जळगाव : कर्जाची नियमित फेड करणाऱ्या जिल्ह्यातील ८६ हजार ७३४ खात्यांची माहिती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने राज्य शासनाकडे पाठविली आहे. दरम्यान, या खातेधारक शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कम मिळण्याचे संकेत या निमित्ताने मिळाले आहे. (Grants to 86 thousand farmers in Jalgaon district)
शेतकरी कर्जमुक्ती योजनेत आत्तापर्यंत दीड लाखाहून अधिक शेतकऱ्यांना ९१५ कोटी रुपयांच्या कर्जमुक्ती योजनेचा लाभ झाला आहे. दोन लाखाहून अधिक कर्ज असलेल्या कर्जखात्यांची संख्या ९ हजार ९१ इतकी आहे. त्याची रक्कम २१२ कोटी इतकी आहे. नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या खात्यांची संख्या ८६ हजार ३४ इतकी आहे. शासनाने नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानापोटी ५० हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्याची घोषणा केली होती.
कर्ज खात्यांची माहिती
जिल्हा बँकेने नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या ८६ हजार ७३४ शेतकऱ्यांची माहिती राज्य शासनाकडे रवाना केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आता या शेतकऱ्यांची माहिती शासन स्तरावर तपासणी करून नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंतचे अनुदान देण्याची प्रक्रिया केली जाणार आहे.
साडेपाचशे कोटींचे कर्जवाटप
जिल्हा बँकेने यंदाच्या खरीप हंगामासाठी १ लाख ५६ हजार ८७८ शेतकरी सभासदांना ५८४ कोटी १६ लाख रुपयांचे कर्जवाटप केले आहे. इतर बँकांच्या तुलनेत ८० टक्क्यांपेक्षा अधिक कर्जवाटप केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
उपमुख्यमंत्र्यांनी दिला होता शब्द
जळगाव जिल्हा दूध संघाच्या एका कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा पुनरुच्चार करीत शब्द दिला होता. तसेच नुकत्याच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या जिल्हा दौऱ्यावर येऊन गेल्या. त्यांच्या दौऱ्यातही प्रोत्साहनपर अनुदानाविषयीचा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी उपमुख्यमंत्र्यांशी बोलून याबाबत त्वरित निर्णय घेण्याबाबत चर्चा केली जाईल, असे सांगितले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.