धुळे : जिल्ह्याला शुक्रवारी (ता. ७) दुपारनंतर वादळी वाऱ्यासह(heavy rain) गारपिटीने चांगलेच झोडपले. शिंदखेडा तालुक्याला दुपारी चार ते सायंकाळी सातच्या सुमारास वादळी वाऱ्यासह गारपिटीने झोडपले. यामुळे रब्बी हंगामातील दादर (ज्वारी) व हरभरा ही फुलाऱ्यावरील पिके आणि गहू, कांदा, भुईमूग व ऊसपीक भुईसपाट झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. या अवकाळी पावसामुळे हजारो हेक्टर जमिनीवरील रब्बी पिके धोक्यात आली आहेत. वृक्ष व विजेचे खांब उन्मळून पडल्याने तालुक्यातील काही गावांतील वीजपुरवठा खंडित झाला आहे. रात्री उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरू होती.
शिंदखेडा तालुक्यात शुक्रवारी दुपारी चारपासून तापी नदीकाठावरील(tapi river) गावांच्या शिवारात वादळी वाऱ्यासह गारांच्या पावसाला सुरवात झाली. मात्र पाचच्या सुमारास तालुक्यात सर्वत्र अवकाळी पावसाला सुरवात झाली. सायंकाळी सातपर्यंत सर्वत्र जोरदार पाऊस झाला. रात्री उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरू होती. तालुक्याचे नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने कपाशीचे क्षेत्र रिकामे झाले होते, शेतकऱ्यांची भिस्त रब्बी हंगामावर होती. मात्र शुक्रवारच्या पावसाने रब्बी दादर (ज्वारी), हरभरा, गहू, कांदा, भुईमूग, तर बारमाही बागायती ऊस, केळी, पपई व शेवगा आणि बहुवार्षिक फळबागा यांचे मोठे नुकसान झाले.
अधिकारी ‘नॉट रिचेबल’!
शिंदखेडा तहसील कार्यालयातील दूरध्वनी क्रमांकावर शेतकऱ्यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता रिंग जात होती पण कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. निवासी नायब तहसीलदार बन्सीलाल वाडिले यांचा मोबाईलही रात्री पावणेआठच्या सुमारास बंद झाला. तालुक्यातील शेतकऱ्यांवर एवढे भयानक गंभीर संकट आले असताना महसूल विभागाने एवढे गांभीर्य दाखविले नसताना शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.