Bhagpur Upsa Irrigation Scheme
Bhagpur Upsa Irrigation Schemeesakal

Jalgaon: भागपूर उपसा सिंचन योजनेस 3 हजार कोटींची ‘सुप्रमा’! 30 हजार हेक्टर क्षेत्रास लाभ; जळगाव, जामनेरच्या शेतकऱ्यांना दिलासा

Latest Jalgaon News : या योजनेच्या सुधारित प्रस्तावामुळे सिंचन क्षेत्रात मोठी वाढ होणार असून, जळगाव तालुक्यातील भागपूर-वावडदासह २५ गावांच्या, तसेच जामनेर व पाचोरा तालुक्यांतील शेतकऱ्यांची ३० हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे.
Published on

जळगाव : मंत्रिमंडळाच्या सोमवारी (ता. ३०) झालेल्या बैठकीत भागपूर उपसा सिंचन योजनेच्या तीन हजार ५३३ कोटींच्या सुधारित प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. या योजनेच्या सुधारित प्रस्तावामुळे सिंचन क्षेत्रात मोठी वाढ होणार असून, जळगाव तालुक्यातील भागपूर-वावडदासह २५ गावांच्या, तसेच जामनेर व पाचोरा तालुक्यांतील शेतकऱ्यांची ३० हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. (approval of 3 thousand crores for Bhagpur Upsa Irrigation)

ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील यांनी या संदर्भात सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्या पाठपुराव्यास यश म्हणून सुधारित प्रस्तावास मान्यता मिळाली. जिल्ह्यासाठी ही मोठी उपलब्धी मानली जात आहे.

१९९९-२००० मध्ये प्रकल्पासाठी ५५७ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली होती. मूळ प्रकल्पांतर्गत १८ हजार १४१ हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्याचे उद्दिष्ट होते. मात्र, वाघूर प्रकल्पाच्या कारणास्तव यातील चार हजार २३७ हेक्टर क्षेत्र वगळले. आता सुधारित प्रस्तावानुसार ३० हजार ७६४ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.

यात १३ हजार ९०४ हेक्टर मूळ भागपूर प्रकल्पाचे, १५ हजार ४६५ हेक्टर मध्यम आणि लघु प्रकल्पाचे पुनर्स्थापित क्षेत्र, नव्याने प्रस्तावित गोलटेकडी व एकुलती साठवण तलावांमुळे एक हजार ३९५ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे.

प्रकल्पाच्या खर्चात वाढ झाल्यामुळे सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे. यामध्ये भूसंपादन, अभियांत्रिकी बदल आणि इतर आनुषंगिक खर्चांचा समावेश आहे. मार्च २०२४ अखेर या प्रकल्पावर ५२२.५३ कोटी रुपये खर्च झाले असून, पुढील टप्प्यात ३०१०.५२ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. (latest marathi news)

Bhagpur Upsa Irrigation Scheme
Sharad Pawar: "तर प्रचार करणार नाही.." कार्यकर्त्यांनी पवारांकडे केली मागणी, काय निर्णय होणार याकडे सगळ्यांचेच लक्ष

असा आहे प्रकल्प

ही योजना तापी नदीवर आधारित असून, पावसाळ्यात वाहून जाणारे अतिरिक्त पाणी साठविण्यासाठी आणि उपसण्यासाठी या प्रकल्पाचा उपयोग होणार आहे. योजनेच्या माध्यमातून तापी नदीवरील शेळगाव बॅरेजमधून वाघूर नदीकाठच्या भागात पाणी साठविले जाणार आहे.

या पाण्याचा उपयोग करून जळगाव तालुक्यातील २५ गावांच्या शेतकऱ्यांच्या १३ हजार ९०४ हेक्टर क्षेत्रावर सिंचन केले जाणार आहे, तर अजिंठा डोंगराच्या पायथ्यापासून ते पाचोरा तालुक्यापर्यंतच्या क्षेत्रात १६ हजार ८६० हेक्टर जमिनीला लाभ मिळणार आहे.

"काही वर्षांपासून ही योजना प्रलंबित, प्रस्तावित आहे. सुधारित प्रस्तावाच्या मान्यतेशिवाय योजनेचे काम मार्गी लागू शकत नव्हते, म्हणून आम्ही सातत्याने या योजनेसाठी पाठपुरावा केला. जळगाव व जामनेर तालुक्याच्या विकासासाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या योजनेच्या सुधारित प्रस्तावास मंजुरी मिळाल्याबद्दल मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आभार."

- गुलाबराव पाटील, पालकमंत्री, जळगाव

"या योजनेचा सुधारित प्रस्ताव मंजूर झाल्याने जळगाव व जामनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना याचा लाभ होणार असून, हा परिसर सुजलाम सुफलाम होण्यास मदत होणार आहे."

- गिरीश महाजन, ग्रामविकासमंत्री

Bhagpur Upsa Irrigation Scheme
Bharat Gaurav Railway: ‘भारत गौरव’ रेल्वे अयोध्येकडे रवाना! जिल्ह्यातील आठशे यात्रेकरू; ढोलताशांचा गजर, पारंपरिक नृत्याने स्वागत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.