Diwali 2023 : ‘केरसुणी’ हा शब्द कानावर पडला, की शिंदाडच्या पानापासून बनविलेल्या झाडूची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. जुन्या काळी शेणामातीची घरे असताना याच केरसुणीने घरातील साफसफाई केली जात.
काळ बदलला, शेण-माती जाऊन फरशी आली. टाइल्स आणि आता मार्बल आले. सोबत नवीन पद्धतीचे झाडूही आले. परंतु आजही ‘लक्ष्मी’ म्हटले जाते. ( in modern age Kersuni is worshipped as Lakshmi in diwali jalgaon news )
लक्ष्मीपूजनाला देवासमोर पूजेचा मान ‘केरसुणी’लाच आहे. त्यामुळे बाजारात केरसुणी आज मानाचा भाव खात आहे. झाडूंचा काळ बदलला असला, तरी केरसुणी विक्रेत्यांची परिस्थिती मात्र बदलली नाही. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारात ग्राहक अन् दुकानांचीही गर्दी आहे.
याच गर्दीत केरसुणी विक्रेत्यांची दुकानेही रस्त्यावर लागली आहेत.अगदी देवघरात सफाईसाठी लागणाऱ्या छोट्या झाडीपासून थेट घर सफाईसाठी लागणाऱ्या मोठ्या केरसुणीचे ढीग विक्रेत्यांनी लावले आहेत. काही जण आजही अंगण साफ करण्यासाठी या केरसुणीचाच वापर करतात. त्यामुळे चांगल्या, मजबूत केरसुणीही विक्रीसाठी आहेत.
बनविण्यासाठी कष्ट
केरसुणी विक्रीसाठी ढीग दिसत असले तरी एक केरसुणी बनविण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. शेतीलगत असलेली शिंदाडची झाडे विकत घ्यावी लागतात. त्या शिंदाडच्या झाडाची पाने गोळा करून त्यापासून केरसुणी बनवावी लागते, यासाठी मोठे कष्ट घ्यावे लागतात. पहाटे उठून सर्व घरातील माणसेही कामे करीत असतात. केरसुणी बनविताना हाताला काटेही लागतात. परंतु ते सहन करण्यापलीकडे पर्याय नसतो.
मध्य प्रदेशातून आवक
कानळदा येथील बनाबाई मोरे यांचे वय आज ७० वर्षे आहे. अनेक वर्षांपासून त्या हा व्यवसाय करतात. आजही त्या शहरातील प्रकाश मेडिकलसमोरील रस्त्यावर केरसुणीची विक्री करतात. त्या म्हणाल्या, की आम्ही अगोदर खर्ची, रिंगणगाव येथून शिंदाड वृक्षाची पाने आणून केरसुणी बनवत होतो. परंतु आता झाडाची पानेच मिळत नाही. त्यामुळे आम्हीही आता तयार केरसुणी मध्य प्रदेशातून घेऊन येतो.
आम्ही केवळ दिवाळीतच नव्हे, तर कायम हा व्यवसाय करीत असतो. जळगाव येथील कमलाबाई सपकाळे म्हणाल्या, की आम्ही अनेक वर्षांपासून केरसुणी, टोपल्या बनविण्याचा व्यवसाय करतो. आता शिंदाडच्या झाडाची पाने मिळत नसल्याने आम्ही मध्य प्रदेशातील खंडवा, बुऱ्हानपूर येथून केरसुणीसाठी तयार माल आणतो.
केरसुणी खरेदी करून रेल्वेच्या डब्यात टाकून ती आम्ही आणतो. मोठी केरसुणी ३० ते ३५ रुपयाला विकतो, तर देव्हाऱ्याची केरसुणी १० ते १५ रुपयाला विकतो. दिवाळीत या केरसुणीला पूजनासाठी मागणी असल्याने दिवाळीच्या दोन ते तीन महिने अगोदरच माल घेऊन येतो.
लक्ष्मीचा मान, पण आमच्याकडे काय?
बनाबाई मोरे म्हणतात, की केरसुणीला आजही घरात लक्ष्मीचा मान आहे. तिच्यामुळे घरात लक्ष्मी येते. श्रीमंतापासून गरिबांपर्यंत आजही सर्वजण ही केरसुणी खरेदी करतात. अनेक वर्षांपासून आम्ही हा व्यवसाय करत आहोत. आज काळ बदलला आहे, झाडू, नवीन फुलझाडू बाजारात आले आहेत. त्यामुळे आमच्यावर त्या लक्ष्मीचा दोन वेळेच्या जेवणाचा वरदहस्त आहे.
आमची तक्रारही नाही. परंतु आम्हाला चांगले जीवन जगता यावे, यासाठी शासनाने आमच्या व्यवसायाला मदतीचे संरक्षण दिले पाहिजे. झाडूच्या नवीन पद्धतीप्रमाणे आम्ही याच शिंदाडच्या पानाचा झाडू बनवू शकतो. परंतु शासनाने त्या पद्धतीने आमच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
कमलबाई सपकाळे म्हणतात, की आम्ही बांबूच्या झाडापासून टोपल्या तसेच इतर वस्तू बनवितो. परंतु आम्हाला बांबू आणण्यासही अडचणी येत आहेत. त्यामुळे शासनाने आमच्या या व्यवसायाकडे लक्ष देण्याची गरज आहे.
''‘लक्ष्मी’ म्हणून केरसुणीची खरेदी करतात. परंतु ती खरेदी करताना आजही लोक त्याचा भाव करतात, याचे फार वाईट वाटते. मात्र, आजही काही घरांत केरसुणीचा वापर होतो. तर लक्ष्मीपूजनाला श्रीमंतापासून गरिबांपर्यंत सर्वजण तीच खरेदी करतात, तिला ते विसरत नाहीत, याचेही समाधान वाटते.''- बनाबाई मोरे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.