Jalgaon Raid News : स्टेट बँक ऑफ इंडियाशी झालेल्या कर्जाच्या व्यवहारात आमची बाजू न ऐकताच एसबीआयच्या तक्रारीवरून सीबीआयने एफआयआर दाखल केली आहे.
ती रद्द करण्यासाठी आम्ही उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, ते प्रकरण न्यायप्रविष्ट असताना अशा प्रकारे कारवाई करणे योग्य नाही, अशी भूमिका राजमल लखीचंद ज्वेलर्सचे संचालक माजी खासदार ईश्वरलाल जैन यांनी मांडली. (ishwarlal jain opinion on raid by ed on rl lakhichand jalgaon news)
सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुरुवारपासून आर. एल. ज्वेलर्सच्या आस्थापनांवर छापा टाकत तपासणी सुरू केल्यानंतर आज दुसऱ्या दिवशी श्री. जैन यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, एसबीआयकडून आर. एल. ज्वेलर्सने कर्ज घेतले होते. पाचशे कोटींहून अधिक त्याची रक्कम होती.
मात्र, चार टक्के दराने मंजूर कर्जावर एसबीआयने नंतर जवळपास १८ टक्के व्याजदराने वसुली केली. जवळपास ८० कोटींचा अतिरिक्त करही लावला. त्यामुळे एसबीआयने आमच्यावर जेवढी रक्कम क्लेम केली आहे, त्याविरोधात आम्हीही काउंटर क्लेम केला असून, हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.
सीबीआयने याबाबत दाखल केलेला एफआयआर रद्द करण्यासाठी आम्ही उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, गुरुवारी (ता. १७)च त्याची तारीख होती. त्यात सीबीआयच्या वकिलांनी मुदत वाढवून घेतल्याने दीड महिन्यानंतरची तारीख देण्यात आली. ती लवकरची तारीख मिळावी म्हणूनही आम्ही उच्च न्यायालयात जाणार आहोत, असेही श्री. जैन म्हणाले.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
कर्ज पुनर्रचनेसाठी प्रयत्न
एसबीआयकडून आम्ही घेतलल्या कर्जाची पुनर्रचना करून नऊ वर्षांच्या परतफेडीचे शेड्यूल द्यावे, असा प्रस्ताव आम्ही एसबीआयकडे सादर केला होता. मात्र, एसबीआयने तो प्रस्तावही मान्य केला नाही.
आम्हाला आमची बाजू नैसर्गिक न्याय तत्त्वानुसार मांडण्याची संधीही मिळाली नाही. असे असले तरी आम्ही आमची लढाई कायद्याने लढणार आहोत. न्यायव्यवस्थेवर मला विश्वास आहे, तिथे योग्य न्याय मिळेलच, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नातूंच्या नावावरील फर्मची मालमत्ता गोठवणे अयोग्य
‘ईडी’ने तपासणी सुरू केल्यापासून त्यांच्या मागणीनुसार आम्ही सर्व कागदपत्रे त्यांना उपलब्ध करून देत आहोत. सर्व प्रकारचे सहकार्य त्यांना केले जात आहे. मात्र, या सर्व प्रकरणातील व्यवहार राजमल लखीचंद ज्वेलर्सशी झालेले आहेत. ईडीकडून जी कारवाई व मालमत्ता सीज करण्याची प्रक्रिया सुरू आहे, ती राजमल लखीचंद एंटरप्रायझेसची आहे आणि ही फर्म माझ्या दोन्ही नातूंच्या नावाने आहे, असा दावाही श्री. जैन यांनी माध्यमांशी बोलताना केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.