Jalgaon News : अनेक वर्षांपासून चाळण झालेल्या इच्छादेवी चौक ते डी- मार्टपर्यंतचा रस्ता कुणी करायचा, याचा प्रश्न निकाली निघत एकदाचे या रस्त्याचे कॉंक्रिटीकरण झाले खरे.
मात्र, हा नवीन रस्ता वाहनधारकांसाठी केला, की रस्त्याला ‘बापाची’ मालमत्ता समजून त्यावर अतिक्रमण करणाऱ्या मुजोर अतिक्रमणधारकांचा, असा प्रश्न निर्माण झालांय. (Icchadevi Chowk D Mart road is in encroachment jalgaon news)
रस्त्यावर दुतर्फा झालेल्या अतिक्रमणामुळे या संवेदनशील भागातून जाताना वाहनधारकांना जीव मुठीत घेऊनच जावे लागत आहे.
रस्त्यावरील अतिक्रमणाच्या भीषण परिस्थितीबाबत महापालिका अतिक्रमण निर्मूलन विभाग आणि शहर पोलिस वाहतूक शाखा या दोन्ही यंत्रणा उदासीन व सुस्त आहेत. रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याची हिंमत या यंत्रणा दाखवतील का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
संवेदनशील रस्ता
इच्छादेवी चौक ते डी- मार्टपर्यंतच्या रस्त्याची समस्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. एकतर या रस्त्याच्या दुतर्फा जी वस्ती आहे, तो भाग अत्यंत संवेदनशील समजला जातो. याच रस्त्यावरून दरवर्षी श्री गणेश विसर्जन मिरवणूक जाते.
त्यामुळे हा रस्ताही संवेदनशील आहे. मात्र, अनेक वर्षांपासून त्याची खड्ड्यांनी अक्षरश: चाळण झाली होती. विसर्जनाचा दिवस जवळ आला, की महापालिकेकडून तात्पुरत्या डागडुजीपलीकडे कधीही रस्त्याचे काम झाले नाही. महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याच्या मालकीवरून हात झटकले होते.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
प्रलंबित रस्त्याचे काम, पण उपयोग शून्य
अखेरीस काही जबाबदार नागरिकांनी पुढाकार घेत या रस्त्याच्या कामाचा पाठपुरावा केला. शासन स्तरावर प्रयत्न करून रस्त्याची मालकी शोधून काढली.
सार्वजनिक बांधकाम विभागाने मालकी मान्य करत रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाची निविदा प्रसिद्ध करून अखेर या रस्त्याचे काम पूर्णत्वास गेले. मात्र, या रस्त्याचे नतूनीकरण वाहनधारकांसाठी झाले, की अतिक्रमण करणाऱ्यांसाठी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
दुतर्फा अतिक्रमणाची समस्या
रस्त्याचे कॉंक्रिटीकरण होऊन मध्यभागी दुभाजक टाकण्यात आला आहे. रस्त्याच्या कामात अनेक अडथळे आले. शेवटी काम पूर्ण झाले. मात्र, तयार रस्ता आपल्याच बापाचा आहे, अशा आविर्भावात काही जणांनी रस्त्यावर दोन्ही बाजूंनी आपल्या साहित्याचा, वाहनांचा ‘डेरा’ टाकला आहे.
मंगळवारी (ता. ६) एका महाशयाने तर रस्त्याच्या मध्यभागी आयशर मॅटेडोर दिवसभर उभी करून ठेवली होती, तर गुरुवारी या रस्त्यावर एका जागेवर वाळूचे डंपर दीर्घकाळ उभे होते.
याशिवाय इच्छादेवी चौकातून डी- मार्टकडे जाताना मुख्यत्वे डावीकडच्या दुकानदारांनी त्यांच्या दुकानातील साहित्य, कामाचे सामान थेट रस्त्यावरच मांडल्याचे विदारक चित्र आहे.
यंत्रणा सुस्त
या रस्त्याची मालकी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असली तरी रस्ता महापालिका हद्दीत असल्याने त्यावरील अतिक्रमणाचा विषय महापालिकेच्या अखत्यारित आहे, तर वाहतूक नियमन हे पोलिस वाहतूक शाखेचा विषय. मात्र, अन्य रस्त्यांप्रमाणेच या रस्त्यावरील अतिक्रमण व वाहतूक नियमनाच्या बाबतीत या दोन्ही यंत्रणा सुस्त आहेत.
दृष्टिक्षेपात...
-संवेदनशील भाग
-तरीही यंत्रणा सुस्त
-कारवाईची अपेक्षा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.