Jalgaon News : "जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघांवर गेली सहा टर्म भाजपचे वर्चस्व आहे. पक्षाची या दोन्ही मतदारसंघांवर मजबूत पकड आहे. पक्षातर्फे लोकसभा मतदारसंघाचे विजयी उमेदवार सहसा बदलले जात नाही, त्याच उमेदवारांना पुन्हा संधी दिली जाते, हे मागील निवडणुकीवरून दिसून आले आहे.
अपवाद काही एक-दोन प्रसंगांचे. या वेळी भाजपचे दोन्ही खासदार आपल्याला उमेदवारी मिळविण्यासाठी कसून प्रयत्न करीत आहेत. मात्र, राजकारणाचा पोत बराच बदलला आहे. जुना मित्र ठाकरे यांची शिवसेना विरोधी पक्षासोबत आहे. त्यामुळे पक्ष या दोन्ही उमेदवारांना पुन्हा संधी देऊन भाकरी तीच ठेवणार, की ती फिरवून नवीन उमेदवारांना संधी देणार याकडेच लक्ष आहे."
-कैलास शिंदे
( Jalgaon and Raver Lok Sabha constituencies election Result Jalgaon News)
जळगाव जिल्ह्यात ‘जळगाव’ व ‘रावेर’, असे दोन मतदारसंघ आहेत. पूर्वी जळगाव व एरंडोल मतदारसंघ होते. १९९१ पासून भाजपने दोन्ही मतदारसंघांवर आपली पकड मजबूत केली आहे. अपवाद दोन निवडणुकांचा आहे.
त्यानंतर मात्र विरोधकांना लोकसभेत विजयी होण्याची संधी एकवेळाही भाजपने मिळू दिलेली नाही. जळगाव लोकसभा मतदारसंघात उन्मेष पाटील, तर रावेर लोकसभा मतदारसंघात रक्षा खडसे खासदार आहेत. दोन्ही खासदारांनी मतदारसंघांत काम करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले आहेत.
उन्मेष पाटील यांनी जळगाव शहरात आपले संपर्क कार्यालय सुरू केले आहे. उन्मेष पाटील यांना पक्षाने उमेदवार दिल्यास त्याची लढण्याची दुसरी वेळ असेल. रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षा खडसे मतदारसंघात सतत संपर्कात असतात. त्यांनी अगदी खेडोपाडी जनतेशी संपर्क ठेवला आहे. पक्षाने त्यांना पुन्हा उमेदवारी दिल्यास त्या विजयाची हॅटट्रिक साधणार का, हा प्रश्न आहे.
पक्षातर्फे विद्यमान खासदाराची उमेदवारी बदलली जात नाही, हे मागील इतिहासावरून दिसून येत आहे. जळगाव लोकसभा मतदार संघात गुणवंतराव सरोदे यांना सन १९९१ व १९९६ अशी दोन वेळा संधी मिळाली आहे.
वाय. जी. महाजन यांना १९९९ व २००४ मध्ये पुन्हा संधी मिळाली. एका प्रकरणामुळे त्यांचे सदस्यत्व गेले व नंतर पोटनिवडणुकीत २००७ ला व सार्वत्रिक निवडणुकीत पुन्हा २००९ मध्ये हरिभाऊ जावळे यांना संधी मिळाली.
तर ए. टी. नाना पाटील यांना २००९, २०१४ अशी दोनवेळा सलग संधी मिळाली. मात्र, हॅटट्रिकची संधी हुकली. जळगाव लोकसभा मतदारसंघ यापूर्वी एरंडोल मतदारसंघ होता, त्यावेळी अण्णासाहेब एम. के. पाटील १९९१ पासून, तर २००७ पर्यंत सलग भाजपतर्फे उमेदवारी दिली. अखेर एका प्रकरणात त्यांचीही उमेदवारी पक्षाला रद्द करावी लागली.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
रावेर लोकसभा मतदारसंघ निर्माण झाल्यापासून भाजपने हरिभाऊ जावळे यांना लोकसभेची २००९ मध्ये संधी दिली. हा मतदारसंघ अगोदर जळगाव लोकसभेत असताना, त्यांनाच संधी मिळाली होती.
मात्र, तिसऱ्या वेळी २०१४ मध्ये त्यांना रावेर लोकसभेतून पक्षाने उमेदवारी दिली नाही. भाजपची या मतदारसंघावर मजबूत पकड असली, तरी त्यावेळी त्यांच्यासोबत श्री. ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना भक्कम होती.
आता ठाकरे यांची शिवसेना भाजपविरोधात आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांची शिवसेना भाजपसोबत आहे. मात्र, त्यांच्यासमवेत कोणत्याही निवडणुका न झाल्याने अद्याप तरी या नव्या युतीचा कल कळलेला नाही.
याशिवाय एकनाथराव खडसे यांनी भाजप सोडून ‘राष्ट्रवादी’त प्रवेश केला आहे. त्यांच्याशिवाय भाजपला प्रथमच लोकसभा निवडणूक लढवावी लागणार आहे. भाजपला मात्र केंद्रात सत्तेची हॅटट्रिक करायची आहे. त्यामुळे लोकसभेसाठी त्यांनी कंबर कसली आहे.
उन्मेष पाटील यांना पुन्हा उमेदवारीची संधी मिळण्यासाठी त्यांच्या कामाची ताकद असल्याचा त्यांचा दावा आहे. मात्र, पक्षांतर्गत काही नेत्यांशी वादही त्यांची वजाबाकीची बाजू आहे. त्यामुळे पक्ष नवीन उमेदवार देणार, की त्यांच्यावरच विश्वास ठेवणार, हे पक्षश्रेष्ठीच ठरवतील.
रावेर लोकसभा मतदारसंघात रक्षा खडसे यांचा जनतेशी संपर्क चांगला आहे. त्यांनी मतदारसंघात विकासकामेही केली आहेत. सासरे एकनाथ खडसे यांनी भाजपतून बाहेर पडून राष्ट्रवादी प्रवेश केल्यानंतरही रक्षा खडसे यांनी भाजपचे काम निष्ठेने केले आहे.
पक्षाच्या नेत्यांशी त्यांचे कोणतेही पक्षातर्गंत वाद नाहीत. मात्र, ज्या ‘खडसे’ नावामुळे त्यांना दोन वेळा संधी मिळाली, त्याच ‘खडसे’ नावामुळे तिसऱ्यांदा भाजप संधी नाकारणार काय? याबाबत चर्चा आहे. मात्र, पक्षाने केवळ त्यांचे काम लक्षात घेऊन उमेदवारी दिल्यास रावेर लोकसभेची निवडणूक राज्यातील वेगळ्या वळणावरची असेल, एवढे मात्र निश्चित!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.