Jalgaon : रावेर व जळगाव लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतील शरद पवार गट व शिवसेना ठाकरे गटातील उमेदवार जाहीर करण्याचा तिढा अद्याप कायम आहे. रावेरमधून शरद पवार गटातर्फे आता मुक्ताईनगरातील मक्तेदार विनोद सोनवणे इच्छुक असल्याचे सांगण्यात येत आहे. जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार जाहिर करण्यात आले आहेत. (Jalgaon Lok Sabha Election)
जळगावमधून स्मिता वाघ तर रावेरमधून रक्षा खडसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र महाविकास आघाडीतून अद्यापही दोन्ही मतदारसंघातून उमेदवारी निश्चित करण्यात आलेली नाही. महाविकास आघाडीत जळगाव शिवसेना ठाकरे गटाकडे तर रावेर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाकडे आहे.
जळगावातून शिवसेना ठाकरे गटातर्फे माजी महापौर कुलभूषण पाटील, ललिता पाटील इच्छुक आहेत. तर भाजपचे खासदार उन्मेश पाटील यांच्या पत्नी संपदा पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र अद्यापही उमेदवारी निश्चित झालेली नाही.पक्षातर्फे कोणाला उमेदवारी जाहीर होणार याकडे आता लक्ष आहे.
रावेरमधून इच्छुकात वाढ
रावेर लोकसभा मतदार संघ राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाकडे आहे. पक्षातर्फे पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्र भैय्या पाटील, माजी आमदार संतोष चौधरी तसेच रावेर येथील उद्योजक श्रीराम पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र आता पुन्हा एका इच्छुकांच्या संख्येत भर पडली आहे. (latest marathi news)
मुक्ताईनगर येथील मक्तेदार विनोद सोनवणे इच्छुक असल्याचे सांगण्यात येत आहे. जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्र पाटील यांनीही ते इच्छुक असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मुंबई येथे शरद पवार यांची भेट घेण्यास ते गेले असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे रावेर लोकसभा मतदारसंघातून विरोधी पक्षाकडून कोणाला उमेदवारी मिळणार याकडेच लक्ष आहे.
"आमच्याकडे सक्षम उमेदवार असल्यामुळेच आम्ही हा मतदार संघ महाविकास आघाडीत आमच्याकडे घेतला आहे. भाजपचा उमेदवार जाहीर झाला आहे, त्याबाबतीत वादही सुरू आहे. आमचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर त्यांनी उमेदवार बदलू नये. त्यांनी त्याच उमेदवाराला मैदानात राहू द्यावे, यासाठी आम्ही संयमाने उमेदवार जाहीर करणार आहोत. मात्र आमच्या मशाल चिन्हाचा प्रचार सुरू आहे." - संजय सावंत, जिल्हा संपर्कप्रमुख शिवसेना ठाकरे पक्ष, जळगाव
"आमच्याकडे इच्छुकांची संख्या वाढत असून पक्षाचे नेते शरद पवार यांची इच्छुक उमेदवार भेट घेत आहेत. रावेर लोकसभेच्या उमेदवारीबाबत अंतिम निर्णय पक्षाचे नेतेच घेणार आहेत. तो जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. मात्र आता आम्ही मतदारसंघात लोकांशी संपर्क सुरू करून प्रचार सुरू केला आहे."- ॲड.रवींद्र पाटील, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष, जळगाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.