Jalgaon News : गिरणा धरण १९६९ मध्ये पूर्ण झाले. ५२ वर्षात ते १२ वेळेस पूर्ण भरले आहे. गेल्या चार वर्षांपासून हे धरण लागोपाठ १०० टक्के क्षमतेने भरले होते. मात्र यावर्षी गेल्यावर्षाच्या तुलनेत केवळ ५७ टक्के धरण भरल्याने सिंचनाचे आवर्तन सोडण्यास अडचण निर्माण होणार आहे.
मात्र यावर्षी गिरणा धरणातून बिगर सिंचनासाठी ४ आवर्तने पाण्याच्या उपलब्धतेनुसार व मागणीनुसार सोडण्याचा निर्णय शुक्रवारी (ता. ३) पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या सभागृहात ही बैठक झाली. (Gulabrao Patil statement District residents will get 4 cycles from Girna Dam jalgaon news )
आमदार चिमणराव पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अधीक्षक अभियंता एस. डी. दळवी, कालवा सल्लागार समिती सदस्य दत्तू जगन्नाथ ठाकूर, निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार, पाटबंधारे विभागाच्या अदिती कुलकर्णी, मध्यम प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता विनोद पाटील, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता सौ. नलावडे, कार्यकारी अभियंता एस. सी. निकम, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता जी. एस. भोगवडे, उपकार्यकारी अभियंता सुभाष चव्हाण, सिद्धार्थ पाटील, विजय जाधव व सर्व क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते.
डिसेंबर २०२३ , फेब्रुवारी, एप्रिल व जून २०२४ मध्ये ४ आवर्तने सोडण्यात येणार आहेत. यावेळी पाणी वापर हा काटकसरीने करून गिरणा प्रकल्पावरील कालवा प्रणालीवरील आनुषंगिक बांधकामे, माती भराव यासह तात्काळ दुरुस्तीची कामे हाती घेण्यात यावीत, गिरणा कालवा प्रणालीची कामे ६० वर्षांपूर्वी झाली असल्याने कालवा प्रणालीचा नूतनीकरणाचा प्रस्ताव सरकारला सादर करावा आणि जिल्ह्यात भविष्यातील पाणीटंचाई उपाययोजनांबाबत सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
३८२ गावांना लाभ
हतनूर, गिरणा, वाघूर हे तीन मोठे प्रकल्प असून त्यावर १३८ गावे अवलंबून आहेत. बोरी, भोकरबारी, मन्याड, अंजनी, अग्नावती, बहुळा, तोंडापूर, हिवरा, गुळ या मध्यम प्रकल्पांवर १०१ गावे अवलंबून आहेत. ४० लघू प्रकल्पांचा १४३ गावांना लाभ होतो. या तीनही प्रकारातील प्रकल्पांचा जिल्ह्यातील ३८२ गावांना लाभ होतो. या सर्व प्रकल्पांमधील विभागाने सुचविल्याप्रमाणे पाणी आरक्षणाला बैठकीत मान्यता प्रदान करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी पाण्याची बचत करून पाणी टंचाईबाबत सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश दिले.
पाणी टंचाईचा घेतला आढावा
सद्यःस्थितीत जळगाव जिल्ह्यात अमळनेर, पारोळा, चाळीसगाव व पाचोरा या चार तालुक्यात पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता आहे. याबाबत आवश्यक त्या ठिकाणी तात्पुरत्या पाणीपुरवठा योजना कार्यान्वित कराव्यात. विहीर अधिग्रहण आवश्यक असेल अशा ठिकाणी यापूर्वी केलेल्या विहिरीची स्थिती आणि संभावित विहिरीचे अधिग्रहण स्थळ निश्चित करून अधिग्रहित केलेल्या विहिरीची पाणी नमुना तपासणी करून घ्यावी.
लोकप्रतिनिधी, सरपंच, ग्रामसेवक, गटविकास, तहसीलदार यांनी एकत्रित तालुकानिहाय बैठका घेऊन पंधरा दिवसात पाणीटंचाई आराखडा द्यावा, अशा सूचना पाणीटंचाई आढाव्यावेळी देण्यात आल्या. उपकार्यकारी अभियंता चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले.
गिरणावर महापालिकेसह तीन पालिका अवलंबून
गिरणा प्रकल्प अंतर्गत पिण्यासाठी अवलंबून असणाऱ्या संस्थांमध्ये मालेगाव महापालिका, चाळीसगाव, भडगाव व पाचोरा नगरपालिका आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या २ योजनांचा समावेश आहे. चाळीसगाव, भडगाव, पाचोरा व एरंडोल तालुक्यातील १५४ गावांचाही समावेश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.