जळगाव : जिल्ह्यात गेल्या जुलैपासून वाळू उपसा बंद आहे. कारण वाळू गटांचे लिलाव झालेले नाहीत. असे असताना, काही दिवसांपासून जिल्ह्यात सर्रास वाळू वाहतूक सुरू आहे. गुजरात राज्यातील भरूच येथील पावत्यांवर जळगाव जिल्ह्यातील गिरणातील वाळू सर्रास नेली जातेय. त्यावर ना जिल्हाधिकाऱ्यांचा अंकुश, ना पोलिसांचा.
जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी काही महिन्यांपूर्वी थेट नदीपात्रात उतरून पहाटे अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलला होता. मात्र, गेल्या दीड- दोन महिन्यांपासून त्यांची सुरू केलेली कारवाईची धार ‘बोथट’ झाल्याचे चित्र आहे.
अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलणारा तरुण, तडफदार जिल्हाधिकारी जिल्ह्याला मिळाल्याच्या भावना जिल्हावासीयांमध्ये उमटत होत्या. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी कधी अवैध वाळू उपशाविरोधात कारवाई केल्याचे ऐकीवात नाही.
जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने खंडणी ?
गेल्या आठ दिवसांपूर्वी वाळूने भरलेले डंपर जात असताना, त्याला अडवून जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने ३० हजार रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार रात्री अकराला घडला.
‘लालदिव्यांच्या गाडीत जिल्हाधिकारी बसले आहेत, ३० हजार रुपये दे’, असे वाळू डंपरचालकाला सांगण्यात आले होते. दोन वाळू डंपरचालकापैकी एका डंपरचालकाने ओळखीच्या व्यक्तीला फोन लावून जिल्हाधिकारी कारवाईला उतरले आहेत का, अशी विचारणा केली. तोपर्यंत गर्दी जमा झाल्याने लालदिव्याच्या गाडीतील संबंधितांनी धूम ठोकली होती.
जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे खंडणी मागितल्याचा प्रकार याच जिल्हाधिकाऱ्यांच्या काळात घडला. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी मित्तल यांनी रात्रीच पोलिस ठाणे गाठले होते. मात्र, तक्रार देण्यात आली नव्हती. याप्रकरणी विचारले असता, ‘आम्ही त्या गाडीचा शोध घेऊ, नंतर तक्रार देऊ’, असे सांगण्यात आले होते. मात्र, आतापर्यंत लालदिव्याची गाडी ना पोलिस, ना आरटीओंना आढळून आलेली नाही, हे विशेष.
सायंकाळी, रात्री वाळूची वाहतूक
सध्या रोज सायंकाळी व रात्री उशिरापर्यंत वाळूने भरलेले डंपर जिल्ह्यात सर्वत्र जाताना दिसतात. वाळू गटांचे लिलाव झालेले नसताना वाळू संबंधितांच्या बांधकामावर बिनदिक्कत पोचते कशी? जिल्ह्यात वाळूअभावी एकही बांधकाम बंद झालेले नाही. वाळू मिळत नसल्याची तक्रारही नाही. यावरून बांधकामे असलेल्यांना वाळू मिळते, हे स्पष्ट होते.
गुजरातचा बोगस पावत्यांचा खेळ
शनिवारी (ता. २५) सायंकाळी पावणेसातला टॉवर चौकातून अवैध वाळूने भरलेले डंपर जात असल्याची माहिती पोलिस अधीक्षक, शहर पोलिस निरीक्षकांना देण्यात आली. पोलिसांनी संबंधित वाहन शहर पोलिस ठाण्यात जमा केले.
पोलिसांनी चौकशी केली असता, डंपरचालकाने वाळूची पावती दिली नाही. मात्र, अर्ध्या तासानंतर पावती तलाठ्याकडे आली कशी? बरं ती पावती भरूच (गुजरात) येथील होती.
गुजरातमधून जळगावला यायला किमान पाच ते सहा तास लागतील. मात्र, डंपरचालकाकडे केवळ अर्धा तासात भरूचची पावती आली कशी? ही पोचपावती जळगावात निर्माण होत असून, त्यावरच जिल्ह्यात वाळू उपसा सर्रास सुरू आहे. त्याला आवर घालणार कोण, असा प्रश्न आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.