Jalgaon News : जळगाव जिल्ह्यासह खानदेशाच्या अहिराणी पट्ट्यातील ग्रामीण भागात मोठ्या भावाला आप्पा संबोधले जाते. याच मोठ्या भावाकडून कौतुकास्पद कार्य झाल्यास, ‘मस्त रे आप्पा’ असा उद्घोष करण्याचा प्रघात लालमातीच्या पहिलवानांच्या दंगलीतून आलेला आहे.
पुढे चालून कबड्डी, क्रिकेटमध्येही चौकार, षटकार लावणाऱ्या खेळाडूला ‘मस्त रे आप्पा’ असे म्हणत प्रोत्साहित केले जाते. तसाच काहीसा प्रकार तालुका पोलिस ठाण्याचे प्रभारी आणि परीविक्षाधीन डीवायएसपी आप्पासो पवार यांच्या बाबतीत घडला आहे.
सर्वांत मोठ्या ग्रामीण हद्दीच्या तालुका पोलिस ठाण्याचे नाव आप्पासो पवार यांच्या कर्तबगारीने चर्चेला आले असून, आता या पोलिस ठाण्यास आयएसओ मानांकनही प्राप्त झाले आहे. (ISO Rating for Taluka Police Station Jalgaon News)
या पोलिस ठाण्याची हद्द म्हणजे दापोरापासून ते कानळदापर्यंत वाहणारी गिरणा नदी. अर्थात वैध-अवैध वाळू व्यवसायासोबतच वाळूमाफियांचा प्रचंड उपद्रव या पोलिस ठाण्याच्या हद्दीत आहे.
संपूर्ण पोलिस दलास बदनाम करण्याची करामात याच अवैधवाळू व्यावसायिकांमुळे झाली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी हा कलंक पुसण्यासाठी प्रयत्न चालविले असून, एकाच दिवसात दीडशेवर अवैध वाळू वाहतुकादरांची वाहने ताब्यात घेण्यात आली.
बांभोरी गावात अक्षरशः संचारबंदी लावून वाळू वाहतूकदारांचे शंभरावर ट्रॅक्टर, डंपर जप्त करून अवैध वाळू व्यावसायिक आणि माफियांची कंबर मोडली.
पोलिस ठाणे आणले वठणीवर
परीविक्षाधीन पोलिस उपनिरीक्षक पदावर रुजू झाल्यावर पहिलीच पोस्टिंग जळगाव मिळाल्याने नियमानुसार आप्पासो पवार यांना तालुका पोलिस ठाण्याचा पदभार सोपविण्यात आला.
वाळूमाफियांची अक्षरशः नसबंदी करून अवैध दारूविक्रेत्यांचे अड्डे जेसीबीने जमीनदोस्त करण्यात आले. पोलिस ठाण्यात कार्यरत सहाय्यक फौजदार विश्वनाथ गायकवाड यांचे वाळूमाफियांशी लागेबांधे असल्याचे आढळून आल्याने त्यांच्यावर थेट निलंबनाची कारवाई केली.
ठाण्याचा चेहरा-मोहरा बदलला
पोलिस ठाण्यातील वातावरणात बदल करण्यासाठी त्यांनी स्वतः जास्तीत जास्त वेळ पोलिस ठाण्याला देत कर्मचाऱ्यांच्या क्षमता व आवडीनुसार त्यांना कामाला जुंपले.
पोलिस ठाण्यांतर्गत प्रलंबित तक्रारींचा निपटारा, राहून गेलेले गुन्ह्याचा तपास पूर्ण करून दोषारोप पत्र न्यायायाल दाखल करणे यांसह पोलिस ठाण्याच्या बिल्डिंगची रंगरंगोटी करवून आवश्यक अशा टेबल-खुर्च्यांची सोय केली.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
‘आयएसओ’चा बहुमान
अवघ्या तीनच महिन्यांत आप्पासो पवार यांनी पोलिस ठाण्याचा चेहरा-मोहरा बदलवून, आमूलाग्र बदल घडवून आणत जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या हस्ते प्रभारी अधिकारी आप्पासो पवार यांना आयएसओ मानांकनाचे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
या वेळी अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलिस उपअधीक्षक संदीप गावित, वरिष्ठ निरीक्षक किशन नजनपाटिल, निरीक्षक जयपाल हिरे यांच्यासह कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते.
पोलिसांकरिता आराम कक्ष
सलग २४ तास ड्यूटी असो की अतिरिक्त नाईट, आता तालुका पोलिस कर्मचारी आनंदाने ड्यूटी करतील यासाठी दहा कर्मचाऱ्यांची क्षमता असलेले सुसज्ज आराम कक्ष पोलिस ठाण्याच्या आवारात उभारण्यात आले आहे. एम. राजकुमार यांच्या हस्ते कक्षाचे उद्घाटन करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.