यांना आपल्या नेतृत्वात पक्षाला आणखी ताकद देण्याचे आव्हान होते.
सहकार क्षेत्रातील निवडणुकीत खडसे यांच्या ताब्यातून दूध संघ भाजपच्या ताब्यात घेण्याची त्यांची परीक्षा होती, महाजन यांनी मंगेश चव्हाण या समर्थकाच्या साथीने खडसे यांची सत्ता खालसा करून भाजपप्रणित सहकाराचा झेंडा फडकविला.
महाजन यांच्या नेतृत्वाचे सहकार क्षेत्रातील हे मोठे यश मानले जात असले लोकसभा निवडणुकीत यश मिळविण्याचे तसेच जिल्ह्यातील नव्हे तर, खानदेशातील चारही लोकसभा मतदारसंघातील उमेदवार निवडून आणण्याचे आव्हान आहे.
धुळे जिल्ह्यात अमरिशभाई पटेल यांच्यासारखा मोहरा भाजपमध्ये सहभागी करून त्या ठिकाणी ताकद भक्कम केली आहे. नंदुरबारमध्ये मंत्री विजयकुमार गावित यांची ताकद आजही कायम आहे..
जळगाव जिल्ह्यात रावेर व जळगाव या दोन्ही मतदारसंघांत पक्ष भक्कम असला तरी रावेर लोकसभा मतदारसंघात एकनाथ खडसे यांचे आव्हान होते, त्या दृष्टीने तयारी करण्याची गरज आहे.
त्यामुळे पक्षाने या मतदारसंघावर अधिक लक्ष केंद्रित केल्याचे दिसून आले. गिरीश महाजन यांनी थेट विरोधी पक्षानाच सुरुंग लावले, त्यांनी कॉंग्रेसचे कट्टर नेते व माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनाच पक्षात आणले.
जामनेर मतदार संघातील कट्टर विरोधक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संजय गरुड यांनाही त्यांनी भाजपच आणण्याची खेळी केली. या शिवाय आता आणखी रावेर विधानसभा मतदार संघातही कॉंग्रेसला झटका देण्याची त्यांची तयारी असल्याचे सांगण्यात येत आहे.
महाजन यांनी विरोधकांना दिलेल्या धक्क्यात रावेर लोकसभा मतदारसंघातील सामाजिक व राजकीय गणितही साधले आहे. या मतदारसंघातून विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना उमेदवारी मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
परंतु, दुसरीकडे पक्षातर्फे उमेदवारीतही बदल होण्याचे संकेत असल्याचे सांगण्यात येत आहे. या मतदारसंघातून गिरीश महाजन यांनाही लोकसभेसाठी लढण्याचे संकेत आहेत.
असे झालेच तर आपल्याला या लढाईत यश मिळावे यासाठीही मतदारसंघाची जमीन सुपीक केल्याचेही दिसून आहे. महाजन हे राज्यस्तरावर पक्षाचे नेतृत्व करीत आहेत. राज्यातील सरकारला अनेक अडचणीतून बाहेर काढण्यात त्यांना यश मिळाले आहे.
त्यामुळे त्यांना ‘संकटमोचक’ पदवी आता फिट्ट बसली आहे. मात्र दुसरीकडे जिल्ह्याकडेही त्यांचे लक्ष असून आपल्या नेतृत्वाची पकड घट्ट असल्याचा चाणाक्षपणाही ते विरोधकांना धक्के देवून दाखवीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.